लॉकडाऊनमध्ये लोन मोरेटोरियमचा फायदा घेतलाय? व्याजावर व्याजाने होऊ शकते नुकसान!

Loan EMI
Loan EMI

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे 25 मार्चपासूनच देशभरात लॉकडाऊन लागू केला होता. यामुळे देशभरातील सगळ्याच आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या. यामुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले होते. यामुळे कर्जाचे हप्ते फेडणेसुद्धा अवघड होऊन बसले होते. यासाठी सरकारने लोन मोरेटोरियम द्यायचा निर्णय घेतला होता. हा निर्णय याआधी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात घेतला होता. त्यानंतर याची मुदत आणखी तीन महिन्यांनी म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. लोन मोरेटोरियम म्हणजे जर आपण मोरेटोरियम काळात ईएमआय भरला नाही तर बँक आपल्यावर कसलीही कारवाई करणार नाही. परंतु, बँक आपल्याकडून मोरेटोरियमच्या कालावधीनंतर ईएमआयच्या उर्वरित हप्त्यांवर व्याज आकारेल म्हणजे आपल्याला व्याजावर व्याज लागेल. 

'व्याजवार व्याज' म्हणजे काय?
बँकेकडून कर्ज घेतलेल्यांना 'व्याजावर व्याज' ही संकल्पना काय आहे, ते समजून घेणं आवश्यक आहे. समजा, आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले आहे. त्यांनी आपला ईएमआय ठरवला आहे. आपल्याला दर महिन्याला कर्जाच्या मुद्दलमधील काही भाग ईएमआय म्हणून भरायचा असतो तसेच त्यावर लागू होणारे व्याजदेखील भरायचे असते. जर आपण एखाद्या महिन्यात ईएमआय भरले नाही तर आपला मागील महिन्यातील ईएमआय आणि त्यावर लागू होणारे व्याज असे मिळून असलेली रक्कम ही मुद्दल बनून त्यावर व्याज लागू होईल. यापद्धतीनेच जर आपण काही आणखी महिन्यांपर्यंत ईएमआय भरले नाही तर प्रत्येक महिन्याच्या ईएमआयमध्ये व्याज समाविष्ट होऊन बनलेल्या मुद्दलींवर व्याज लागू होऊन हप्ता भरावा लागेल. यालाच व्याजावर व्याज असं म्हणतात. 

लोन मोरेटोरिमयचे नुकसान
कर्ज घेतलेल्या व्यक्तीला आपला ईएमआय वेळेवर न भरण्याचा गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो. कारण, यामुळे व्याज जमा होत राहील आणि ते साठून कर्जाचा डोंगर अधिक वाढत राहील. आपल्या ठरलेल्या कर्जाच्या व्याजदरानुसार आपल्या उर्वरित रक्कमेवर व्याज लागू होत राहील. मोरेटोरियमचा कालावधी समाप्त झाल्यानंतर, जमा झालेले व्याज आपल्या कर्जाच्या शिल्लक रकमेत अधिक होईल जे आपल्याला आपल्या बँकेच्या व्याजदरानुसार फेडावे लागेल. चक्रवाढ व्याज आपल्या कर्जाच्या शिल्लक रकमेला मोठ्या गतीने वाढवू शकते. यासाठी आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की हे नेमकं कसं होतं. 

लोन मोरेटोरियम ही कोणत्याही प्रकारची सूट नाहीये. आपल्याला आपला ईएमआय हा नंतर भरावाच लागणार आहे. आपला ईएमआय फक्त पुढे ढकलण्यात आलेला असतो. परंतु थकीत रकमेवर व्याज जमा होणे सुरूच राहील, ज्यामुळे आपला मासिक हप्ता वाढत राहील. होम लोनसारखे लाँग टर्म लोन घेणाऱ्यांचा कालावधी वाढू शकतो. यापद्धतीने आपण जर लोन मोरेटोरियम सुविधेचा लाभ घेत असाल तर आपल्याला अधिक व्याज भरावे लागेल म्हणजेच व्याजावर व्याज भरावे लागेल. मोरेटोरियमचा हिशेब हा वेगवेगळ्या कर्जांसाठी वेगवेगळा असतो. आपल्याला अधिक ईएमआय देखील भरावा लागू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com