esakal | चर्चा ‘झोमॅटो’च्या ‘आयपीओ’ची!
sakal

बोलून बातमी शोधा

ipo

चर्चा ‘झोमॅटो’च्या ‘आयपीओ’ची!

sakal_logo
By
नंदिनी वैद्य

गेले काही महिने खूप चर्चेत असणारा ‘झोमॅटो’चा ‘बिगबँग आयपीओ’ १४ ते १६ जुलै दरम्यान बाजारात उपलब्ध होत आहे. या इश्यूसाठीचा किंमतपट्टा रु. ७२ ते ७६ असून, कमीतकमी १९५ शेअर व त्याच्या पटीत अधिक शेअरसाठी अर्ज करता येणार आहे. या बहुचर्चित ‘आयपीओ’विषयी जाणून घेऊया. (Zomato IPO: Why is there so much buzz and should you invest?)

कंपनीविषयी प्राथमिक माहिती काय सांगता येईल?

२०१० मध्ये स्थापन झालेली ‘झोमॅटो’ ही कंपनी एक ऑनलाईन फूड सर्व्हिस प्लॅटफॉर्मचे काम करते. थोडक्यात हॉटेल आणि ग्राहक यांच्यामधील दुवा बनून ग्राहकांपर्यंत हॉटेलचे खाद्यपदार्थ पोचविणे, हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. या व्यतिरिक्त हॉटेलचे डायनिंग बुकिंग, हायपरप्युअर(B2B), झोमॅटोप्रो अशा बाकीच्या सेगमेंट्समध्ये कंपनी काम करते. मागील दोन वर्षांमध्ये ‘कोविड’च्या महासाथीमुळे कंपनीच्या व्यवसायात प्रचंड वाढ झाली. सुमारे १,१३,२३३ हॉटेल आणि १,६१,६३७ डिलिव्हरी पार्टनरशी कंपनी संलग्न आहे. यावरून तिच्या व्याप्तीचा अंदाज यावा.

एकूण कंपनीची आर्थिक प्रगती कशी आहे?

मागील तीन वर्षांमध्ये उत्पन्न १३९७ कोटींवरून २११८ कोटी इतके वाढले आहे; परंतु आजपर्यंत कंपनीला नफा झालेला नाही.

हेही वाचा: निकालांच्या हंगामात नफ्याचा पाऊस, जाणून घ्या कोणत्या शेअर्स,सेक्टर्सचे नशीब चमकणार...

‘आयपीओ’ला अर्ज करायचा झाला तर जमेच्या बाजू कोणत्या?

शेअर बाजाराला नेहमीच नवनवीन कल्पना आणि नावीन्याची ओढ असते. अगदी त्याला अनुसरूनच ‘झोमॅटो’ हे कल्पक असे स्टार्टअप आहे. कन्सेप्ट स्टॉक किंवा स्मार्ट आयडिया बाजाराला नेहमीच आवडतात आणि त्याला वाजवीपेक्षा अधिक किंमत देण्यासाठी तो तयार असतो. अशा पद्धतीच्या पहिल्याच व्यवसायाची बाजारात नोंदणी होत आहे. त्यामुळे स्केअरसिटी प्रीमीयम येथे कंपनीला फायदा मिळवून देऊ शकतो. तसेच संस्थात्मक भागधारकांचा फार मोठा पाठिंबा कंपनीच्या भागभांडवलासाठी मिळालेला आहे. गेल्या १० वर्षांत ‘झोमॅटो’ने जी लीडरशिप मिळविली आहे, त्यामुळे आज एक ब्रँड म्हणून कंपनी उदयाला आली आहे. अजून एक जमेची बाजू म्हणजे कंपनीने घेतलेली कर्जे अगदी नगण्य आहेत.

हेही वाचा: अर्थसाह्यासाठी 'जे अँड के' बँकेसोबत 'टाटा मोटर्स'चे सहकार्य

कंपनीसमोरील आव्हाने काय आहेत?

आता आव्हानांचा विचार करायचा झाला, तर आजपर्यंत कंपनीने भक्कमपणे आपल्या व्यवसायाचे जाळे पसरवले आहे. सध्या फक्त ‘स्विगी’ त्यांच्या स्पर्धेत उभी आहे. परंतु, आगामी काळात अॅमेझॉन आणि रिलायन्स या क्षेत्रात उतरणार आहेत. अशावेळी सतत नवनवीन कल्पना अमलात आणूनच व्यवसाय तग धरू शकेल. प्रमुख शहरांमध्ये कंपनीचा व्यवसाय स्थिरावला आहे. त्यामुळे अधिक ग्राहकांना आपल्याकडे वळवायचे असेल, तर अधिकाधिक सवलत त्यांना द्यावी लागेल; ज्यामुळे उत्पन्न, नफा यांवर विपरीत परिणाम होऊ शकेल. तसेच कंपनीमध्ये प्रवर्तकांचा भागहिस्सा नगण्य आहे, ज्यामुळे ‘SKIN IN THE GAME’ नाही, असे म्हणावे लागेल.

‘आयपीओ’साठी शेअरकिंमत योग्य वाटते का?

या ‘आयपीओ’चा अभ्यास करणाऱ्या बहुतांश तज्ज्ञांचे असे मत आहे, की या क्षेत्रात काम करणाऱ्या बाहेरील देशांतील ज्या कंपन्या शेअर बाजारात आहेत, त्या मानाने याची इश्यू किंमत ३०-६० टक्के इतकी जास्त वाटते. तसेच अशा व्यवसायाची पहिलीच कंपनी ‘आयपीओ’ आणत असल्यामुळे आणि अजूनही ती नुकसानीत असल्यामुळे पीइ रेशो, इपीएस अशा घटकांचा अभ्यास करता येत नाही. पी/सेल्सचा वेगळा विचार करावा लागतो आणि त्यामुळे कंपनीचे विश्लेषण करणेही अवघड आहे. २५-३० टक्क्यांनी वाढणारे वार्षिक उत्पन्न हे इश्यूसाठी अर्ज करण्यासाठीचे मोठे आकर्षण असावे. कंपनीच्या व्यवस्थापनाने देखील कंपनी तोट्यातून नफ्यात कधी येऊ शकेल, याचा अंदाज दिलेला नाही.

हेही वाचा: दुसऱ्या लाटेतून सावरलो, लवकरच आर्थिक विकास मजबूत होईल!

सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी अर्ज करावा की नाही?

सर्व घटकांचा साधकबाधक विचार केला तर असे दिसून येते, की ज्या गुंतवणूकदारांना ५-१० वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करणे शक्य आहे, त्यांनी अर्ज करावा. ‘झोमॅटो’च्या रूपाने एक नवी कल्पना बाजारात येत आहे. त्यामुळे नोंदणीच्यावेळी एक प्रकारचा ‘युफोरिया’ दिसून हा शेअर वरच्या किमतीला ‘लिस्ट’ होऊ शकतो. (आता GMP साधारण प्रति शेअर रु. ९-१० इतका आहे.)परंतु, जे गुंतवणूकदार मध्यमवर्गीय आहेत व ज्यांना आपले तुटपुंजे भांडवल वापरायचे असेल, त्यांनी थोडे थांबावे. त्यांना आतादेखील बाजारात चांगला परतावा मिळवून देणारे इतर बरेच शेअर आहेत. थोडक्यात, ज्या गुंतवणूकदारांना जास्त जोखीम घेण्याची इच्छा असेल, त्यांनी एक नवी ‘थीम’ म्हणून या इश्यूस अर्ज करण्यास हरकत नाही.

(लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

loading image