श्रीदेवींचे निधन अन् पत्रकारितेची तिरडी...

संतोष धायबर
शनिवार, 3 मार्च 2018

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी कोणत्याही परिस्थितीचे भान, तारतम्य न बाळगता केलेले वार्तांकन म्हणजे बेजबाबदारपणाचा कळसच म्हणावा लागेल. भारतीय प्रसारमाध्यमांनी केलेल्या बेजबाबदार वार्तांकनाची जगाने दखल घेतली अन् त्यांनी धिंडवडेही काढले. श्रीदेवी यांच्या निधनाबरोबरच भारतीय पत्रकारितेची एकप्रकारे तिरडी बांधली गेली, असे बोलले तर वावगे ठरणार नाही.

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी कोणत्याही परिस्थितीचे भान, तारतम्य न बाळगता केलेले वार्तांकन म्हणजे बेजबाबदारपणाचा कळसच म्हणावा लागेल. भारतीय प्रसारमाध्यमांनी केलेल्या बेजबाबदार वार्तांकनाची जगाने दखल घेतली अन् त्यांनी धिंडवडेही काढले. श्रीदेवी यांच्या निधनाबरोबरच भारतीय पत्रकारितेची एकप्रकारे तिरडी बांधली गेली, असे बोलले तर वावगे ठरणार नाही.

24 फेब्रुवारी 2018ची रात्र. अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईमधील एका हॉटेलमध्ये निधन. प्रथम 'फ्लॅश ब्रेक' झाला अन् चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजविलेल्या अभिनेत्रीचे निधन नेमके कशामुळे झाले, काय झाले असावे? याची माहिती जाणून घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करू लागला. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एखादी माहिती जाणून घेण्यासाठी विविध स्त्रोत निर्माण झाले आहेत. यामध्ये ट्विटर, फेसबुक, ऑनलाइन संकेतस्थळे, टीव्ही चॅनेल्स व दैनिकांचा समावेश आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतात, हे मात्र खरे.

श्रीदेवी यांचे निधन झाले पण... पुढील 72 तास विविध वृत्तवाहिन्यांनी अक्षरशः धुमाकुळ घातला. शवविच्छेदनाचा अहवाल हाती येण्यापूर्वीच प्रसारमाध्यमे तर्क-वितर्क लावून मोकळे झाले होते. प्रत्येकजण आपापल्यापरिने रंजक माहिती देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. यामागे उद्देश एकच टीआरपी वाढवणे. या टीआरपीच्या मोहापायी नको ती माहिती देऊन मोकळे होत होते. श्रीदेवी या प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे जगभरातील विविध प्रसारमाध्यमांचेही लक्ष भारतीय वृत्तवाहिन्यांकडे लागले होते. भारतीय वृत्तवाहिन्यांचा भडीमार पाहून त्यांनी तर या पत्रकारितेचे धिंडवडेच काढले अन् पत्रकारितेची तिरडी बांधली गेल्याचे दाखवून दिले.

श्रीदेवी यांचे निधन ही बातमीच एक धक्का देणारी होती. परंतु, प्रसारमाध्यमे 72 तास नको-नको ते दाखवून दुखावटा ऐवजी उत्सव साजरा करत होते की काय? अशी परिस्थिती दिसत होती. प्रसारमाध्यमांचे विविध व्हिडिओ, छायाचित्रे सोशल नेटवर्किंगवरून व्हायरल होत होती. एका बाजूला टीआरपी वाढत होता तर दुसऱया बाजूला नेटिझन्स आपला रोषही व्यक्त करताना दिसत होते. श्रीदेवी यांच्या निधनानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करताना बेजबाबदारपणा केलेला दिसून आला. यामध्ये टीव्ही चॅनेल, संकेतस्थळे व सोशल मीडियाचा समावेश आहे. अतिशोयक्तपणे वृत्त प्रसारित केल्याबद्दल पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारतीय प्रसारमाध्यमांचे धिंडवडे काढले आहेत.

जबाबदार कोण?
माहिती तंत्रत्रानाच्या युगात एखाद्या गोष्टीबाबत मोठा खजिना उपलब्ध होतो. परंतु, बिनचूक माहिती जाणून घेण्यासाठी विश्वासार्ह वाहिन्या, संकेतस्थळे आहेत. या ठिकाणी आलेली माहिती ही योग्यच, असेही समीकरण आहे. परंतु, देशामध्ये 2000 पासून खाजगी वृत्तवाहिन्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. दरम्यानच्या काळात सोशल नेटवर्किंगचाही मोठा वापर सुरू झाला आहे. वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी स्पर्धेत वाचकांवर भडिमार होतो, हे प्रत्येकजण विसरताना दिसत आहे. श्रीदेवी यांचे उदाहरण घेऊयात.
श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत शवविच्छेदनाचा अहवाल हाती येण्यापूर्वीच प्रसारमाध्यमांनी मृत्यूचे कारणही जाहीर करून टाकले होते. प्रत्येक सेकंदाला, मिनिटाला वेगवेगळी माहिती दाखवत होते. चुकीची माहिती देऊन काय साध्य करत होते? केवळ टीआरपी वाढवणे हेच का? चुकीच्या वार्तांकनाला जबाबदार कोण? चॅनेलचा टीआरपी वाढवला म्हणून आनंद साजरा करतील सुद्धा. पण दुसऱया बाजूला तुम्हीच विश्वासहार्यता गमावत आहात, हे विसरून चालणार नाही.

चौथा स्तंभावरचा विश्वास?
लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्र. पत्रकार जी माहिती देतात ती योग्य असा विश्वास. पण... या विश्वासालाच तडा जातो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टीआरपी की विश्वासहार्यता याबद्दल विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. टीआरपी कधीही मिळू शकतो. परंतु, एकदा उडालेला विश्वास मिळवणे अवघड आहे. यामुळे चौथ्या स्तंभावरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर बिनचूक वृत्त देणे गरजेचे आहे. अन्यथा तडा गेल्याशिवाय राहणार नाही.

दिलगिरी दूरचीच गोष्ट?
विविध प्रसारमाध्यमांच्या तुलनेच वृत्तपत्रांमध्ये बातमी उशिरा येते. पण, बिनचूक येते. यामुळेच आजही छपाईमाध्यमाने आपले स्थान अबाधित राखले आहे. ऑनलाइन माध्यमामध्ये एखादी चूक झाल्यास ती सुधारली जाते. परंतु, वृत्तवाहिन्यांचे तसे नाही. सर्वाधिक आधी बातमी देण्याच्या नादात चूक होते अन् हीच चूक विश्वासहार्यतेला तडा निर्माण करते. वाचक तत्काळ ही चूक सोशल नेटवर्किंगवर व्हायरल करतात.
वृत्तपत्रांमध्ये चुकून एखादी चूक झाली तर दिलगिरी मागितली जाते. परंतु, टीव्ही माध्यमांमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत चुकीची माहिती देऊन अकलेचे कांदे तोडले. पण, कोणत्याही चॅनेलने दिलगिरी व्यक्त केल्याचे उदाहरण नाही. सर्वाधिक अगोदर चुकीची माहिती द्यायची पण... दिलगिरी व्यक्त करायची नाही. ही कोणती विश्वासार्हता.?

दुखवटा की रंजकता...
श्रीदेवी यांच्या निधनानंतर दुखवटा ऐवजी रंजक माहिती देऊन अनेकांनी आपला टीआरपी वाढवून घेतला. एखादी बातमी देण्यासाठी आम्ही कसे एक पाऊल पुढे आहोत, यासाठीच का हा अट्टहास? श्रीदेवी यांचे असंख्य चाहते दुःखात बुडाले असताना चुकीची माहिती त्यांच्यावर बिंबवली जात होती. चाहत्यांना खरी ती माहिती समजलीच पण... प्रसारमाध्यमांची विश्वासार्हतेचे काय? जगाने भारतीय प्रसारमाध्यमांची धिंडवडे काढलेत. यापुढे तरी धडा घेणार का खरा प्रश्न आहे.

विश्वासार्हता महत्वाचीच...
पत्रकारिता करत असताना विश्वासार्हता खूप महत्त्वाची आहे. पण, या विश्वासार्हतेला तडा जातो की काय अशी परिस्थिती दिवसेंदिवस जाणवू लागली आहे. स्पर्धा आहे हे मान्य आहे. परंतु, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चुकीची माहिती देणे योग्य नक्कीच नाही. यामुळे पत्रकारितेमध्ये विश्वासहार्यता महत्त्वाची आहे अन् ती टिकवून ठेवणेसुद्धा तेवढी जबाबदारी सर्वच प्रसारमाध्यमांची आहे.

आज तक या वृत्तवाहिनीने तर 'मौत का बाथटब' दाखवून पत्रकारितेचे धिंडवडेच काढले. सीएनएन न्यूज 18 या वृत्तवाहिनीने तर फोटो शॉपचा वापर करून बाथटबमध्ये श्रीदेवीचे छायाचित्र दाखवले. एका वाहिनीने तर चक्क दारूचा प्यालाच दाखवला. टीव्ही 9 या तेलगू वाहिनीने बाथटबमध्ये श्रीदेवी पडलेल्या व त्यांचे पती बोनी कपूर बाजूला दाखवले. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीने श्रीदेवी यांचे बाथरूमधील शेवटचे 15 मिनिटे दाखवले. विविध वृत्तवाहिन्यांनी चुकीच्या पद्धतीने वार्तांकन केल्याचे दिसून आले. शिवाय, श्रीदेवी यांचा शवविच्छेदनाचा अहवाल हाती येण्यापूर्वी विविध वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह चर्चा करताना अनेकांनी अकलेचे कांदे तोडले, असे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

श्रीदेवी यांच्या निधनाबरोबरच भारतीय पत्रकारितेची एकप्रकारे तिरडी बांधली गेली, हे आता जगजाहीर झाले आहे. टीआरपीच्या चक्रात अडकलेल्या प्रसारमाध्यमांनी यापुढे तरी धडा घेणे गरजेचे आहे...!

इतर ब्लॉग्स