
गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं बघायला मिळालं आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्याचे दर कमी झाले.
नवी दिल्ली - गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं बघायला मिळालं आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्याचे दर कमी झाले. दहा ग्रॅम सोन्याचा दर 48 हजार 184 रुपये इतका झाला आहे. तर एक किलो चांदीचा दर 60 हजार रुपयांपेक्षा कमी झाला आहे. व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, ऑगस्ट महिन्यात सोन्याने उच्चांक गाठला होता.
चार महिन्यात सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आता घसरण होत आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात सोन्याची मागणी वाढली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून सोन्याची खरेदीही वाढली आहे. सोन्याचे दर असेच कमी होत राहिले तर विक्रीत वाढ होईल असा अंदाज आहे.
इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार मागणी वाढत आहे. किंमत कमी झाल्याने ग्राहक सोन्याची खरेदी कऱण्याकडे वळले आहेत. अर्थव्यवस्थासुद्धा पुन्हा रुळावर येत असल्यानं सोन्याची खरेदी करण्याचं प्रमाण वाढल्याचं म्हटलं जात आहे.
हे वाचा - कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी; बॉसच्या एका निर्णयाने झाले करोडपती!
राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचे दर 43 रुपयांनी कमी होऊन 48 हजार 142 रुपये झाले आहेत. याआधी गुरुवारी हाच दर 48 हजार 185 इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याचा दर 1810 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील सराफ बाजारात चांदी 36 रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदीचे प्रति किलोग्रॅम दर 59 हजार 250 रुपये इतके असून सोमवारी हाच दर 59 हजार 286 रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे प्रति औंस दर 23.29 डॉलर इतके आहेत.
हे वाचा - कोरोना काळातही US मधील श्रीमंतांच्या संपत्तीत 7,44,20,48,88,00,000 रुपयांची वाढ
कोरोना व्हॅक्सिन लवकर येण्याच्या शक्यतेमुळे सोन्याच्या किंमतीवरील दबाव वाढला आहे. याशिवाय या महिन्यामध्ये गोल्ड ईटीएफच्या होल्डिंगमध्ये 10 लाख औंसने घसरण झाली आहे. यातून असेच संकेत मिळतात की, गुंतवणूकदार हळू हळू होल्डिंग कमी करत आहेत. परदेशी बाजारात सोन्याचे दर गेल्या चार महिन्यात सर्वात खालच्या पातळीवर आले आहेत. 7 ऑगस्टला सोन्याचा दराने उच्चांक गाठला होता. 56 हजार 200 रुपये इतका 10 ग्रॅम सोन्याचा दर त्यादिवशी होता. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली असून आतापर्यंत 8 हजार रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे.