ऊसातील बदलेला बिबट्या सहजीवन मागतोय 

ऊसातील बदलेला बिबट्या सहजीवन मागतोय 

जुन्नर - सुमारे वीस वर्षापासून बिबट्या आपल्या सोबत ऊसात रहायला लागला आहे असं म्हणायला हरकत नाही. सद्या ऊसातील वास्तव्याची त्याची तिसरी पिढी सुरू असेल. बिबट मादी इथेच प्रजनन करून पिलांना जन्म देऊ लागली. आपल्याला पाहत पाहत बछडे मोठे होऊ लागले. बछड्याना दोन वर्षे पर्यंत कुठे जायचे, कुठे पाणी प्यायचे, कोणापासून लपून राहायचे, खाद्य कोठे मिळणार हे सगळे प्रशिक्षण आई देते. बछडे उसातच वाढत असल्याने हेच त्यांचे घर झाले येथेच लहानपण गेल्याने त्यांना जंगल माहीतच झाले नाही. ऊसातील बिबट्याने स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणले.

जंगलात हरीण, ससा खाणारा बिबट्या आता कुत्रा, मांजर, शेळी, मेंढी, डुक्कर अगदी काहीच मिळाले नाहीतर उंदीर, घुस खायला लागला हेच त्याचे प्रमुख अन्न झाले. बछडे ऊसशेतीला आपले घर मानू लागले व खेळतांना उसा बाहेर येऊन मस्ती करतांना देखील दिसु लागले. जंगलातील बिबट्या उसामध्ये येऊन आळशी झाला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. बिबट्याने खाद्य बरोबर स्वतःत देखील बदल केले, एरव्ही बिनधास्त जंगलात वावरणारा हा प्राणी उसामध्ये मात्र भिऊन रहायला लागला. शेतकरी शेतात कधी येतो, कधी जातो, काय करतो. हे सगळं अभ्यासून नंतर तो बाहेर पडुन शिकार करू लागला व परत उसामध्ये बसू लागला. 

मादी बिबट्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिली. प्रजनन केलेल्या स्वतःच्या पिलांना सांभाळणे, ऊस तोड सुरू झाली की त्यांना हलविणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांची खाद्याची काळजी घेणे, या सर्व आव्हानाला सामोरे जात मादी उसात आपली पिल्लं लहानाची मोठी करत असताना दिसते. मानवा सोबत उसाच्या अवती भवती राहताना अनेक प्रसंगांना बिबट्याला सामोरे जावे लागते. भक्षाचा पाठलाग करतांना विहिरीत पडणे, पिंजऱ्यात अडकणे, घरात चुकून शिरणे इत्यादी. या सगळ्या आव्हानांना सामोरे जात बिबट्याला मानव सोबत  जगायचं आहे.

बदलेल्या राहणीमानानुसार बिबट्या आता मानवा समोर येऊन शिकार करण्यास सुद्धा डगमगताना दिसत नाही. ऊस तोडणी सुरू झाली की आपले घर बदलायचे हे देखील त्यांना माहीत झाले आहे नव्हे तर त्यांच्या  अंगवळणी पडलंय.

ऊसातील बिबट्याने त्याचा नवीन अभ्यास करावा असेच सुचविले आहे. बिबट्या हा स्वतःचा प्रदेश तयार करतो हे देखील ऊसातील बिबट्याने चुकीचे ठरविले आहे.मानव जसे वाडे सोडून आता फ्लॅट मध्ये आला तसेच या बिबट्याने सुद्धा जंगल सोडत उसशेतीत छोटे घर केले आहे.ऊसातील मिळालेला निवारा, पोषक हवामान व खाण्यासाठी सहज भक्ष यामुळे त्याच्या शरीरयष्टी व जीवशास्त्र यात निश्चितच बदल झाला आहे.

कालानुरूप बिबट्याने स्वतःमधील केलेले बदल खरच महत्वाचे आहेत. जगण्याच्या लढाईत त्याने स्वतः मध्ये हे बद्दल घडवून आणले. जगण्याचा संघर्ष त्याला कोठे घेऊन आला हे त्यालासुद्धा कळाले नाही. 

आज तो मानवाला विचारतोय तुमच्यासाठी मी इतका बदलोय तुम्ही माझ्यासाठी बदलणार का ? ही वेळ आहे मानवाला कटू सत्य स्वीकारण्याची आपण ज्याचे क्षेत्र हिरावून घेतले व प्रगती केली त्या प्राण्याला आपल्या सोबत जगू दयायचे की नाही ? हा प्रश्न घेऊन तुमच्या समोर उभा राहत सहजीवन मागतोय बदलेला बिबट्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com