चाऱ्यासाठी दिवसभर राबावे लागते दुसऱ्याच्या शेतात

चाऱ्यासाठी दिवसभर राबावे लागते दुसऱ्याच्या शेतात

मराठवाड्यात दुष्काळाने परिसीमा ओलांडली आहे. कधीकाळी मुबलक प्रमाणात असलेला चारा आज पाहायलाही मिळत नाही, अशी स्थिती झाली आहे. मराठवाड्यातील परंडा तालुक्‍यात (जि. उस्मानाबाद) याची परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून, जनावरांच्या एक दिवसाच्या चाऱ्यासाठी दिवसभर दुसऱ्याच्या शेतात काम करुन चारा मिळवावा लागत असल्याचे चित्र तांदूळवाडी शिवारात आहे. 

ज्वारीचे कोठार म्हणून राज्यात ओळख असलेल्या परंडा तालुक्‍यात यंदा केवळ दोन टक्के पेरणी झाली. खाण्यासाठी चवदार ज्वारी आणि चाऱ्यासाठी कडबा असा दुहेरी उपयोग या तालुक्‍यात पाहायला मिळत होता. मात्र गेल्या चार ते पाच वर्षात यापैकी एकेरीही फायदा न झाल्याचे चित्र आहे. दुष्काळ, चारा, पाणी टंचाईची प्रत्यक्षात काय स्थिती आहे, हे पाहण्यासाठी परंडा तालुक्‍यातील काही गावच्या शिवारात गेलो असता भयानक चित्र दिसले. 

परंडा तालुक्‍यापासून 35 किलोमीटर अंतरावर तांदूळवाडी शिवारात पोहोचलो. तेव्हा भर उन्हात भारत पवार व वनिता पवार शेताच्या फडात ऊस तोडताना दिसले. त्यांच्याजवळ थांबलो तसं कपाळावरचा घाम पुसत वनिता बोलत्या झाल्या. "माझ्याकडं दोन गायी अन्‌ एक म्हैसंय' जित्राबाला चाराच उरला नै, आपलं कसं बी भागऊ वो पण जित्राबासाठी कैतरी करायला लागतंय. हिथं दिवसभर दुसऱ्याच्या रानात ऊस तोडायला आलाव, त्याच्या बदल्यात जनावराला दिवसभराचा चारा (वाडं) म्हणून घिऊन जाताव. गावी ऊस तोडणीसाठी मजूर न मिळणाऱ्या मालकाच्या मजुराचा प्रश्न असा सुटला तर दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शेतकरी दिवसभर केवळ चाऱ्यासाठी दिवसभर दुसऱ्याच्या शेतात राब राब राबून चारा मिळवून जनावरं जगवत आहेत. 

तालुक्‍यातील सर्वच ऊसाचा पाचोळा झाला आहे. शिवारातच एक कोरडे शेततळे दिसले, तिथे थांबलो तेव्हा तांदूळवाडीचे रावसाहेब खरसडे शेतात दिसले. त्यांनी पोटच्या लेकराप्रमाणे जपलेली पाच एकर डाळिंबाची बाग पाण्याअभावी ऐन फळाच्या हंगामातच जळून गेली. 

दररोज लागतोय 736 मेट्रिक टन चारा 

तालुक्‍यात लहान, मोठे जनावरे, शेळ्या, मेंढ्यांची एकत्रित 73 हजार 72 संख्या आहे. यापैकी लहान जनावरांना दररोज साडे सात किलो, मोठ्या जनावरांना 15 किलो तर शेळ्यामेंढ्यांना दोन किलो चारा लागतो. तालुक्‍यात दररोज 736 मेट्रिक टन चारा लागतो. दरमहिन्याला 22 हजार मेट्रिक टन चाऱ्याची संख्या असून सध्या दोन महिनेही पुरणार नाही इतका चारा उपलब्ध असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. 

रानच रिकामी ट्रॅक्‍टरला कुठून काम मिळणार 

तालुक्‍यात सगळीच रानं रिकामी पडलीत. ट्रॅक्‍टरचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला. कुंभेजा (ता परंडा) येथील महावीर जाधव हे शेतात पाणी सोडून पेरणी करत असताना दिसले, ते सांगत होते, "दोन-तीन वर्षांपूर्वी ट्रॅक्‍टर घेतला तेव्हा चांगली कामे मिळत होती, आता ट्रॅक्‍टरचा हप्ताही भरणं कठीण झालं आहे''. 

पपईचे गाव पडले ओस

परंडा तालुक्‍यातील पाचपिंपळा या गावाने राज्यात पपईचे गाव म्हणून नवीन ओळख निर्माण केली होती. मागील दोन तीन वर्षात चांगले उत्पन्न मिळाले तसे पपईच्या बागांचे क्षेत्र वाढले, मात्र यंदा लाखो रुपये खर्च केलेल्या बागा जळाल्याने गावचे अर्थकारण बिघडले आहे. 

दिवाळीआधीच सोडले गाव 

परंड्याजवळ शासकीय पाणी पुरवठा योजनेच्या टाकीजवळ मेंढपाळांनी विसावा घेतला होता. दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर मेंढरं घेऊन गाव सोडताव पण यंदा मेंढरांना खायलाच काही नाही म्हणून कौडगाव (ता. परंडा) येथील अलकाबाई बिचकुले, मोहन बिचकुले यांनी सांगितले. पाठीवर बिऱ्हाड घेऊन जागोजागी विसावा घेत पुढच्या वर्षी पाऊस पडल्यानंतरच मेंढरं घेऊन गावावर येणार असं म्हणत पुढच्या गावी मार्गस्थ झाले. 

दोन वर्षे रत्नागिरीला काम करुन त्याच्यावर तीन मुलींची लग्नं केली. आता कसंतरी गावावर आले तर या दुष्काळामुळे पुन्हा पोटासाठी घर सोडायची वेळ आलीय. मुलगा अपंग आहे, त्याच्या शिक्षणासाठी पैसा पुरविण्यापुरतंही रानात पिकलं नाही. 

- उमा भांडवलकर, शेतकरी, वाटेफळ (ता. परंडा) 

गावाला पाणी पुरवठा करणारी ग्रामपंचायतीची विहिर कोरडीठाक पडलीय, प्रशासनाच्या परवानगीशिवाय दोन बोअर अधिग्रहित केलेत. आता परवानगी मिळालीय, पण अजून एक-दीड महिन्यातच टँकरने पाणी आणावे लागेल. 

- रावसाहेब खरसडे, सरपंच, तांदूळवाडी (ता. परंडा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com