तुम्हाला मुलगी आहे ना? नऊ दिवस वाचा तिच्या भल्याचा प्लॅन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New investment plan for daughter

तुम्हाला मुलगी आहे ना? नऊ दिवस वाचा तिच्या भल्याचा प्लॅन

नागपूर : मुलीला लक्ष्मी, देवीच्या रूपात पाहिले जाते. तिला सावित्रीची लेकही म्हटले जाते. जुन्या काळात चूल आणि मूल या मर्यादेत समजल्या जाणाऱ्या मुलीच्या पंखात अस्मान गाठण्याची ताकद आहे. तिच्या पंखाला आलेले बळ हे आर्थिक कारणामुळे कमी होता कामा नये. किंबहुना ते अधिक बळकट करायला हवे. शासनाकडून यासाठी काही मदत होत असताना आपलीही मोठी जबाबदारी आहे.

पालकांनी घरातील लक्ष्मीच्या उज्ज्वल भविष्याची काळजी घेतली पाहिजे. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदण्यासाठी नवरात्रोत्सवाच्या काळात रोज दिवा लावला जातो. त्याचप्रमाणे एक दिवा हा तिच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीचा लावला पाहिजे. आज गुंतवणुकीबाबत शासकीयसोबत खासगी क्षेत्रातही अनेक प्लॅन आहेत. याच्या माध्यमातून तुम्ही तिच्या शिक्षणासोबतच लग्नाच्या चिंतेतून मुक्त होऊ शकता.

उच्च शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) तुम्हाला मुलगी आहे. तिच्या भविष्याची चिंता आहे. तिचे उच्च शिक्षण किंवा लग्नाची काळजी असतेच. ही चिंता एसआयपीच्या माध्यमातून दूर करता येऊ शकते. याबाबत बाजारात एसआयपीचे अनेक प्लॅन आहेत. महिन्याला तुमच्या सोयीनुसार किमान ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

बॅंकेच्या तुलनेत परतावा दर जास्त आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला किती वर्षे गुंतवणूक करता येते. मुलीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून १८ ते २५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करणे योग्य आहे. हा पैसा मुलीला तिच्या उच्च शिक्षणसोबत लग्नाच्या कामात येईल. पैसे परत घेण्याचा अधिकार हा गुंतवणूकदाराचा असतो. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही सेबी व आरबीआयद्वारे नियमित केली जाते. त्यामुळे ही सुरक्षित असल्याचे बोलले जाते.

‘गोल्डन फ्युचर’साठी ‘गोल्डन प्लॅन’

डिजिटल गोल्ड ः डिजिटल गोल्ड बॉॅंड हा एक पर्याय आहे. सोने खरेदी करून त्याची पूर्ण रक्कम मिळते.

डिजिटल गोल्ड म्हणजे काय?

डिजिटल स्वरूपातील सोने तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. हे सोनं विक्रेत्याकडून इन्शुअर्ड व्हॉल्टसमध्ये संग्रहित केले जाते. तुम्ही अगदी स्मार्टफोनवरूनही डिजिटल गोल्डची खरेदी करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही अगदी कमी प्रमाणात म्हणजे अगदी १०० रुपयांचे सोनेही विकत घेऊ शकता.

डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचे फायदे

डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करताना तुम्ही कितीही छोटी रक्कम गुंतवू शकता. यात सोन्याच्या शुद्धतेची १०० टक्के हमी असते. तसेच पारंपरिक सोने खरेदीत मोडणाऱ्या वळी, सोन्याची नाणी किंवा दागिन्यांप्रमाणे यावर घडणावळीचे पैसे लागत नाहीत. तसेच हे सोने डिजिटल स्वरूपात असल्याने त्याच्या सुरक्षेची जोखीम राहत नाही. तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ज्या कंपनीच्या माध्यमातून करणार आहात, त्या कंपनीचा रेकॉर्ड तपासून पाहणे गरजेचे आहे. तुमच्या कन्येचे भविष्य यातून धनसमृद्ध करता येऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजना

‘समृद्धी सुकन्या’ योजना केंद्र सरकारची आहे. शून्य ते १० वर्षे वयापर्यंतच्या मुलींच्या नावे ही काढता येते. वर्षाला किमान अडीचशे रुपये ते जास्तीत जास्त दीड लाखांपर्यंत रक्कम यात जमा करता येते. त्या वर्षानुसारच्या व्याजदराप्रमाणे रक्कम मिळते. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिच्या शिक्षणासाठी ५० टक्के रक्कम काढता येते. गुंतवणुकीला २१ वर्षे झाल्यावर योजना बंद होत असून, रक्कम मुलीच्या खात्यात वळती होते. दरम्यानच्या काळात मुलीला काही झाल्यास रक्कम पालकांना मिळते. २१ वर्षांनंतर मुलीचे लग्न झाल्यास योजना बंद होते, असे शंकरनगर पोस्ट ऑफिसच्या सहायक पोस्ट अधिकारी पुष्पा गजघाटे यांनी सांगितले.

माझी कन्या भाग्यश्री

‘माझी कन्या भाग्यश्री’ राज्य सरकारची योजना आहे. एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजन केले आहे. एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना लाभ देय राहतील. मात्र, एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ मिळणार नाही. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ७.५० लाखांच्या आत असावे. एकच मुलगी असेल तर ५० हजार जमा होतील. दोन मुली असल्यास प्रत्येकी २५ हजार जमा होतील.

-५० हजारांवर सहा वर्षांसाठी अनुज्ञेय होणारे फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल.

-५० हजारांची गुंतवणूक करून सहा वर्षांसाठी अनुज्ञेय होणारे व्याज वयाच्या १२ व्या वर्षी काढता येईल.

-१८ वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीच्या खात्यात पूर्ण पैसे जमा होतील व ते काढता येतील.

-१८ वर्षांपर्यंत मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे.

-मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास संबंधित रक्कम १८ वर्षांनंतर पालकांना मिळेल.

मुलीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अनेक चांगले पर्याय आहेत. अनेक प्लॅन आहेत. मी एलआयसीला प्राधान्य दिले आहे. एलआयसीच्या माध्यमातून मुलीच्या नावे रक्कम गुंतवणूक करते.

-रिता पिल्लेवान, आई.

‘सकाळ’कडे छायाचित्र पाठवा

कन्येसाठी दिवा लावतानाचा सोहळा कॅमेराबद्ध करा

देवीपुढे आपण दिवा लावतोच. आजपासून पुढील नऊ दिवस एकदा तरी कन्येच्या उज्ज्वल भविष्याची मनोकामना करत एक दिवा लावा. दिवा लावताना आई, वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबतचे एक आकर्षक आणि स्पष्ट छायाचित्र ‘सकाळ’कडे पाठवा. कन्येचे पूर्ण नाव आणि पत्ताही लिहा. निवडक छायाचित्रांना ‘सकाळ’मध्ये प्रसिद्धी देण्याची खास हमी. एका कन्येचे छायाचित्र एकदाच घेऊ. इतरांनाही संधी देऊ. पुढील नऊ दिवस कन्येच्या सन्मानाचा सोहळा चालेल. तुम्ही तुमचे अनुभव, व्हिडिओ आणि अधिकची छायाचित्रे ‘सकाळ’च्या ‘एक दिवा कन्येसाठी’ या फेसबुक ग्रुपवर पोस्ट करू शकता.

छायाचित्र पाठविण्यासाठी व्हाॅट्स अॅप नंबर : अतुल - ७७२२०४९८००

अंकासाठी संपर्क करा - शुभम : ९८२३९०३६८१