राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना २०२१ मध्ये मिळणार १९ सुट्ट्या

तानाजी जाधवर 
Thursday, 3 December 2020

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षातील सुट्ट्याचे दिवस जाहीर केले आहे. पुढील वर्षी एकूण १९ सुट्ट्या आल्या असून पाच सुट्ट्यांच्या दिवशी रविवार आल्याने त्याचा काही प्रमाणात तोटा सरकारी कर्मचाऱ्यांना झाल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षातील सुट्ट्याचे दिवस जाहीर केले आहे. पुढील वर्षी एकूण १९ सुट्ट्या आल्या असून पाच सुट्ट्यांच्या दिवशी रविवार आल्याने त्याचा काही प्रमाणात तोटा सरकारी कर्मचाऱ्यांना झाल्याचे दिसून येत आहे.

२०२० वर्ष कोरोनाच्या प्रभावाने अत्यंत भितीचे व त्रासदायक गेल्याने नवीन वर्षी तरी आलेल्या तणावापासून मुक्त होण्यासाठी अनेकांनी नियोजन करण्याची मानसिकता दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असली तरी अजूनही जिल्ह्यासह राज्यामध्ये त्याचा प्रभाव दिसत नसल्याचे चित्र आहे. तरीही अजूनही भिती गेलेली नाही, त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचे अवाहन करण्यात येत आहे. २०२० मध्ये २२ मार्च पासून आजपर्यंत राज्यातील नागरीक हा कोरोनाच्या दहशतीखाली असल्याने त्याला मनसोक्त जगता आल्याचे दिसत नाही. 

हे ही वाचा : डॉक्टरांचे चप्पलच्या नादात गेले सव्वा लाख ; ऑनलाइन फसवणूक, गुन्हा दाखल

मनुष्य हा समाजशील प्राणी असल्याने त्याला मनमुरादपणे जगण्याची सवय लागलेली आहे. अशा काळात घरामध्ये कोंडून घेऊन बसण्याची वेळ त्याच्यावर आली होती. त्यातून काही प्रमाणात सवलत मिळाली असली तरी धोका अजूनही टळलेला नसल्याने मुक्तपणे वावरण्यासाठी नवीन वर्षाकडून अधिक अपेक्षा आहेत. त्यामुळे नवीन वर्षामध्ये सुट्ट्याचे नियोजन बघण्याचा प्रघात असतो. शुक्रवारी सुट्टी आल्यास साहजिकच पुढील दोन दिवसाच्या सुट्ट्या असा एकत्रित चांगला प्लॅन होतो. नवीन वर्षाला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. 

हे ही वाचा : शेतकऱ्यांनी केलाय सोयाबीनचा साठा; भावात कायम चढ-उतार

नव्या वर्षी कोणती सुट्टी रविवारी आहे, कोणती सुट्टी शुक्रवारी आली आहे. ज्याचा प्लॅन करता येतील, याचेही जोरदार नियोजन अनेकांनी सुरु केलही असणार आहे. वर्षाची सुरुवात शुक्रवारने होणार असून प्रजासत्ताकाची वर्षातील पहिली शासकीय सुट्टी २६ जानेवारीला मिळणार आहे. तर १९ फेब्रुवारी शुक्रवारी येत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्याचा आनंद सरकारी कर्मचाऱ्यांना अगदी अवघ्या दिड महिन्याच्या अंतरानेच मिळू शकणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून २०२१ मधील सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादी जाहीर केल्याने येत्या वर्षात कोणते सण कोणत्या तारखेला आले आहेत. याचीही माहिती मिळाली आहे. २९ मार्चला होळीची सुट्टी सोमवारी आल्याने यामध्येही तीन दिवस सलग सुट्टी मिळणार आहे. याशिवाय दोन एप्रिल, सप्टेंबरमध्ये गणेश चुतर्थी व ऑक्टोबरमध्ये दसरा शुक्रवारी आल्याने तेव्हाही सलगच्या सुट्ट्याचा आनंद सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

दिवाळीच्या सणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच दिवाळी साजरी होणार असल्याचे दिसून येत आहे. लक्ष्मीपूजन गुरुवारी, बलिप्रतिपदा शुक्रवारी व पुढील दोन दिवस असे चार दिवसाची सुट्टी सलगपणे उपभोगता येणार आहे. त्याच महिन्यामध्ये गुरुनानक जयंतीची सुट्टीही शुक्रवारीच आल्याचे दिसून येत आहे. साहजिकच गेल्या वर्षीचा ताण तणाव पुढील वर्ष पूर्ण करण्याची अत्यंत चांगली संधी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाल्याचे दिसून येत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A total of 19 leave will be given to government employees next year