esakal | सक्सेस स्टोरी : ‘क्रेड’  देते ‘रिवॉर्ड’
sakal

बोलून बातमी शोधा

Kunal-Shah

क्रेडिट कार्ड घेणे हे जोखमीचे असते, असे कित्येक तज्ज्ञांनी म्हटले असले तरी वेळेवर बिल भरणाऱ्यांसाठी मात्र ते फायदेशीर ठरू शकते. कारण, पैशाचे योग्य व्यवस्थापन करण्याची कला त्यांच्याकडे असते.

सक्सेस स्टोरी : ‘क्रेड’  देते ‘रिवॉर्ड’

sakal_logo
By
सुवर्णा येनपुरे-कामठे

क्रेडिट कार्ड घेणे हे जोखमीचे असते, असे कित्येक तज्ज्ञांनी म्हटले असले तरी वेळेवर बिल भरणाऱ्यांसाठी मात्र ते फायदेशीर ठरू शकते. कारण, पैशाचे योग्य व्यवस्थापन करण्याची कला त्यांच्याकडे असते. क्रेडिट कार्ड बिल उशिरा भरणाऱ्यांसाठी जसा दंड असतो, तसेच बिल वेळेवर भरणाऱ्यांसाठी काही ‘रिवॉर्ड’ही असायला हवेत नाही का?
बरोबर, हीच संकल्पना उचलली ती ‘क्रेड’ या फिनटेक कंपनीने! 

‘क्रेड’ची स्थापना २०१८ मध्ये झाली असून, त्याचे संस्थापक असलेले कुणाल शहा हे मूळचे गुजरातचे आहेत. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर लवकर आल्याने वयाच्या १६ व्या वर्षी कुणाल कमवायला लागले. त्यासाठी त्यांनी सायबर कॅफे काढण्याबरोबर अनेक उद्योग केले. ‘क्रेड’ ही कुणाल यांची पहिली कंपनी नाही, ‘फ्रीचार्ज’ या यशस्वी स्टार्टअपची सुरवातही त्यांनीच केली होती. टेक्निकल क्षेत्रातील दोन यशस्वी स्टार्टअप सुरू केलेल्या कुणाल यांचे शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये झालेले नसून, त्यांनी तत्त्वज्ञानामध्ये मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘फ्रीचार्ज’ची २०१५ मध्ये विक्री केल्यानंतर, कुणाल यांनी बराचसा वेळ प्रवासासाठी घालवला आणि कुतूहलापोटी त्यांनी विकसित देशांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना एक गोष्ट आढळली, ती म्हणजे तेथील कार्यक्षम प्रणाली! विकसित देशांमध्ये पेट्रोल पंपावर सुविधा देण्यासाठी माणसे नसत, तर फक्त टेक्नॉलॉजी असे. कोणत्याही सुपर मार्केटमध्ये कॅशिअर नसत, तिथे ग्राहकांसाठी चेकआउट काउंटर असे. कुणाल म्हणतात, ‘तेथील लोकांनी त्या प्रणालीवर विश्वास ठेवला. कारण ती प्रणाली त्यांना, प्रामाणिकपणे बिल भरल्याबद्दल बक्षीसही देत होती. परंतु, त्यानंतर ती व्यक्ती घरी गेल्यानंतर त्यांना त्या बक्षिसाची अप्रत्यक्षरीत्या किंमत चुकवावी लागे. कारण, तुम्ही बिलापेक्षा एक रुपया रक्कम कमी दिली, तरी तुम्हाला ३० विविध शुल्क लागते, ज्यातून तुमच्या मूळ बिलापेक्षा अधिक रक्कम तुम्हाला भरावी लागल्याचे तुमच्या नंतर लक्षात येत असे. कारण त्या प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव होता. त्यामुळे माझ्या डोक्यात कल्पना आली, की अशी प्रणाली तयार करण्याची गरज आहे, जी भारतातील विश्वासार्ह लोकांना पुरस्कृत करेल आणि इतरांनाही त्यांच्यासारखे बनण्यास प्रेरित करेल.’ आणि त्यातून, सुरवात झाली ती ‘क्रेड’ची! 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘क्रेड’ या ऑनलाइन व्यासपीठामार्फेत क्रेडिट कार्डची बिले भरली जातात आणि तिथून बिले भरल्याबद्दल त्यांना बक्षीस दिले जाते. हे बक्षीस ‘रिवॉर्ड’च्या स्वरूपात असते. याबदल्यात आपली माहिती विकली जाण्याच्या भीतीवर कुणाल म्हणतात, ‘विश्‍वासार्हता हा आमच्या कंपनीचा पाया असल्यामुळे, ग्राहकांच्या परवानगीशिवाय आम्ही त्यांची माहिती कोणालाही कधीही देत नाही.’

‘क्रेड’ आपल्या युझरला ‘रिवॉर्ड’ देते; कारण त्यांनी आपला ग्राहक हा विश्‍वासार्ह असल्याची खात्री केलेली असते. ‘क्रेड’मार्फत क्रेडीट कार्डचे बिल भरण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तिथे रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर ‘क्रेड’ तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’ (सिबिल स्कोअर) तपासते. यावरून तुमची विश्वासार्हता कळते. तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’ ७५० हून अधिक असल्यास तुम्हाला ‘क्रेड’चे सदस्यत्व मिळते. 

‘क्रेड’ने नुकत्याच ‘रेंट पे’ आणि ‘क्रेडिट लाईन’ अशा दोन नव्या सुविधा देण्यासही सुरवात केली आहे. सध्या ‘क्रेड’ची बुक माय शो, फ्रेश मेन्यू, अर्बन लॅडर, बॉडी क्राफ्ट अशा अनेक कंपन्यांशी भागीदारी आहे. ‘क्रेड’चे सध्या ५८ लाखांहून अधिक सदस्य असून, सुरवातीला तोट्यात असलेला हा व्यवसाय २०२० पासून नफा कमवायला लागला आहे. 

Edited By - Prashant Patil

loading image