ट्रम्प यांना भारतातूनही कमाई

पीटीआय
शुक्रवार, 18 मे 2018

ट्रम्प यांची आर्थिक उलाढाल 
१.४ अब्ज डॉलर :एकूण संपत्ती
४५.२ कोटी डॉलर : वार्षिक उत्पन्न

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील बांधकाम क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीतून काही उत्पन्न रॉयल्टीच्या स्वरूपात मिळाले आहे. ट्रम्प यांच्या ताज्या वार्षिक आर्थिक उत्पन्न अहवालातून ही बाब समोर आली आहे. 

ट्रम्प यांच्या वार्षिक उत्पन्न अहवालाची माहिती अमेरिकेच्या नीतिमूल्य विभागाने जाहीर केली आहे. ट्रम्प यांची एकूण संपत्ती १.४ अब्ज डॉलर असून, त्यांचे उत्पन्न ४५.२ कोटी डॉलरपेक्षा अधिक आहे. त्यांनी वार्षिक उत्पन्नाचा अहवाल मंगळवारी (ता. १५) सादर केला आहे. भारतातील बांधकाम क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीतून त्यांना उत्पन्नाचे मोठे दोन स्रोत आहेत. हे दोन्ही स्रोत रॉयल्टी वर्गवारीत टाकण्यात आले आहेत. जावला रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड आणि लोढा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी झालेल्या डी टी मार्क्‍स वरळी एलएलसी व्यवहारातून १० ते ५० लाख डॉलरचे उत्पन्न ट्रम्प यांना मिळाले आहे. याचबरोबर कॉनकास्ट इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रायव्हेट लिमिटेड, ट्रिबेका क्रिएटर्स एलएलसी, रिजंट हायराईज प्रायव्हेट लिमिटेड, राज कन्ट्रक्‍शन प्रोजेक्‍ट्‌स प्रायव्हेट लिमिटेड आणि रॉब रिॲलिटी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड यांच्याशी झालेल्या डी टी टॉवर कोलकता एलएलसी या व्यवहारातून एक लाख ते १० लाख डॉलरचे उत्पन्न ट्रम्प यांना मिळाले आहे. डी टी टॉवर गुडगाव एलएलसीमधून ट्रम्प यांना २०१ डॉलरपेक्षा कमी उत्पन्न मिळाले आहे. हे वगळता इतर व्यवसायांतील उत्पन्न ट्रम्प यांनी वार्षिक उत्पन्न अहवालात दाखविलेले नाही. 

कोहेन यांना पैसे दिले 
खासगी वकील मायकल कोहेन यांना निवडणुकीतील खर्चापोटी अडीच लाख डॉलर दिल्याचा खुलासा डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. यातील १ लाख ३० हजार डॉलर पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिला देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. 

स्थलांतरित हे जनावरे
ट्रम्प यांनी स्थलांतरितांची तुलना जनावरांशी केली, तसेच स्थलांतर कायद्यावरही ‘मंद’ म्हणून टीका केली. अमेरिका-मेक्‍सिको सीमेवरील परिस्थितीबाबतच्या बैठकीत त्यांनी राग व्यक्त केला. 

Web Title: Trump earns from India