अर्थसंकल्पातील करवाढीच्या शक्यतेने दलाल स्ट्रीट लालेलाल, मुंबई शेअर बाजारात 937 अंशांची घसरण

कृष्ण जोशी
Wednesday, 27 January 2021

आज बँका, वाहन उद्योग, धातूनिर्मिती कंपन्या, औषध उद्योग, आयटी आदी सर्वच क्षेत्रांमध्ये घसरण झाली.

मुंबई, ता. 27: भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पपूर्वीची अनिश्चितता तसेच अमेरिकी अर्थव्यवस्थेतील डळमळीत वातावरण यामुळे आज भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी विक्रीचा जोरदार मारा केला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 937 अंशांनी घसरून 47,409 अंशांवर स्थिरावला. 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील आज 14 हजारांखाली घसरला. निफ्टी आज 271 अंशांनी घसरून 13,967 अंशांवर बंद झाला. दोनही शेअर बाजारांमधील ही घसरण दोन टक्क्यांच्या आसपास होती. सेन्सेक्सने 50 हजारांचा टप्पा गाठल्यावर त्याची सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. त्या सर्वोच्च शिखरावरून तो सुमारे अडीच हजार अंश खाली घसरला आहे.  

महत्त्वाची बातमी : भाजपाला आणखी एक धक्का ! निवडणुकीआधीच भाजप नेत्याने शिवबंधन बांधून केला शिवसेनेत प्रवेश

आज बँका, वाहन उद्योग, धातूनिर्मिती कंपन्या, औषध उद्योग, आयटी आदी सर्वच क्षेत्रांमध्ये घसरण झाली. सेन्सेक्सच्या प्रमुख 30 समभागांपैकी फक्त टेक महिंद्र, आयटीसी, पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक व नेस्ले हे सहा समभाग अर्धा ते अडीच टक्के वाढले. उरलेले सर्व 24 समभाग घसरले.

ऍक्सिस, इंडसइंड, एचडीएफसी, आयसीआयसीआय या बँकांचे समभाग तीन ते चार टक्के कोसळले. ऍक्सिस बँकेने तिमाही निकालात नफ्यात घट दाखविल्याने गुंतवणुकदारांनी त्या समभागांची विक्री केली आणि आज 632 रुपयांवर बंद झाला.

11 जानेवारीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज आज पुन्हा 1,900 रुपयांच्या खाली जाऊन 1,895 रुपयांवर बंद झाला. औषधनिर्मिती क्षेत्रातील डॉ. रेड्डी, सनफार्मा हे समभागही तीन टक्क्यांच्या आसपास घसरले. महिंद्र व मारुती यांचे दरही दीड ते तीन टक्के कमी झाले. इन्फोसीस व टीसीएस हे समभागही एक टक्क्यांच्या आसपास गडगडले. 

महत्त्वाची बातमी : अतुल भातखळकर Vs आदित्य ठाकरे : उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठकीवरून भाजपचा ठाकरेंवर निशाण 

कोरोनाशी झुंजणाऱ्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात करवाढ केली जाईल, अशा शंकेनेही शेअरबाजारात सावध वातावरण आले आहे. तर अमेरिकी फेड ची बैठक व तेथे पुन्हा पॅकेज मिळण्याबाबतची अनिश्चितता यामुळे अमेरिकी शेअर बाजारातही साशंक वातावरण आहे. याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाला.

uncertainty about budget 2021 dadal street witness bear bounce sensex falls by 973 points


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uncertainty about budget 2021 dadal street witness bear bounce sensex falls by 973 points