'ट्रेकिंग'ला जा पण जरा जपूनच..!

 'ट्रेकिंग'ला जा पण जरा जपूनच..!

एप्रिल महिना सुरु झाला आहे. आपल्याकडे उकाड्याने हैराण करणारा उन्हाळा दिवसागणिक वाढत असला तरी उत्तरेत, हिमालयामध्ये तुलनेने थंड व आल्हाददायक वातावरण जम बसवत आहे. एप्रिल- मे या महिन्यांमध्ये हिमालयात 2500 मीटर उंचीच्या शिखरापासून 8848 मीटर उंच 'माऊंट एव्हरेस्ट' या जगातील सर्वात उंच शिखरापर्यंत मोहिमा केल्या जातात. त्यासाठी हजारो गिर्यारोहक टप्याटप्याने हिमालयाच्या कुशीत स्थिर- स्थावर होत आहेत. फक्त शिखर मोहिमाच नव्हे तर छोटे- मोठे ट्रेक्‍स, थंड प्रदेशात भ्रमंतीसाठी तसेच काहीजण आध्यात्मिक पर्यटनासाठी हिमालयामध्ये दरवर्षी या काळामध्ये मोठ्या संख्येने जात असतात.

महाराष्ट्रातील असंख्य लोक पर्यटन, छोटे-मोठे ट्रेक्‍स व अतिउंचीवरील शिखरांवर मोहिमांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. हिमालयामध्ये ट्रेक्‍सला वाढता प्रतिसाद, युवक- युवतींचा गिर्यारोहण मोहिमांमधील वाढता सहभाग या उल्लेखनीय बाबी जरी असल्या तरी गेल्या काही वर्षात गिर्यारोहण व ट्रेकिंग संदर्भातील दुर्घटनांत वाढ झालेली आहे, ही तेवढीच दुर्दैवाची गोष्ट आहे. यातील काही दुर्घटना या नैसर्गिक असल्या तरी बहुतांश घटनांमध्ये मानवी चूकच कारणीभूत ठरली आहे. या दुर्घटना का घडतात, त्यांच्या मागचे कारण काय व हे कसे टाळता येईल, याविषयी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

2017 च्या जुलै महिन्यात पुण्यातील आर्किटेक्‍ट सुभाष टकले यांचे 'माऊंट नून' या कारगिल हिमालयामध्ये असणाऱ्या 7135 मी उंचीच्या शिखरावरील मोहिमेवर असताना चढाई दरम्यान त्यांचा मृत्यू झाला, पाठोपाठ काहीच दिवसात पुण्याच्याच पद्मेश पाटील स्टोक कांगरी या शिखरावरील मोहिमेवर असताना 18 हजार फुटांवरून कोसळला व गंभीर जखमी झाला. गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये मुंबई, नारायणगाव इत्यादी ठिकाणच्या गिर्यारोहकांचे/ ट्रेकर्सचे अपघात झाल्याचे कळाले. या सर्व दुखःद घटना एक गिर्यारोहक म्हणून पचविणे अवघड आहेतच मात्र जेव्हा या घटनांची कारणमीमांसा केली तेव्हा लक्षात आले बहुतांश वेळी मानवी चुकीमुळे हे अपघात झाले. यातील बरेच अपघात टाळता आले असते जर काही ठिकाणी अंतिम शिखर चढाई करत असताना आपल्या शारीरिक ऊर्जेचा अंदाज बांधून पुढील निर्णय घेतला असता किंवा प्रतिकूल परिस्थिती जीवघेणी ठरू शकते, हे समजावून घेऊन, काहीही झाले तरी चढाई करायची आहेच हा अट्टहास बाजूला ठेवला असता. मात्र आता हा सर्व भूतकाळ झाला, या भूतकाळातून काहीतरी शिकून भविष्यकाळ समृद्ध व सुरक्षित केला पाहिजे.

सह्याद्रीच्या कुशीतील दऱ्याखोऱ्यांमध्ये गिर्यारोहण करणे व हिमालयामध्ये गिर्यारोहण करणे, या संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. हिमालयातील गिर्यारोहणासाठी लागणारी तंदृस्ती, त्यासाठी केली जाणारी तयारी हे वेगळ्या प्रकारचे आहे. हिमालयात जाण्याआधी काय केले पाहिजे, मानवनिर्मित अपघात कसे टाळावे, या संदर्भात काही गोष्टी अंमलात आणणे आवश्‍यक असते. त्यापैकी प्रमुख बाबी पुढील प्रमाणे. शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे हिमालयामध्ये दहा हजार फुटांहून अधिक उंचीवरील ट्रेक्‍सवर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा उंचीवरील ट्रेक्‍स साधारणतः अतिउंचीवरील ट्रेक्‍स म्हणून गणले जातात. या ट्रेक्‍सवर जाण्याआधी हातापायांचे, पोटापाठीचे स्नायू सक्षम असले पाहिजेत, तसेच ट्रेक करताना जसे जसे अधिक उंचीवर चढत जातो, तसतसे हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. त्यामुळे 'हाय अल्टीट्युड सिकनेस' होण्याची संभावना अधिक असते. यामध्ये मळमळणे, उलटी होणे, डोके जड पडणे, डोके दुखणे, अन्न खाण्याची इच्छा न होणे असे आजार संभवतात.

ट्रेक्‍सच्या सुरवातीच्या काही दिवसांमध्ये असा त्रास होण्याची शक्‍यता अधिक असते, त्याचा परिणाम पुढील संपूर्ण ट्रेकवर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी 'अक्‍ल्मटायझेशन' होणे गरजेचे असते, थोडक्‍यात आपले शरीर त्या वातावरणाशी एकरूप होणे गरजेचे असते. यासाठी ट्रेक करताना उत्साहाच्या भरात वेगाने उंचीवरील ठिकाणी जाणे टाळावे. हळूहळू उंची गाठावी व संध्याकाळी आरामासाठी पुन्हा थोडे कमी उंचीवर येणे आवश्‍यक असते. यामुळे शरीराला योग्य प्रमाणात प्राणवायू मिळतो व शरीर वातावरणाशी जुळवून घेते. हळूहळू उंची गाठत गेल्यास अतिउंचीवरील ट्रेक्‍सची मजा योग्य प्रमाणात लुटता येते. सोबतच महत्वाची बाब म्हणजे अशा ट्रेक्‍सवर अनेकवेळा क्षणार्धात निर्णय घेण्याची वेळ असते, यासाठी मानसिकदृष्ट्या कणखर असणे आवश्‍यक असते. मन व मेंदू या द्वंद्वामध्ये कोणता पर्याय निवडायचा हे ठरविण्यासाठी मानसिक तयारी करणे प्रचंड आवश्‍यक असते. यांमुळे दुर्घटना घडण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.

आरोग्याकडे नियमित लक्ष देणे आवश्‍यक अतिउंचीवर चढत असताना प्राणवायू कमी होत जातो मात्र हवेतील कोरडेपणा वाढतो व थंडी वाढत जाते. अधिक थंडीमुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, यामुळे 'डिहायड्रेशन' होण्याची शक्‍यता बळावते. हे टाळण्यासाठी योग्यवेळी योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्‍यक असते. पाणी पिताना शक्‍यतो कोमट पाणी प्यावे, त्यामुळे घसा कोरडा पडत नाही. हवेतील कोरडेपणामुळे घशाला संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्‍यता असते. तसेच अतिउंचीवर ट्रेक करताना अनेक गिर्यारोहकांना चुकीचे सल्ले दिले जातात, त्यातील सर्वात महत्वाची दिशाभूल कोणती औषधे घ्यावयाची यांवर होते. खरेतर ट्रेकची योग्य आखणी केली, काळजी घेतली की कोणतेही औषध घेण्याची गरज नसते, परंतु काही गिर्यारोहक अतिकाळजी म्हणून 'डायमॉक्‍स' सारखी गोळी घेतात. ही गोळी घेतल्यावर जर पाण्याचे भरपूर सेवन केले नाही तर 'डिहायड्रेशन'चा त्रास हमखास संभवतो.

अतिउंचीवर गेल्यावर आपले संपूर्ण शरीर गरम कपड्याने झाकणे आवश्‍यक असते. हाताची बोटे, कान, नाक यांसारखी अवयवे जर योग्य प्रकारे झाकली गेली नाहीत तर हिमदंश होऊ शकतो. हिमदंश झालेल्या व्यक्तीला ट्रेक अर्ध्यावर सोडून परत येणे हा एकमेव पर्याय उरतो. त्यामुळे हिमदंश न होण्याची काळजी घेणे महत्वाचे ठरते. पण त्याचसोबत आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्‍यक असते, ती म्हणजे गरम कपड्यांनी अंग झाकून घेतल्यावर ते घामाने ओले होऊ शकतात. हातातील व पायातील मोजे, अंतर्वस्त्रे प्रामुख्याने लवकर ओले होतात. त्यामुळे अनेक आजार संभवतात. हे टाळण्यासाठी योग्य कालावधी नंतर कपडे बदलणे अगत्याचे ठरते.

जेवढी काळजी आपण शरीराची घेतो, त्याहून अधिक डोळ्यांची काळजी घेणे गिर्यारोहकाला अत्यंत आवश्‍यक असते. बर्फावरून सूर्यकिरणे परावर्तित होऊन डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते, अगदी अंधत्व होण्याची शक्‍यता असते. हे टाळण्यासाठी गिर्यारोहकांना उत्तम दर्जाचा 'यु.व्ही. गॉगल' बाळगणे गरजेचे असते. यांमुळे डोळे अधिक सुरक्षित राहू शकतात. सोबतीला चांगल्या दर्जाचे, अतिउंचीवर चालणारे, प्रामुख्याने शरीराला आवश्‍यक उर्जेचा पुरवठा करणारे अन्नपदार्थ सोबत बाळगणे देखील तेवढचे आवश्‍यक आहे.

मोहिमेची सर्वंकष आखणी आवश्‍यक बहुतांश परदेशी गिर्यारोहक हे एकट्याने गिर्यारोहण मोहिमा करतात किंवा छोट्या ग्रुपमध्ये चढाईसाठी येतात. मात्र गिर्यारोहण मोहिमा एकत्रित संघांसोबत कराल, तेवढा त्याचा सर्वार्थाने फायदा होतो, हे मी अनुभवातून सांगू शकतो. सोबती- साथीदार असले की, आपल्या चढाई- उतराईच्या अडचणी एकमेकांना सांगता येतात, एकमेकांचा मानसिक आधार होता येते व संघ भावनेने अपेक्षित यश मिळविता येते. हे सर्व करत असताना योग्य संघाची निवड करणे, उत्तम नेत्याची निवड करणे तसेच ट्रेकिंगसाठी कुठे जाताय, किती दिवस असणार आहात, किती जण आहात, मोहिमेचा संपूर्ण आरखडा स्थानिक लोकांना व प्रशासनाला कळविला पाहिजे. आपत्कालीन स्थितीमध्ये याचा प्रचंड उपयोग होतो. तसेच महाराष्ट्रातील महाराष्ट्र माउंटनियर्स रेस्क्‍यू कोऑर्डीनेशन सेंटर (एमएमआरसीसी) (हेल्पलाईन 7620-230-231) या व यांसारख्या आपत्कालीन स्थितीमध्ये काम करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधून आपल्या मोहिमेची माहिती दिल्यास दुर्घटनेच्यावेळी याचा उपयोग होऊ शकतो. तसेच अशा मोहिमांवर जाण्याआधी वैद्यकीय सल्लामसलत करणे, अतिउंचीवरील ट्रेकसाठी आवश्‍यक तयारीची माहिती घेणे, अगत्याचे ठरते.

पुण्यातील गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्युट ऑफ माउंटनियरिंग (जीजीआयएम) (www.ggim.in) या संदर्भात सर्वंकष मार्गदर्शन करते, त्यांच्याशी संपर्क साधून पूर्वतयारी केली तर त्याचा प्रत्यक्ष ट्रेकच्यावेळी नक्की उपयोग होईल. अट्टहास टाळला पाहिजे एव्हरेस्ट असो किंवा अति उंचावरील इतर मोहिमा, बहुतांश गिर्यारोहक आपले सर्वस्व पणाला लाऊन, खूप मोठी आर्थिक गुंतवणूक करून मोहिमांवर येतात. त्यामुळे मोहीम यशस्वी झाली पाहिजे असे वाटणे साहजिक आहे. मात्र त्यासाठी आपला जीव पणाला लावणे मात्र चुकीचे आहे. पुन्हा कधी येणार, या वर्षी झालंच पाहिजे, आता इतकं वरपर्यंत आलो आहे, परत खाली नको जायला, असे विचार केले नाही पाहिजेत. आपली शारीरिक क्षमता तुटेपर्यंत ताणण्यात काही हाशील नाही. असे केलेले जीवावर बेतू शकते.

याच एक उदाहरण म्हणजे, साली मी 'माऊंट एव्हरेस्ट'वर चढाईसाठी गेलो होतो, तेव्हा बेस कॅम्पवर रविकुमार नावाचा विशीतला तरुण भेटला. तो देखील एव्हरेस्ट चढाई करणार होता. आमच्या बेस कॅम्पवरील मुक्कामामध्ये नेहमी भेट होत असे. त्याचा हा कदाचित 'एव्हरेस्ट' चढण्याचा तिसरा प्रयत्न होता. यावेळी तो 'एव्हरेस्ट'च्या बाल्कनी पर्यंत पोहोचला, जेथून शिखरमाथा अवघा मीटर आहे. याठिकाणी पोहोचेपर्यंत रविची संपूर्ण ऊर्जा खर्ची पडली होती, त्याला चढाई करणे अवघड जात होते, अशावेळी मागे परतून खालच्या कॅम्पला येणे किंवा बेसकॅम्पला येणे स्वागतार्ह होते, मात्र इतके वर आलोच आहोत मागे नको परतायला, या अट्टहासापायी त्याने शिखर चढाईचा प्रयत्न केला व जीव गमावून बसला.

याबाबतीत परदेशी गिर्यारोहकांचा आदर्श घ्यायला हवा, ते इतर कोणत्याही बाबतीत तडजोड करतील, मात्र सुरक्षिततेत तसूभरही कमी पडू देत नाहीत. शक्‍य वाटत नसेल तर मागे फिरतात, पुढच्या वर्षी पुन्हा परत येतात. हाच दृष्टीकोन सर्वच गिर्यारोहकांनी ठेवला पाहिजे, म्हणतात ना, सर सलामत तो पगडी पचास! यावर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी पुन्हा येऊ, पण जीव धोक्‍यात घालायला नको. गिर्यारोहण हा धाडसी क्रीडाप्रकार आहे, यात धाडस करावेच लागते मात्र या धाडसाला देखील मर्यादा असतात, वेडे धाडस करून कोणतीही गोष्ट साध्य करायला गेले की अपयश हे येणारच.

याआधी म्हटल्याप्रमाणे गिर्यारोहण म्हणजे फक्त शिखर चढाई नव्हे तर निसर्गाचा आस्वाद घेणे, डोंगरांच्या सानिध्यात आनंदी वेळ घालविणे व सुखरूप परत येणे होय. दुर्दैवाने गेल्या काही काळात गिर्यारोहण करताना दुर्घटना वाढल्यामुळे काही लोकांचा या खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. जसे रस्त्यावर अपघात होतात, म्हणून कोणी प्रवास करणे थांबवत नाही तसे काही लोकांच्या वेडेपणामुळे गिर्यारोहण क्षेत्रच बदनाम करणे चुकीचे आहे. त्याऐवजी सर्व माहिती घेऊन चांगली पूर्व तयारी कशी करता येईल, हे याकडे लक्ष दिले पाहिजे.

महाराष्ट्र राज्य भारतातील गिर्यारोहण क्षेत्रातील अव्वल राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये देखील अनेक ठिकाणी ट्रेकिंग व भटकंतीसाठी असंख्य लोक घराबाहेर पडतात. हे सशक्त समाजाचे लक्षण आहे. हे असेच अविरत चालू राहण्यासाठी सर्वांनी सजग व चौकस राहून गिर्यारोहणाच्या आनंदाचा ठेवा जतन केला पाहिजे.

अतिउंचीवर ट्रेकला जाताना हे करावे

  • शारीरिक व मानसिक तयारी पाणी कमी पिणे हातपाय
  • पाठपोटांच्या स्नायूंची बळकट करणे
  • उत्तम प्रतीचे कपडे, बूट्‌स यांचा वापर करणे
  • संपर्काची अत्याधुनिक साधने जवळ बाळगणे
  • हवामानाचे ताजे अंदाज सतत मिळवत राहणे
  • मोहिमेची उत्तम पूर्वतयारी करणे

अतिउंचीवर ट्रेकला जाताना हे करू नये

  • डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे जवळ बाळगणे, त्यांचे सेवन करणे
  • आपल्या शारीरिक क्षमतांचा अंदाज नसणे
  • प्रथमोपचार पेटी जवळ नसणे
  • लहरी हवामानाकडे दुर्लक्ष करणे
  • मोहिमेच्या/ ट्रेकिंगच्या आराखड्याचे तंतोतंत पालन न करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com