व्यापारयुद्ध लांबणीवर 

रॉयटर्स
मंगळवार, 22 मे 2018

बीजिंग - चीनसोबतचे व्यापारयुद्ध अमेरिकेने लांबणीवर टाकले असून, जगातील आघाडीच्या दोन अर्थव्यवस्थांनी एकमेकांच्या उत्पादनांवर लावलेला जादा कर मागे घेण्यावर सहमती दर्शविली आहे, अशी माहिती अमेरिकेचे अर्थमंत्री स्टिव्हन मनुचीन यांनी दिली. 

बीजिंग - चीनसोबतचे व्यापारयुद्ध अमेरिकेने लांबणीवर टाकले असून, जगातील आघाडीच्या दोन अर्थव्यवस्थांनी एकमेकांच्या उत्पादनांवर लावलेला जादा कर मागे घेण्यावर सहमती दर्शविली आहे, अशी माहिती अमेरिकेचे अर्थमंत्री स्टिव्हन मनुचीन यांनी दिली. 

स्टिव्हन मनुचीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो म्हणाले, ‘‘चीन आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळामध्ये झालेल्या चर्चेत भविष्यातील व्यापार असंतुलन कमी करण्यासाठी आराखडा तयार करण्यावर सहमती दर्शविण्यात आली. सध्या व्यापारयुद्ध आम्ही स्थगित केले आहे. सद्य:स्थितीत उत्पादनांवर लावलेला जादा कर मागे घेण्याबाबतही सहमती झालेली आहे. वाणिज्यमंत्री विल्बर रॉस लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ऊर्जा, द्रवरूप नैसर्गिक वायू, कृषी, उत्पादन या क्षेत्रातील व्यापारवाढीबाबत ते चर्चा करतील.’’ 

अमेरिकेसोबतच्या व्यापारातील तफावत कमी करण्यासाठी चीनने दर वर्षी ३३२ अब्ज डॉलरच्या अमेरिकी वस्तू आयात करण्याची तयारी दर्शविली आहे. यामध्ये ऊर्जा आणि कृषी उत्पादनांचा समावेश प्रामुख्याने असेल. पुढील तीन ते पाच वर्षांत अमेरिकेतून चीनला होणाऱ्या कृषी निर्यातीत ३५ ते ४० टक्के वाढ होण्यासोबत ऊर्जा खरेदीत दुप्पट वाढ होईल, असा अंदाज आहे. 

दोन्ही देशांसाठी हिताचा निर्णय : चीन  
व्यापार संबंधांतील तणाव कमी करण्याबाबत अमेरिकेशी सहमती झाली असून, हा निर्णय दोन्ही देशांच्या हिताचा आहे. आम्हाला कधीही अमेरिकेसोबतच्या संबंधांत तणाव नको होता. दोन्ही देशांची व्यापारातील अनेक मुद्द्यांवर झालेली सहमती सर्वांच्याच भल्याची आहे, असे चीनने म्हटले आहे.

Web Title: US-China withdraw excess tax on products