म्युच्युअल फंड एसआयपी : छोटा पॅकेट, बडा धमाका

म्युच्युअल फंड एसआयपी : छोटा पॅकेट, बडा धमाका

गुंतवणूक करताना सर्वसामान्य माणसासमोर एक महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे आपल्या मर्यादित मासिक उत्पन्नातून महिन्याच्या खर्चाची तोंड मिळवणी करत बचत करण्याचा. कारण या बचतीमधूनच विविध प्रकारची गुंतवणूक करता येत असते. बऱ्याचवेळा विविध गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करण्यासाठी एक विशिष्ट रक्कम लागतेच. परंतु सर्वसामान्य माणसाला त्यासाठी अनेक महिने बचत करावी लागणार असते.

सर्वसामान्य माणूस अशा गुंतवणूक प्रकाराच्या नेहमीच शोधात असतो ज्यात दर महिन्याला फारच थोड्या रकमेने गुंतवणूकही करता येईल आणि चांगला परतावासुद्धा मिळेल. इक्विटी हा गुंतवणूक प्रकार छोट्या रकमेने गुंतवणूक करण्याचा पर्याय देतो आणि दीर्घकालात चांगला परतावादेखील देतो. त्यातच म्युच्युअल फंडासारख्या गुंतवणूक प्रकाराच्या माध्यमातून इक्विटी आणि डेट प्रकारात गुंतवणूक करता तर येतेच. मात्र दरमहिन्याला अगदी छोट्या रकमेनेदेखील ही गुंतवणूक नियमित स्वरुपात करते येते.

म्युच्युअल फंडातील एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा एकाच एक सुलभ आणि चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडात दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते. एक म्हणजे एकरकमी गुंतवणूक (लमसम) आणि दुसरी पद्धत म्हणजे दरमहिन्याला नियमितपणे छोटी रक्कम एखाद्या विशिष्ट फंडात गुंतवत राहणे. यालाच म्हणतात एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुंतवणूकदार एकापेक्षा जास्त म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकतात. बहुतांश म्युच्युअल फंड योजनांमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याची किमान रक्कम ५०० रुपये इतकी कमी असते. म्हणजेच दरमहिन्याला तुम्ही नियमितपणे एसआयपीद्वारे ५०० रुपयांची  गुंतवणूक करू शकता. सर्वसामान्यांना दरमहिन्याला छोट्या रकमेद्वारे चांगल्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी हा एक उत्तम गुंतवणूक प्रकार आहे. शिवाय म्युच्युअल फंड योजना एकाच वेळेला अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे जोखीमसुद्धा तुलनात्मकरित्या कमी झालेली असते. 

एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्यास मिळणारे काही महत्त्वाचे फायदे,

१. छोट्या रकमेने करता येते गुंतवणूक -
दरमहिन्याला अगदी छोट्या रकमेद्वारे एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. एसआयपीत अगदी ५०० रुपयांची गुंतवणूक करता येत असल्यामुळे (काही म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम यापेक्षा कमी किंवा अधिकदेखील असू शकते. मात्र बहुतांश म्युच्युअल फंड योजनांमध्ये किमान ५०० रुपयांच्या एसआयपीद्वारे गुंतवणूक करता येते) त्यामुळे आपले महिन्याचे बजेट सांभाळून तुम्ही नियमितपणे गुंतवणूक करून भविष्यात त्याची गोड फळे चाखू शकता. दरमहिन्याला होणाऱ्या छोट्या बचतीचे गुंतवणूकीत रुपांतर करण्याचे हे एक चांगले माध्यम आहे. नोकरदार, व्यावसायिकांबरोबरच गृहिणीदेखील याचा लाभ घेत दर महिन्याला नियमितपणे गुंतवणूक करू शकतात.

२. आर्थिक उद्दिष्ट गाठणे सुलभ -
एसआयपीद्वारे गुंतवणूकदार आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार आणि गुंतवणूक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने योग्य म्युच्युअल फंड योजना निवडून गुंतवणूक करू शकतात. आपल्या नजीकच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी  आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी जोखीम आणि परतावा लक्षात घेऊन गुंतवणूक करता येते. दरमहिन्याला छोटी रक्कम गुंतवून आपले आर्थिक उद्दिष्ट किंवा गरजा पूर्ण करता येऊ शकतात. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदार नियमितपणे गुंतवणूक करत असल्यामुळे आर्थिक शिस्तदेखील निर्माण होते. शिवाय आर्थिक नियोजन करणे सुलभ होते.

३. रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग
एसआयपीद्वारे गुंतवणूकदार दरमहिन्याला नियमितपणे गुंतवणूक करत असताना शेअर बाजारातील कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीनुसार विशिष्ट युनिट्स (इक्विटी फंडांच्या बाबतीत) गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होत असतात. शेअर बाजारात चढउतार होत असतात. या दोन्ही काळात एसआयपीद्वारे आपली गुंतवणूक होत राहते. म्हणजेच जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हादेखील गुंतवणूक होते आणि जेव्हा बाजारात मंदी असते तेव्हादेखील गुंतवणूक होत राहते. जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा म्युच्युअल फंडांची एनएव्ही जास्त असते पर्यायाने कमी युनिट्स गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होतात. तर जेव्हा बाजारात मंदी असेत तेव्हा म्युच्युअल फंडांची एनएव्ही कमी असते पर्यायाने जास्त युनिट्स गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होतात. यामुळे दीर्घकालात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराने तेजी आणि मंदी अशा दोन्ही काळात गुंतवणूक केलेली असते. चढ आणि उताराच्या काळातील एनएव्हीची सरासरी गुंतवणूकदाराला मोठा लाभ देऊन जाते. यालाच रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग असे म्हणतात. म्हणजेच दीर्घकालात गुंतवणूकदाराच्या गुंतवणूकीवर तेजी आणि मंदीचा विपरित परिणाम न होता चांगला लाभ मिळवता येतो.

४. चक्रवाढ व्याजाची जादू
एसआयपीची सर्वात मोठी खासियत म्हणजे चक्रवाढ व्याजाचा फायदा. एसआयपीद्वारे दरमहिन्याला नियमितपणे गुंतवणूक केल्यास आपण जमा केलेल्या रकमेवर परतावा तर मिळतोच, याशिवाय मूळ गुंतवणूक आणि त्यावरील परतावा या दोन्हींवर देखील परतावा मिळतो. म्हणजेच गुंतवणूकदाराला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. यामुळेच एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्यास दीर्घकालात छोट्या रकमेच्या गुंतवणूकीद्वारेदेखील मोठी रक्कम उभारता येते. सुरूवातीच्या काळात एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणूकीची रक्कम तितकीशी मोठी वाटत नाही. मात्र काही वर्षांनंतर गुंतवणूकीची रक्कम मोठी होताना दिसते. एसआयपीचा कालावधी जितका जास्त तितका मिळणारा परतावा आणि पर्यायाने एकूण रक्कमदेखील मोठी असते. संपत्ती निर्मितीच्या वाटेवर म्युच्युअल फंडातील एसआयपी हा एक महत्त्वाचा गुंतवणूक पर्याय ठरतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com