
टाटा स्टील कंपनीने त्यांच्या एका शेअरचे १० शेअरमध्ये नुकतेच विभाजन (स्टॉक स्प्लिट) जाहीर केले आहे. त्या निमित्ताने या बलाढ्य कंपनीचा आणि विभाजनाचा थोडक्यात परामर्श.
बलाढ्य कंपनीचे शेअर विभाजन
वर्षाला ३.४० कोटी टन इतके प्रचंड स्टील निर्माण करण्याची क्षमता असलेली, भॊगोलिकदृष्ट्या सर्वांत जास्त देशांमध्ये कार्यरत असणारी टाटा स्टील ही जगामधील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. कंपनी २६ देशांमध्ये कार्यरत असून, ५० देशांना ती स्टीलचा पुरवठा करते. स्टीलची आवश्यकता असणारे महत्त्वाचे विभाग आहेत, त्यात दळणवळण आणि बांधकाम क्षेत्र, वाहन उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू, रेल्वे, विमानासंबंधी लागणारे सुटे भाग आदींचा समावेश होतो. या सर्व क्षेत्रातील महत्त्वाच्या आणि मोठ्या कंपन्यांना टाटा स्टीलकडून स्टील व सुटे भाग पुरविले जातात. कंपनीचा उत्पादन खर्च कमी असून, त्यांच्या नियंत्रणात आहे. कंपनीचे मागील सात तिमाहींचे निकाल अतिशय चांगले असून, मार्च तिमाहीमध्ये त्यांचा नफा ७५ टक्क्यांनी वाढला आहे. तसेच विक्री ७०,००० कोटी रुपये या त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत उच्चांकी स्तरावर पोचली आहे.
एप्रिल २०१९ मध्ये कंपनीने निर्णय घेतला, की प्रत्येक आर्थिक वर्षात ते त्यांचे कर्ज ७५०० कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचे प्रयत्न करतील. मार्च २०२१ पर्यंत कंपनीने त्यांचे कर्ज ३०,००० कोटी रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे, जागतिक रेटिंग कंपन्या ‘स्टॅंडर्ड अँड पुअर’ तसेच ‘फिच’ यांनी टाटा स्टील कंपनीचे रेटिंग अर्थात मानांकन सुधारले असून, ते ‘बीबीबी-/स्टेबल’ असे केले आहे. जगामध्ये ‘गुंतवणूकयोग्य’ असे मानांकन असलेली, टाटा स्टील ही भारतातील एकमेव स्टील कंपनी आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे भारतामधील स्टीलची मागणी वाढत आहेच. परंतु, चीनमधील उत्पादन व निर्यात काहीशी थंडावल्यामुळे, कंपनीला निर्यातीसाठी मोठा वाव आहे. कंपनीने ५१ रुपये प्रति शेअर असा भरघोस लाभांश जाहीर केला आहे, जो १० रुपये मूळ किंमत असलेल्या शेअरवर आहे.
शेअरचे विभाजन का?
कंपन्या शेअर विभाजन करण्याचे प्रमुख कारण असते बाजारामध्ये ‘लिक्विडीटी’ अर्थात तरलता वाढविणे; तसेच रिटेल अर्थात सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग वाढविणे. टाटा स्टीलच्या प्रवर्तकांकडे ३४ टक्के शेअर आहेत, तर संस्थात्मक सहभाग ४४ टक्के आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे फक्त २२ टक्के शेअर आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या विभाजनाचा रेशो १०:१ असा आहे. आज कंपनीचा १ शेअर १० रुपये किमतीचा आहे. त्याचे १० शेअरमध्ये विभाजन होऊन एक शेअर हा १ रुपया किमतीचा होणार आहे. १० रुपये मूळ किंमत असलेल्या शेअरचा शुक्रवारचा बंद भाव होता १२८७ रुपये! अर्थात विभाजन झाल्यावर त्याची बाजारातील किंमत होईल त्या प्रमाणात कमी होईल. या प्रक्रियेमध्ये शेअर वाढले, तरी भागभांडवलाची रक्कम तीच रहाते. गुंतवणूकदारांच्या प्राप्तिकरावर याचा काहीही परिणाम होत नाही.
ज्यांच्याकडे टाटा स्टील कंपनीचे शेअर आहेत, त्यांना हे शेअर मिळविण्यासाठी काहीही करावे लागणार नाही. त्यांच्या डी-मॅट खात्यामध्ये आपोआपच एका शेअरच्या ऐवजी दहा शेअर जमा होतील. १०० शेअर असतील, तर त्याचे १००० शेअर होतील. अर्थात, शेअरची बाजारामधील किंमत त्यानुसार खाली आल्याने, गुंतवणूकदारांना लगेच काही फायदा होणार नाही. परंतु, कालांतराने, तरलता वाढल्यामुळे; तसेच शेअरभाव सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आटोक्यात आल्याने, त्यांचा सहभाग वाढतो. बहुतेक सर्वसामान्य गुंतवणूकदारांना, १००० रुपये देऊन १ शेअर घेण्यापेक्षा, १ रुपयाचे १००० शेअर खरेदी करणे प्रशस्त वाटते.
शेअरचे विभाजन हे जरी बाजारामध्ये सकारात्मक संकेत देत असले, तरीही शेअरचा भाव विविध गोष्टींवर अवलंबून असतो आणि त्यात चढ-उतार हे होतच असतात. त्यामुळे यातील गुंतवणूक दीर्घकाळासाठी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करणे योग्य होईल.
Web Title: Suhas Rajderkar Writes Stock Split Strong Company Tata Steel
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..