दोनशे, पाचशेच्या नोटांची छपाई सुरू

पीटीआय
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नवी दिल्ली - देशातील चार नोटा छपाई मुद्रणालयांमध्ये नोटांची छपाई दिवस-रात्र सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी दिली. देशातील चलन टंचाई अंदाजे ७० हजार कोटी रुपयांची असून, ती दूर करण्यासाठी अखंडितपणे नोटांची छपाई सुरू आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील चार नोटा छपाई मुद्रणालयांमध्ये एक आठवड्यापासून दोनशे व पाचशेच्या नोटांची छपाई अव्याहत सुरू आहे. प्रत्येक मुद्रणालय दिवसाला सरासरी १८ ते १९ तास नोटांची छपाई करते आणि ३ ते ४ तास छपाई बंद ठेवण्यात येते. चलन मागणी वाढल्याने निर्माण झालेल्या टंचाईला सामोरे जाण्यासाठी आता २४ तास नोटांची छपाई सुरू आहे. सर्वसाधारणपणे नोटांच्या छपाईची प्रक्रिया १५ दिवसांची असते. त्यामुळे या आठवड्याच्या सुरवातीला छापलेल्या नोटा या महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होतील.

दोन हजारच्या नोटांची छपाई बंद 
देशातील एकूण वितरणातील चलन १८.४३ लाख कोटी रुपये असून, यामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा वाटा ३५ टक्के आहे. म्हणजेच एकूण चलनात दोन हजारच्या नोटा ६.७० लाख कोटी रुपयांच्या आहेत. नियोजित योग्य मर्यादेपर्यंत हे प्रमाण पोचल्याने दोन हजारच्या नोटांची छपाई थांबविण्यात आली आहे, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Two hundred and five hundred printing presses started

टॅग्स