विजय मल्ल्याच्या जेटची अखेर 35 कोटींना विक्री

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

बँकांचे  सुमारे 9 हजार कोटी रुपये बुडवून परदेशात फरारी झालेल्या विजय मल्ल्याचे खाजगी विमान अखेर विकण्यात आले आहे. तीनदा लिलाव अयशस्वी झाल्यानंतर अखेर चौथ्या वेळेस जेटची विक्री करण्यास यश मिळाले.

बंगळूरु : बँकांचे  सुमारे 9 हजार कोटी रुपये बुडवून परदेशात फरारी झालेल्या विजय मल्ल्याचे खाजगी विमान अखेर विकण्यात आले आहे. तीनदा लिलाव अयशस्वी झाल्यानंतर अखेर चौथ्या वेळेस जेटची विक्री करण्यास यश मिळाले.  बंगळूरमध्ये कर्नाटक न्यायालयाने नेमलेल्या सरकारी अधिकाऱ्याने एअरबस एअरबस ए 31 9 -133 सीचा लिलाव पार पाडला. एका अमेरिकी हवाई वाहतूक कंपनीने सर्वाधिक बोली लावत 34.8 कोटींना हे विमान विकत घेतले. या लिलावामध्ये सेवा कर विभागाने घेतलेल्या मागील तीन लिलावांपेक्षा जास्त रक्कमेच्या बोली लावण्यात आल्या. लिलावाची सुरुवात 13 कोटी  रुपयांपासून सुरु करण्यात आली होती.   

'किंगफिशर एअरलाईन्स'ची सेवा कर विभागाकडे असलेली थकबाकी आणि दंड भरण्यासाठी हा लिलाव करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर आता हा विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान बऱ्याच दिवसापासून पडून असल्याने लिलावातून कमी पैसे मिळाले. मात्र विमान सुस्थितीत असते तर त्यातून 65 कोटी रुपये मिळाले असते. 

या विमानात 25 प्रवासी आणि सहा कर्मचारी बसण्याची क्षमता आहे. तसेच बेडरुम, बाथरुम, बार आणि कॉन्फरन्स हॉल अशा सुविधाही आहेत. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर जागेची अडचण होती. शिवाय जेट विमानतळावर उभे करण्यासाठी प्रति तास 13,000 ते 15,000 रुपयांचा खर्च येत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Mallya's jet finally gets a buyer