'जियो'च्या प्रतिस्पर्ध्यांना ट्रायकडून 3,050 कोटींचा दंड

वृत्तसंस्था
शनिवार, 22 ऑक्टोबर 2016

या कंपन्यांनी रिलायन्स जियोला इंटरकनेक्शन पॉईंट्स उपलब्ध न करुन दिल्याने जियोच्या क्रमांकावरुन ही तीन नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना कॉल करण्यास अडचणी येत आहेत, असा आरोप रिलायन्स जियोतर्फे करण्यात आला होता.

नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या रिलायन्स जियोच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना एकत्रितपणे तब्बल 3,050 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे. या कंपन्यांनी रिलायन्स जियोला 'इंटरकनेक्शन' सुविधा देण्यास नकार दूरसंचार परवान्यात नमूद करण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्याचे ट्रायने म्हटले आहे. 

या कंपन्यांनी रिलायन्स जियोला इंटरकनेक्शन पॉईंट्स उपलब्ध न करुन दिल्याने जियोच्या क्रमांकावरुन ही तीन नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना कॉल करण्यास अडचणी येत आहेत, असा आरोप रिलायन्स जियोतर्फे करण्यात आला होता.

यावर ट्रायने म्हटले आहे की, एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया त्यांच्या दूरसंचार परवान्यातील नियमांचा भंग केला ही बाब दृश्य आहे. हे कृत्य सार्वजनिक हिताच्या विरोधात आहे. नियमांप्रमाणे अशा कंपन्यांचा परवाना रद्द होऊ शकते. परंतु यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार असल्याने कंपन्यांना दंड ठोठावण्यात येईल. एअरटेल आणि व्होडाफोन सुमारे 21 परिमंडळांसाठी (जम्मू काश्मीर वगळता) 1,050 कोटी रुपयांचा दंडासाठी पात्र आहेत, तर आयडियाला 19 परिमंडळांमध्ये (हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, आणि ईशान्य भारतातील राज्ये वगळता) 950 कोटी रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

दुसरीकडे, रिलायन्स जियोच्या 4जी इंटरनेटची स्पीड इतर कंपन्यांच्या तुलनते सर्वांत कमी असल्याचे ट्रायच्या चाचणीत आढळून आले आहे. देशात एअरटेलची 4जी इंटरनेट स्पीड सर्वाधिक (11.4 एमबीपीएस) असून त्यापाठोपाठ अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन्स (7.9 एमबीपीएस), आयडिया (7.6 एमबीपीएस) आणि व्होडाफोनचा (7.3 एमबीपीएस) क्रमांक लागतो. जियोचा स्पीड 6.2 एमबीपीएस आढळून आला आहे.

Web Title: TRAI wants Jio rivals to pay Rs. 3,050 crore fine