पीएनबी: खातेदारांनी निश्चिंत रहा आणि आम्हाला थोडा वेळ द्या!

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) बँकेतील कर्मचारी 11,500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात सामील असल्याचे मान्य केले.

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) बँकेतील कर्मचारी 11,500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात सामील असल्याचे मान्य केले आहे. पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बँकेतील काही कर्मचारी यात सहभागी असल्याची स्पष्ट कबुली दिली. 

बँकेच्या 123 वर्षांच्या इतिहासात बँकेने अनेक चांगल्या-वाईट घटना अनुभवल्या आहेत. त्यामुळे आता देखील खातेदारांनी निश्चिंत रहावे आणि बँकेची विश्वासार्हता कधीही धोक्यात येऊ देणार नाही, असेही सुनील  मेहता यांनी स्पष्ट केले. 

 बँकेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी मेहता यांनी शेट्टी आणि अन्य एका कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. 'बँकेकडून कोणत्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही. शिवाय दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असून आम्हाला थोडा वेळ द्या. बँकेने सुरुवातीपासूनच गैरव्यवहार रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नांच्या माध्यमातून हा गैरव्यवहार बाहेर आणला आहे. भारतातील बँकांच्या परदेशातील शाखांच्या माध्यमातून 11,500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्यांनी बँक कर्मचाऱ्यांना मदतीने आर्थिक गैरव्यवहार केले आणि बँकेच्या यंत्रणेचा गैरवापर करत पैसे परदेशात वळवले आहेत.''असे मेहता पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. 

सर्वकाही पूर्वनियोजित?
नीरव मोदी याची पत्नी अमेरिकी नागरिक असून तीने 6 जानेवारीला देश सोडून पलायन केले. तर नीरवचा भाऊ मेहुल हा देखील बेल्जियन नागरिक असून त्याने देखील 4 जानेवारीला देश सोडला. 

Web Title: Will take full responsibility if the PNB fraud probe places onus on the bank: CEO Sunil Mehta