महिला क्रिकेटचा प्रसार करणारी स्टार्टअप विमेन क्रिकझोन

Women cricket-focused startup CricZone
Women cricket-focused startup CricZone Sakal

क्रिकेटचे चाहते भारतात असंख्य आहेत, पण बहुतांश पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांविषयी बोलतात, लिहितात किंवा वाचतात.. अजूनही आपल्या देशात (किंवा जगात म्हटलं तरी वावगे ठरणार नाही) महिला क्रिकेटविषयी फारशी चर्चा होत नाही किंवा त्याला ग्लॅमरही नाही. काही वर्षांपूर्वी हीच गोष्ट यश लाहोटी या तरुणाला खटकली आणि त्याने महिला क्रिकेटचा प्रसार व प्रचार करण्यासाठी एक ट्विटर हँडल सुरू केले. त्या ट्विटर हँडलला मिळालेल्या प्रतिसादातून त्याने वेबसाईट सुरू केली आणि त्यानंतर तर त्याने स्वतःची स्टार्टअप कंपनी ब्रेकिंग बाउंड्रीज सुरू केली. एका ट्विटने यशचे कसे बदलले हे आज आपण जाणून घेऊ या. (Women cricket-focused startup CricZone)

विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील मालेगावचा असलेल्या यश लाहोटीचे शालेय शिक्षण गावाकडेच झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण हैदराबादला तर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यात आला. पुण्यामध्ये पुणे इन्स्टिट्यूट ऑफ काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी (पीआयसीटी) या महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. 2013 मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू केले मात्र एका वर्षानंतर त्याला लक्षात आले की त्याचा इंटरेस्ट हा टेक व कल्चरल फेस्टसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यामध्ये जास्त आहे. मॅनेजमेंट, मार्केटिंग, स्पाॅन्सर मिळविणे आणि फायनान्स हाताळणे सोपे आणि आवडणारे विषय असल्याची जाणीव यशला झाली आणि त्यामुळे त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मार्केटिंग क्षेत्रातच नोकरी शोधण्यासाठी सुरवात केली. जुलै 2017 मध्ये त्याने मोजो नेटवर्क्स या कंपनीत मार्केटिंग व सोशल मीडियासंबंधित काम सुरू केले.

नोकरी करता करताच त्याने 2017 च्या वर्ल्ड कपच्या निमित्ताने 'विमेन क्रिकझोन' (Women criczone) या नावाने ट्विटर हँडल सुरू केले. महिला क्रिकेटविषयी जमेल तशी माहिती तो या हँडलवरून प्रसारित करीत असे. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. तीन ते चार महिन्यांनंतर लोकाग्रहास्तव यशने वेबसाईट सुरू केली. मात्र नोकरी करत असताना पुरेसा वेळ मिळणार नाही म्हणून त्याने काही फ्रिलान्सर नेमले जे महिला क्रिकेटविषयीचे लेख व माहिती वेबसाईटसाठी लिहित असत.

Women cricket-focused startup CricZone
कोरोना काळात तत्काळ पैसे हवेत? जाणून घ्या, बचत खात्यातून कसे काढायचे पैसे

आयुष्याला कलाटणी देणारे ट्विट

मार्च 2018 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन महिला क्रिकेट संघांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये सामना सुरू असताना प्रेक्षकांमध्ये एक 11-वर्षांची मुलगी आपल्या पालकांसोबत बसली होती. काॅमेंटरी बाॅक्सपासून ती शंभर फुटाच्या अंतरावर बसली होती आणि वारंवार काॅमेंटटरला भेटण्यासाठी तिची धडपड सुरू होती. मात्र तेथील सुरक्षारक्षक तिला आत जाऊ देत नव्हते. त्यावेळी यश लाहोटीने मोबाईलवरून त्या मुलीचा फोटो काढला आणि विमेन क्रिकझोनच्या हँडलवरून ट्विट केला. ट्विटमध्ये इसा गुहा, मेलनी जोन्स आणि अंजूम चोप्रा यांना टॅग केले. या ट्विटला मेलनी जोन्सचे प्रतिसाद दिला मात्र ती काॅमेंट्री बाॅक्समध्ये असल्यामुळे इसा व अंजूम या दोघी त्या मुलीला भेटण्यासाठी बाहेर आल्या. सुमारे दहा मिनिटे त्यांनी त्या मुलीशी गप्पा मारल्या आणि काही दिवसांनंतर इंडिया-इंग्लंड सामन्याच्या वेळी प्रत्यक्ष खेळाडूंबरोबर भेट घडविण्याचे आश्वासनही दिले.

दरम्यान, या ट्विटमुळे आयसीसीपासून बीबीसीपर्यंत सर्वच प्रसारमाध्यमांचे लक्ष त्या अकरा वर्षाच्या मुलीकडे वेधले गेले आणि त्यामुळे स्वाभाविकच विमेन क्रिकझोन हे नावसुद्धा सर्वांना माहिती झाले. त्या लहान मुलीला महिला क्रिकेट खेळांडूंना भेटण्याची संधी मिळाली तर दुसरीकडे यशला लक्षात आले की हा विषय हाताळायचा तर तो व्यावसायिक दृष्टीकोनातून हाताळला पाहिजे, एनजीओसारखा नव्हे. त्यामुळे त्याने नोकरी सोडून स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि ऑगस्ट 2018 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला.

मारवाडी कुटुंबातला असल्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणी विरोध केला नाही पण यशच्या वडिलांनी त्याला एकच गोष्ट सांगितली व ती म्हणजे व्यवसायात अपयश आले किंवा नुकसान झाले तरी त्यातून निराश व्हायचे नाही आणि कोणताही नकारात्मक विचार करायचा नाही. कुटुंबाकडून मिळालेल्या या पाठिंब्यामुळे यशचा मार्ग आणखी सुकर झाला. पण ट्विटर हँडल किंवा वेबसाईटवरून सामान्य वाचकांपर्यंत पोचता येईल, परंतु अन्य घटक म्हणजे गुंतवणूकदार, प्रत्यक्ष खेळाडू किंवा स्पाॅन्सरपर्यंत कसे पोचायचं हा प्रश्न होताच. त्याचवेळी यशची भेट झाली पाॅझीव्ह्यू कन्सल्टिंगचे विनीत देव यांच्याशी. विनीत यांना यशची संकल्पना आवडली आणि ते स्वतः या स्टार्टअपचा फायनॅन्स व इन्व्हेस्टमेंट हा विषय हाताळू लागले.

दरम्यान, महिला क्रिकेटविषयी एक अत्यंत दर्जेदार मासिक सुरू करण्याचा निर्णय यशने घेतला. त्यासाठी सिद्धांत पटनाईक हे मुख्य संपादक म्हणून रुजू झाले. मात्र त्यांच्या निधनानंतर अनन्या उपेंद्रन या व्यवस्थापकीय संपादक म्हणून तसेच अन्य लेखक व स्टाफ रुजू झाला. विनीत यांनी अॅड. चिन्मय भोसले, चितळे ग्रुपचे पार्टनर इंद्रनील चितळे, प्रवीण भालेराव या गुंतवणूकदारांना सोबत घेतले. तसेच क्रिकेट खेळाडू केदार जाधव याला गुंतवणुकदार म्हणून आणि क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांना मार्गदर्शक म्हणून विनीत यांनी सोबत घेतले. लिगालाॅजिकचे विवेक साधळे यांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याबरोबरच होडेक व्हेन्चर्स यांच्याकडूनही गुंतवणूक मिळविण्यासाठी प्रयत्न केले. (Women cricket-focused startup CricZone)

Women cricket-focused startup CricZone
देशी क्रिप्टोकरंसी 'पॉलिगॉन' पोहचली जगातील टॉप 20 मध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com