अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी वाजपेयींची आठ महत्त्वाची पाऊले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

वाजपेयींच्या कारकिर्दीतच भारतात सर्वप्रथम 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत करण्यात आले. 2001 साली हे धोरण अंमलात आणल्यानंतर शाळेतून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गळतीत मोठ्या प्रमाणावर घट झाली होती.

पुणे : शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकाँग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा देशाच्या राजकारणावर उमटवली.

चीनशी जवळीक, पाकिस्तानशी मैत्रीचे प्रयत्न आणि कारगिलसारखे दुःसाहस पाकिस्तानने केल्यानंतर त्यांना धूळ चारण्यासही वाजपेयींनी मागे पाहिले नाही. देशाची आण्विक क्षमता सिद्ध करतानाच विकासालाही चालना दिली. तसेच त्यांनी अर्थव्यव्यस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलली. 

1. जीडीपीतील वृद्धी :

अटलजींच्या कारकिर्दीत भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात आल्या. त्यांच्या 1998 ते 2004 या कार्यकालात भारताचा जीडीपी वृद्धीदर 8 टक्क्यांवर पोचला होता. महागाई निर्देशांकात घट होत तो 4 टक्क्यांच्या खाली आला होता. परकीय चलनसाठ्यात चांगलीच वाढ झाली होती. वाजपेयींच्या कारकिर्दीत देशाला भूकंप (2001), दोन चक्रीवादळे (1999 आणि 2000), दुष्काळ (2002-2003), कच्च्या तेलातील चढउतार,  कारगील युद्ध (1999), संसदेवरील दहशतवादी हल्ला या संकटांचा सामना करावा लागूनसुद्धा अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यात अटलबिहारी वाजपेयींना यश आले होते.

2. जीडीपीतील वृद्धीदर 8 टक्के : 

जीडीपीतील वृद्धीदर 8 टक्क्यांवर गेल्यावरही वाजपेयींनी 'फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अॅक्ट' (वित्तीय जबाबदारी कायदा) आणला होता. या कायद्याचा मुख्य हेतू वित्तीय तूट कमी करणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बचत वाढवणे हा होता.

3. खासगीकरण : 

वाजपेयींच्या अनेक निर्णयांमधील मैलाचा दगड ठरणाऱ्या एक निर्णय खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा होता. खासगी क्षेत्रातील व्यापार वाढावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे सरकारचा उद्योगांमधील सहभाग कमी झाला. त्यांनी निर्गुंतवणूकीकरणासाठी एक स्वतंत्र खातेच निर्माण केले. भारत अॅल्युमिनियम कंपनी (बाल्को), हिंदुस्थान झिंक, इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि. आणि व्हिएसएनएल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील निर्गुंतवणूक हे अटलजींच्याच काळातील महत्त्वाचे निर्णय होते.

4. भारतीय टेलिकॉम क्षेत्राचा उदय  : 

वाजपेयींच्या सरकारने महसूलावर आधारित नवीन दूरसंचार धोरण आणले. त्याचा फायदा होत टेलिकॉम कंपन्यांना आपला व्यवसाय वाढवण्याची मोठीच संधी उपलब्ध झाली. त्याचबरोबर या क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी वाजपेयींनी 'टेलिकॉम डिस्प्युट सेटलमेंट अॅपेलेट ट्रिब्युनल'ची स्थापन केली होती.

5. शैक्षणिक धोरण : 

वाजपेयींच्या कारकिर्दीतच भारतात सर्वप्रथम 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत करण्यात आले. 2001 साली हे धोरण अंमलात आणल्यानंतर शाळेतून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गळतीत मोठ्या प्रमाणावर घट झाली होती.

6. परराष्ट्र धोरण

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताचे चीनबरोबरच्या व्यापारी आणि राजकीय संबंधामध्ये सुधारणा झाली होती. 2000 साली त्यांनी अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले होते. पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारावे यासाठी त्यांनी 1999 मध्ये दिल्ली ते लाहोर ऐतिहासिक बसयात्रा केली होती.

7. विज्ञान आणि तंत्रज्ञान :

वायपेयींच्या काळातच चांद्रयान- I प्रकल्पाला मंजूरी मिळाली होती. त्यांच्या कारकिर्दीतच 1998 साली त्यांनी पाच अणुचाचण्या करत भारताला अण्वस्त्र सज्ज केले होते.

8. पायाभूत सुविधांचा विकास

अर्थव्यवस्थेला चालन देण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पायाभूत सुविधांना वाजपेयींनी विशेष लक्ष दिले होते. त्यांच्या कारकिर्दीतच महत्त्वाकांक्षी सुवर्ण चतु:कोन महामार्ग योजना आणि प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना सुरू करण्यात आली. या पायाभूत सुविधांच्या विकासामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकली.

Web Title: Vajpayees eight major steps to Strong the economy