'विप्रो' 12 हजार कोटी मूल्याचे शेअर बायबॅक करणार? 

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली 'विप्रो' पुन्हा 'शेअर बायबॅक' करण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, विप्रोला सेबीकडून 12 हजार कोटी रुपये मूल्याच्या शेअर बायबॅकसाठी परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई: आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली 'विप्रो' पुन्हा 'शेअर बायबॅक' करण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, विप्रोला सेबीकडून 12 हजार कोटी रुपये मूल्याच्या शेअर बायबॅकसाठी परवानगी देण्यात आली आहे. परिणामी मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात विप्रोचा शेअर 2.63 टक्क्यांनी म्हणजे 7.20 रुपयांनी वधारून 281 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 

सलग तिसऱ्या वर्षी विप्रोकडून शेअर बायबॅक केले जाण्याची शक्यता आहे. विप्रोने यापूर्वीच 2500 कोटी रुपये आणि 11 हजार कोटी रुपयांचे शेअर बायबॅक केले होते. बायबॅकच्या माध्यमातून सुमारे 34 कोटी शेअर 320 रुपये प्रतिशेअर प्रमाणे खरेदी करण्यात आले होते. 

आज मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर 280.85 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 7.40 रुपयांची वाढ झाली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 169,191.55 कोटींचे बाजारभांडवल आहे.
 

Web Title: Wipro adds 2% on report of buyback worth Rs 12,000 crore