'पथनाट्य' हे लोकचळवळींचे प्रभावी अस्त्र

pathnatya
pathnatya

पथनाट्य हा कलाकारांच्या जडण-घडणीस सहाय्यभूत व जनतेच्या मनाला थेट भिडणारा प्रभावी कलाप्रकार आहे. सामाजिक भान देणाऱ्या, प्रश्‍न मांडणाऱ्या लोकचळवळींचे पथनाट्य हे प्रभावी अस्त्र आहे. लोकचळवळींचे उगमस्थान समजल्या जाणाऱ्या सातारा-सांगली-कोल्हापूर या पुरोगामी जिल्ह्यांतून लोकचळवळीचे हे हत्यार काढून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने युवा महोत्सवातून पथनाट्य हा कलाप्रकार वगळण्याचे मनसुबे रचले आहेत. त्याकरिता पथनाट्यात सहभागी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण दिले गेले आहे. 

पथनाट्याची बलस्थाने जाणून घेतल्यास या कलाप्रकाराचे महत्त्व अधोरेखीत होईल. लोककलांच्या प्रसारासाठी विद्यापीठांच्या युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगित, पथनाट्य आदी कलाप्रकारांचा अंतर्भाव करण्यात आला. पथनाट्यामध्ये गायन, नृत्य, संगीत असा मिलाफ असतो. सामाजिक भान देणारे, वैचारिक भूमिका मांडणारे, कधी राजकीय भूमिका घेणारे नाट्य त्यामध्ये असते. गारुडी किंवा मदारी लोकांच्या खेळातून पथनाट्याची संकल्पना घेतली गेली. गर्दीच्या ठिकाणी, बाजारात, बसस्थानकावर, चौकांमध्ये हे नाट्य सादर होते. अनिष्ट गोष्टींचे भान देणारा हा कलाप्रकार आहे. तो निव्वळ करमणूकीचा प्रकार नाही; ते निर्हेतुक असूच शकत नाही. 

केवळ कलेसाठी कला नव्हे तर प्रबोधनासाठी ही कला उपयोगात आणली जाते. राज्य शासन सुद्धा विविध उपक्रम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कलाकारांची मदत घेते. प्रौढसाक्षरता, मुलगा-मुलगी समानता, प्लास्टिक बंदी आदी विषयांवर त्यांच्याकडून पथनाट्य करुन घेतली जातात. लोक न्यायालयाचा प्रसार करण्यासाठी या माध्यमाचा वापर केला जातो. 
स्पर्धकांचा सहभाग घटल्याचे कारण विद्यापीठ प्रशासन देत असले तरी याला जबाबदार कोण? हे चित्र बदलण्यासाठी आजवर काय प्रयत्न झाले? याची उत्तरे शोधावी लागतील. सहभाग प्रतिसाद वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत; ते आपोआप होणार नाही. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि त्यांचे नाममात्र प्रमुख यांच्या मर्यादा स्पष्ट होतात. बहुतेक महाविद्यालयांत सांस्कृतिक विषयाचा गंध नसलेल्या मंडळींना प्रमुख नेमले जाते. त्यांना केवळ स्पर्धा विना तक्रार पार पाडल्या एवढी शाबासकी मिळविण्यात रस असतो. संघ तयार केला, तो स्पर्धेस नेला आणि परत आणला म्हणजे त्यांची इतिकर्तव्य संपते. 

अभिनय व तंत्राच्या अंगाने टीव्ही, सॉर्ट फिल्म, वेबसिरीज, सिनेमा, नाट्य या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. महाविद्यालयात अशी मुले आढळतात. महाविद्यालयीन दशेपासून त्यांच्यात अभिनायाची ओढ दिसते. अनेक महाविद्यालये बाहेरून प्रशिक्षक घेतात. त्याकडून विविध कला प्रकार करुन घेतात. समुहनृत्याला जेवढा प्रतिसाद असतो तेवढा पथनाट्य नसतो हे नक्की ! पथनाट्य हे थेट लोकांपर्यंत जाते. आशय भाषणातून पोहचवण्यापेक्षा नाट्यातून दाखवला तर तो लोकांना जास्त भिडतो, पटतो, रुचतो. म्हणून पथनाट्याचे महत्त्व दुर्लक्षून चालणार नाही. हुंडाबळी-देवदासी प्रथांपासून ते अगदी अलीकडच्या मोबाईच्या अतिरेकी वापरापर्यंत अनेक विषय या कलाप्रकारातून हाताळले गेले. आता त्याला "प्रतिसाद मिळत नाही' या सबबीखाली युवा महोत्सवातून वगळण्याचे मनसुबे केले तर लोककलेचे, उदयोन्मुख कलाकारांचे, येथील लोकचळवळीचे मोठे नुकसान होणार आहे. 

पथनाट्याला स्ट्रीट प्ले, नुक्कड नाटक, सडक नाटक अशी नावे आहेत. आणीबाणीच्या निषेधार्थ मुंबईत बोरीबंदरजवळ एक पथनाट्य "जागर' या संस्थेने सादर केले. पोलिसांनी हातात दंडुके घेऊन तो प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न केला. परंतू जमावाने पोलिसांना अडवले आणि "रिंगणाच्या आत पाऊल टाकाल तर खबरदार' असा दम दिला होता. पोलिसांना माघार घेणे भाग पडले होते. 

या माध्यमाचा प्रभावी वापर "जन नाट्य मंच'च्या माध्यमातून सफदर हाश्‍मी यांनी केला. पथनाट्यांचे जवळपास 4 हजार प्रयोग त्यांनी केले. त्यांचेच "हल्ला बोल' हे पथनाट्य जनमानसावर प्रचंड प्रभाव करणारे होते. 1980 च्या दशकात त्याचा एक प्रयोग दिल्लीतील एका रस्त्यावर सुरू असताना काही लोकांनी सफदर हाश्‍मी यांची दगडाने ठेचून हत्या केली होती. चळवळीचे हे माध्यम इतके प्रभावी आहे की लोकांनी त्यासाठी रक्त सांडल्याचे उदाहरण इतिहासात नोंदवले गेले. आजही सफदर हाश्‍मी यांचे नाव कलाप्रांतात अभिमानाने घेतले जाते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com