मिस्त्रींच्या हकालपट्टीसाठी 13 डिसेंबरला बैठक

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

कोण आहेत हुसेन?
इशात हुसेन हे टाटा समूहातील अनेक कंपन्यांचे संचालक आहेत. यात टाटा स्टील, व्होल्टाज यांचा समावेश आहे. टीसीएसच्या अध्यक्षपदी नवा स्थायी अध्यक्ष येईपर्यंत ते या पदावर असतील. सध्या ते व्होल्टाज आणि टाटा स्कायचे अध्यक्ष आहेत.

मुंबई: टाटा सन्स आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वाद टोकाला पोचले आहेत. टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने मिस्त्री यांना टीसीएसमधून बाहेर काढण्यासाठी येत्या 13 डिसेंबरला भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. टीसीएसने मिस्त्री यांची अध्यक्षपदावरून दूर करण्यासाठी सर्वप्रथम बैठक बोलावली असून त्यानंतर टाटा केमिकल्स आणि इंडियन हॉटेल्स या कंपन्या देखील मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यासाठी बैठक बोलवण्याची शक्यता आहे.

टीसीएस ही टाटा समूहातील अग्रणी कंपनी असून, गेल्या आठवडय़ात टाटा सन्सने विशेष अधिकारांचा वापर करत सायरस मिस्त्री यांना कंपनीच्या अध्यक्षपदावरून केले आहे. आता त्यांच्या जागी, ईशात हुसेन यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. आता यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी 13 डिसेंबरला भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांची हकालपट्टी झाल्यानंतर टाटा सन्स आणि मिस्त्री यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मिस्त्री यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या शापूरजी पालनजी सूमहाचा टाटा समूहात 18.41 टक्के हिस्सा आहे. मिस्त्री यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून रतन टाटा आले असले, तरी सूमहातील महत्त्वाच्या कंपन्यांचे अध्यक्षपद मिस्त्री यांच्याकडेच आहे. यात इंडियन हॉटेल्स, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांना हटविण्याची मोहीम सुरू झाली आहे.

Web Title: TCS will hold EGM on Dec 13 to remove Cyrus Mistry as director