अतुल भातखळकर Vs आदित्य ठाकरे : उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठकीवरून भाजपचा ठाकरेंवर निशाण 

कृष्ण जोशी
Wednesday, 27 January 2021

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुंबई उपनगर जिल्ह्यातील समस्या आणि मागण्यांवर विस्तृत चर्चा करण्याची आवश्यकता आहे.

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेऊन ती चर्चेविनाच उरकण्याचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा डाव असल्याची खरमरीत टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

अतिवृष्टी तसेच कोरोनासारख्या संकटकाळात उपनगरांमध्ये न फिरकणाऱ्या आणि जनतेला एका पैशाचीही मदत न करणाऱ्या पालकमंत्र्यांनी आता कठीण काळ संपल्यानंतर तरी उपनगरात येऊन समस्या ऐकण्याचे धैर्य दाखवावे, असा टोलाही भातखळकर यांनी लगावला आहे. 

गेले वर्षभर जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याचे धाडस दाखविण्यात आले नाही. आता अल्प सूचनेवर 28 जानेवारी रोजी ही बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरविण्यात आले आहे. मात्र राज्यातील बहुतांश जिल्हा नियोजन समिती बैठका ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच प्रत्यक्ष होत असताना मुंबईची बैठक ऑनलाईन घेण्याचे काहीच कारण नाही, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 

महत्त्वाची बातमी : "स्वतःचे दामन रक्ताने लादले असणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आरोप करूच नये"आशिष शेलार यांचे राऊत पवारांवर थेट आरोप

अतिवृष्टीमुळे व त्यानंतर कोरोनाच्या साथीत उपनगर जिल्ह्यातील नागरिक होरपळून निघाले असताना सुद्धा जिल्हा नियोजन समितीची बैठक 2020 च्या जानेवारी पासून घेण्यात आली नव्हती. अखेर 28 जानेवारी रोजी (गुरुवार) ऑनलाइन बैठक घेण्याचा सोपस्कार केला जाणार आहे. परंतु या महत्वाच्या बैठकीत उपनगर जिल्ह्यातील पुढील वर्षभरासाठीच्या विकासाकामांचे नियोजन व आर्थिक आराखडा मंजूर केला जातो. अशी महत्त्वाची बैठक अल्पसुचनेवर ऑनलाइन पद्धतीने घेऊन चर्चेविनाच उरकरण्याचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा डाव असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक किमान तीन महिन्यात एकदा तरी होणे अपेक्षित असते. परंतु ही महत्वाची बैठक घेणे तर सोडाच पण पालकमंत्र्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उपनगरात वर्षभर त्यांनी पाऊल सुद्धा टाकले नाही. उपनगर जिल्ह्याच्या दृष्टीने ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मुख्यमंत्र्यांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा ‘वर्क फ्रॉम होम ओन्ली’ चे अनुकरण करत हि बैठक ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याचे ठरविले आहे, असा टोमणाही भातखळकर यांनी ठाकरे यांना लगावला आहे.

महत्त्वाची बातमी : कुणाला काय वाटेल याची पर्वा न करता जेंव्हा शिवसेनेचा खासदार भाजप आमदाराने आयोजित कार्यक्रमात लावतो थेट हजेरी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुंबई उपनगर जिल्ह्यातील समस्या आणि मागण्यांवर विस्तृत चर्चा करण्याची आवश्यकता आहे. ऑनलाईन बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधी व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना विषयनिहाय चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी नाममात्र बैठक न घेता ती प्रत्यक्ष घ्यावी अशी आग्रही मागणीही भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political news from mumbai atul bhatkhalkar vs aaditya thackeray on Suburban District Planning Committee meeting