बहरत गेलेले नेतृत्वगुण

सोनाली बोराटे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

"फॉर्च्युन इंडिया'च्या उद्योग क्षेत्रातील प्रभावशाली महिलांच्या यादीत 2012 पासून सलग पाच वर्षे पहिल्या वीसमध्ये त्यांचा क्रमांक अग्रस्थानी आहे. सर्वांधिक कल्पक देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जावे, तसेच महिलांना पुरेपूर संधी व प्रतिनिधित्व मिळावे, हे त्यांचे स्वप्न आहे. एवढी मोठी पदे भूषविताना अनेकदा आव्हानांचे प्रसंगही आले. कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायला त्या प्राधान्य देतात

आव्हाने काय किंवा संकटे काय, त्यांकडे आपली कौशल्ये वाढविण्याची चांगली संधी, यादृष्टीने कोणी पाहत असेल, तर त्या व्यक्तीची व्यावसायिक कारकीर्द कशी घडेल? ती उत्तरोत्तर बहरत गेली असणार, असेच कुणालाही वाटेल. देवयानी घोष हे व्यक्तिमत्त्व याचे उत्तम उदाहरण.

"नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनी'च्या (नॅसकॉम) अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. "नॅसकॉम'मध्ये पहिल्यांदाच महिलेकडे हे पद आले आहे. राज्यशास्त्रात पदवी व मार्केटिंगमध्ये एमबीए केल्यानंतर 1996 मध्ये त्या "इंटेल' कंपनीत रुजू झाल्या. नोकरीच्या पहिल्याच मुलाखतीत त्यांना "वीस वर्षांनंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहता', असे विचारले, तेव्हा "भारतातील इंटेलचे नेतृत्व करायचे आहे', असे उत्तर त्यांनी तत्काळ दिले. त्या वेळी सहज बोललेले वाक्‍य त्यांनी खरे करून दाखवले. तेथील दोन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकल्पांचे, विभागांचे नेतृत्व सांभाळले. फक्त भारत नव्हे, तर "इंटेल'च्या पूर्ण दक्षिण आशियाचे प्रमुखपद त्यांच्याकडे होते. "तुम्ही तुमच्या स्वप्नांवर विश्‍वास ठेवला आणि त्यासाठी अपार कष्ट घेण्याची तयारी ठेवली, तर ते नक्की सत्यात उतरेल,' असे त्या मानतात.

एकत्र कुटुंबात वाढलेल्या देवयानी या त्यांच्या घरातील एकुलती एक मुलगी. त्यामुळे घरातील सर्वांच्याच त्या लाडक्‍या होत्या. त्यांना अकरा भाऊ. त्या सर्वांत लहान. मुलगे जे करू शकतील ते देवयानीला करता आले पाहिजे, असे त्यांच्या वडिलांना वाटे. तसे प्रोत्साहन मिळाल्याने त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आणि पुरुषप्रधान कॉर्पोरेट जगात फार अडचणी आल्या नाहीत. वडिलांच्या फिरत्या नोकरीमुळे त्यांचा बराच प्रवास झाला. त्यांचे शालेय शिक्षण सात वेगवेगळ्या शाळांमधून झाले. वेगवेगळे प्रदेश, माणसे, संस्कृती समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न तेव्हापासूनच सुरू होता. कॉर्पोरेट जगतातील सततच्या बदलांना सामोरे जाणे, यामुळे त्यांना फारसे अवघड गेले नाही.

"फॉर्च्युन इंडिया'च्या उद्योग क्षेत्रातील प्रभावशाली महिलांच्या यादीत 2012 पासून सलग पाच वर्षे पहिल्या वीसमध्ये त्यांचा क्रमांक अग्रस्थानी आहे. सर्वांधिक कल्पक देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जावे, तसेच महिलांना पुरेपूर संधी व प्रतिनिधित्व मिळावे, हे त्यांचे स्वप्न आहे. एवढी मोठी पदे भूषविताना अनेकदा आव्हानांचे प्रसंगही आले. कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायला त्या प्राधान्य देतात.

इतर ब्लॉग्स