शेअर बाजारात लवकरच ‘पुणेरी’ कर्जरोख्यांचे आगमन

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

दोन संस्थांकडून पुण्याची निवड; 200 कोटी आज मिळणार

पुणे: शहरासाठी 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य दोन संस्थांनी 7.59 टक्के दराने महापालिकेचे कर्जरोखे सोमवारी घेतले. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मंगळवारी 200 कोटी रुपये जमा होणार आहेत. कर्जरोख्यांसाठी महापालिकेला सहापट प्रतिसाद मिळाला.

दोन संस्थांकडून पुण्याची निवड; 200 कोटी आज मिळणार

पुणे: शहरासाठी 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य दोन संस्थांनी 7.59 टक्के दराने महापालिकेचे कर्जरोखे सोमवारी घेतले. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मंगळवारी 200 कोटी रुपये जमा होणार आहेत. कर्जरोख्यांसाठी महापालिकेला सहापट प्रतिसाद मिळाला.

स्थानिक योजनेसाठी राष्ट्रीय स्तरावर 2007 नंतर कर्जरोखे उभारणारी पुणे ही देशातील पहिलीच महापालिका आहे. कर्जरोखे उभारण्यासाठी महापालिकेला रिझर्व्ह बॅंक, "सेबी'नेही मंजुरी दिली होती. क्रेडिट रेटिंगमध्येही महापालिकेला अव्वल दर्जा मिळाला आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांच्या पथकाने मुंबईत दोन दिवस नुकतेच सादरीकरण केले होते. त्यात बॅंकिंग, विमा, उद्योग आदी विविध क्षेत्रांतील 21 कंपन्यांनी उत्सुकता दर्शविली होती. त्यातील सर्वात कमी व्याजदर दोन संस्थांनी नमूद केला होता. त्यांच्याकडून प्रत्येकी 100 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या संस्थांची नावे 22 जून रोजी जाहीर होणार आहेत. दोन्ही संस्थांकडून मिळणारे सुमारे 200 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत मंगळवारी जमा होतील.

मुंबईत सोमवारी दुपारी कर्जरोखे घेणाऱ्या संस्थांची नावे जाहीर होणार होती. त्यासाठी महापौर मुक्ता टिळक आवर्जून उपस्थित होत्या. दोन्ही संस्था निश्‍चित झाल्यावर विविध घटकांनी महापौरांचे अभिनंदन केले. या कर्जरोख्यांची नोंदणी 22 जून रोजी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) एका कार्यक्रमाद्वारे होणार आहे. त्या प्रसंगी केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. कर्जरोखे घेणाऱ्या दोन्ही संस्थांशी येत्या दोन दिवसांत करार करण्याची औपचारिकता पूर्ण होईल.

अर्थमंत्र्यांकडून अभिनंदन
पुणे महापालिकेला 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्यात यश आले आणि त्याला सहापट प्रतिसाद मिळाल्याचे समजताच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, मुख्यमंत्री, पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापौर आणि आयुक्तांचे अभिनंदन केले.

Web Title: The stock market will soon arrive in 'Punei' bond