चक दे इंडिया

शेअर बाजार मुहूर्ताला चक्क एक टक्क्याने वाढला.
stock market
stock market sakal

या वर्षी शेअर बाजारातील दिवाळी मुहूर्तावर होणाऱ्या पारंपरिक ट्रेडिंगला सोनेरी किनार होती. गेले महिनाभर तळ्यातमळ्यात करीत असलेला शेअर बाजार मुहूर्ताला चक्क एक टक्क्याने वाढला. रशिया-युक्रेन युद्धाने गांगरलेला गुंतवणूकदार बाजारपेठेतील गर्दी पाहून आत्मविश्वासाने बाजारात उतरला. ते संपूर्ण सत्रच तेजीचे होते. ही तेजी टिकते की नाही, हा संभ्रम शेवटी गोऱ्यांनी खरेदीत भाग घेऊन संपवला.

वाचकहो, निफ्टीचा शुक्रवारचा १७,७८६चा बंद आशादायक आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी आपला बाजार चालू असतांना, ऑस्ट्रेलिया, तैवान, हॉंगकॉंग, शांघाई, निक्केई सारेच बाजार हातघाईवर येऊन घसरत होते. चीनमधे वूहान प्रांतात पुन्हा कोविडचा प्रादुर्भाव झाल्यामुळे चिंतेचे वातावरण होते. त्यावर आता शी जिनपिंग चीनवर तहहयात राज्य करणार या

बातमीचेही सावट पडून शांघाई शेअर बाजार सहा वर्षांच्या नीचांकी पातळीला गेला आहे. कोविड उघडकीला आल्यावर तेथील बाजाराने जी पातळी गाठली होती त्यापासून तो आज केवळ चारशे अंश वर आहे. तुलनेने आपला शेअर बाजार कोविडच्या काळातील नीचांकापासून (७,५११) दहा हजार अंश वर आहे.

गेले वर्षभर परदेशी संस्था भारतात विक्रमी विक्री करीत होत्या, त्यावेळी त्यांची तुलना समुद्रातल्या जहाजाच्या शिडावर बसलेल्या पक्षांशी केली होती. उडून गेले तरी जाणार कुठे? पुन्हा शिडावरच येऊन बसणार! चीन सरकारने आखलेल्या कडक धोरणामुळे हे शब्द खरे ठरले. तसेच झाले. तशीच बेभान विक्री आता त्या संस्था चीनमधे करीत आहेत व ते भांडवल भारतात गुंतवित आहेत. गेला सप्ताह परदेशी संस्थांच्या पुनश्चः आगमनामुळे वेधक ठरला.

संपूर्ण विश्वाचे लक्ष भारताकडे

संपूर्ण विश्वाचे लक्ष आता भारताकडे आहे. गेल्या ३२ दिवसात भारतभरात रोज हजार कोटी रुपयांची वाहन विक्री होत होती. धनत्रयोदशीच्या दिवशी भारतीयांनी १९,००० कोटी रुपयांचे सोने विकत घेतले. दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत सणासुदीचा उत्साह ओसंडून वहात होता. मारुतीचे तिमाही निकाल जाहीर झाले. कंपनीने सर्व दूर प्रगती केली असून, वाहन उद्योगाचे उरलेसुरले मळभ या निकालाने दूर झाले. एक नोव्हेंबर रोजी सर्व वाहनांचे विक्रीचे आकडे जाहीर होतील आणि ते या वर्षीचे सर्वोच्च असतील. ऑक्टोबर जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. मंदी-मंदी म्हणतात ती हीच का? असा प्रश्न पडेल. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा सरकारने मोडला, असे म्हणणारे दिग्गज आता फक्त आवंढे गिळू शकतात. गेले वर्षभर निफ्टी वाढलेला नाही;पण तुलनेत अमेरिका युरोप, चीन, जपानसह सर्वच शेअर बाजार किमान २० ते ५० टक्के घसरले आहेत. यावर प्रतिक्रिया काय देणार ? चक दे इंडिया हेच खरे !

भारतीय बाजार अमेरिकेला पाहून रंग बदलतात, की पाश्चात्य बाजार भारतीय बाजारापासून स्फूर्ती घेऊन तेजीत येतात असा प्रश्न पडतो. या तिमाहीत अमेरिकन अर्थव्यवस्था २.६ टक्के वाढली आहे. नुकताच ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांना शोध लागला आहे, की नजीकच्या भविष्यकाळात अमेरिकेत मंदी दिसत नाही. महागाई दर वाढले आहेत हे नक्की;पण त्यावर ‘फेड’ योग्य ती उपाययोजना करणार याची त्यांना खात्री आहे. या घोषणेच्या आधारावर ‘डाऊ जोन्स फ्युचर्स’ मंदीतून तेजीत गेले आणि कदाचित मोठ्या तेजीत या आठवड्याचा बंद लागेल.

पुढे काय होणार?

निफ्टी नवा उच्चांक करणार का? करू शकते;पण ही वाट सोपी नाही. दोन नोव्हेंबर रोजी अमेरिकी ‘फेड’ची पुढील बैठक आहे. लागलीच आपल्या रिझर्व्ह बँकेनेदेखील त्यानंतर आपले धोरण ठरवायचे योजले आहे. दोन नोव्हेंबर रोजी व्याजदर किती वाढतात, त्यानुसार रिझर्व्ह बँक काय पावले उचलते यावर शेअर बाजार नर्व्हस होऊ शकतो. निफ्टीने १८,१०० या पातळीचा अडथळा पार केल्यास १८,६०० किंवा त्यावरचा उच्चांक निफ्टी गाठू शकते. शेअर बाजार या घटनांच्या आधी किंवा नंतर खाली आला, घसरला तर, ती खरेदीची संधी असेल. वाहन उद्योग, खासगी व सरकारी बँका, निवडक मिडकॅप आयटी या क्षेत्रातील शेअर, स्वत:च्या आवडीचे अथवा आपल्या सल्लागाराच्या मताने निवडावे आणि दीर्घ पल्ल्यासाठी जवळ बाळगावे. प्रत्येक खालच्या टप्प्यावर (बाजार आणखी खाली आल्यास) गुंतवणूक करणे केंव्हाही सोयीस्कर, मात्र वरच्या बाजूला थोडाफार तरी नफा खिशात टाकायला विसरू नये.

(लेखक भांडवली बाजाराचे ज्येष्ठ विश्‍लेषक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com