रिटेल क्षेत्रात वॉलमार्ट-टाटा एकत्र येणार?

tata and walmart.jpg
tata and walmart.jpg

नवी दिल्ली : रिटेल क्षेत्रामध्ये दमदार "एंट्री' करण्याच्या तयारीत असलेल्या टाटा समूहाच्या "सुपर ऍप'मध्ये वॉलमार्ट मोठी गुंतवणूक करण्याची शक्‍यता आहे. टाटा समूह सध्या ई-कॉमर्स व्यवसायात जोमाने उतरण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांचे "सुपर ऍप' येत्या डिसेंबर किंवा जानेवारीत सादर केले जाण्याची शक्‍यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉलमार्ट 20 ते 25 अब्ज डॉलर म्हणजेच 1.4 ते 1.8 लाख कोटी रुपये गुंतविण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचे समजते.
सर्वांत मोठा व्यवहार ठरणार

"वॉलमार्ट'ने मे 2018 मध्ये "फ्लिपकार्ट'मधील 66 टक्के हिस्सा 16 अब्ज डॉलरला (अंदाजे 1.1 लाख कोटी रुपये) विकत घेतला होता. त्यामुळे आता टाटांबरोबर प्रत्यक्षात व्यवहार झाल्यास तो देशातील रिटेल क्षेत्रामधील सर्वांत मोठा व्यवहार ठरणार आहे. चर्चा यशस्वी झाल्यास वॉलमार्ट आणि टाटा समूह भागीदारीमध्ये "सुपर ऍप' सादर करण्याची शक्‍यता आहे. या सुपर ऍपचे अंदाजे मूल्यांकन 50 ते 60 अब्ज डॉलर असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या माध्यमातून रिटेल क्षेत्रातील सर्वाधिक वस्तू विकला जाणारा भव्य प्लॅटफॉर्म निर्माण होऊ शकतो. त्यात खाद्यपदार्थापासून फॅशन, लाइफस्टाइल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, शिक्षण, आरोग्यनिगा उत्पादनांच्या विक्रीबरोबरच विमा आणि बिल पेमेंटची सुविधाही एकाच छताखाली उपलब्ध होऊ शकतील. शिवाय वॉलमार्टच्याच "फ्लिपकार्ट'वरील ऑफर आणि सोबतीला टाटांच्या व्यापक उत्पादनांची मालिका ग्राहकांना उपलब्ध होऊ शकेल.

दोघांसाठी "विन-विन' परिस्थिती-

वॉलमार्ट आणि टाटा समूह एकत्र आले तर दोघांसाठी "विन-विन' परिस्थिती असू शकेल. कारण वॉलमार्टला आपल्या ई-कॉमर्स व्यवसायासाठी भक्कम ब्रॅंडचे पाठबळ हवे आहे, तर दुसरीकडे टाटा समूहालादेखील ऑनलाईन रिटेल व्यवसायाला बळ देण्यासाठी जागतिक ब्रॅंड आणि सुस्थापित कंपनी हवी आहे.

स्पर्धा कोणाशी होणार?

सध्या रिटेल व्यवसायात प्रगतीला असलेली मोठी संधी लक्षात घेऊन अनेक मोठ्या कंपन्या या क्षेत्रात उतरताना दिसत आहेत. वॉलमार्ट आणि टाटा समूह एकत्र आले तर त्यांचे रिटेल क्षेत्रातील बळ वाढू शकते. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ रिटेल प्लॅटफॉर्म आणि ऍमेझॉनशी स्पर्धा करण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. टाटा समूहाकडे स्वतःची अनेक ब्रॅंडेड उत्पादने असून, टाटा क्‍लिक, स्टारक्विक, टाटा स्काय आणि क्रोमा या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत विविध उत्पादने विकली जातात. या सर्व गोष्टी "सुपर ऍप'च्या अंतर्गत समाविष्ट करून घेतली जाऊ शकतात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com