निवडणुका, माध्यमे आणि सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते 

Election and media
Election and media

बिगुल, पडघम वाजलंय.. आचारसंहिता लागू होण्याआधी एक दिवस भरमसाठ उद्घाटन झाली.. उमेदवारांची रस्सीखेच, दिग्गज नेत्यांच्या मुलांची पळवा-पळवी सगळ्या चर्चा झाल्या. एका कुटुंबातून किती जण उभे राहणार कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? शरद पवारांचं हे विधान दिवसभर टिव्ही, वेबसाईटवर फिरलं. निवडणुका जेवढ्या राजकारण्यांसाठी महत्त्वाच्या तेवढ्याच माध्यमांसाठी. राजकारणात 5 वर्षे सत्तेसाठी असतात तर माध्यमांत व्यवसायासाठी. त्यामुळे ब्रेकिंग, एक्‍स्लुझिव्ह, मुलाखती या सगळ्या गोष्टींचा वेग वाढतोच. पण मुद्दा असा राहतो की जसा राजकारणात कार्यकर्त्यांचा उपयोग फक्त सतरंज्या उचलण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे माध्यमांमध्येही सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते व्यवस्थेमुळे तयार होतात. आणि शेवटपर्यंत फक्त सतरंज्याच उचलत राहतात. 

निवडणुकीची तयारी, तिकिट मिळण्याचे राजकारण या मुद्‌द्‌यांची चर्चा काही ठराविक लोकांपुरती आणि ठराविक लोकांसाठी होते. सगळे नियोजन काही लोकांसाठी आणि काहीच लोकांकडून होते. त्यानंतर प्रचाराच्या सभेत राबल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांला उगीचच असे भासवले जाते की हे जे काही होतंय ते फक्त तुझ्यामुळेच. माध्यमांची परिस्थिती काही वेगळी नाही. इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमांत निवडणुकीदरम्यान कोणतीही ब्रेकिंग आली की 10-10 वर्षे काम करत असलेले लोक कॅमेरासामोर येण्यासाठी इतके हापापलेले असतात. ती बातमी आली की उगीचच नवख्या आणि शिकाऊ पत्रकारावर व्हसा-व्हसा ओरडायचं. त्याबाबतीतले एखादे क्षुल्लक काम सांगायचे आणि लगेच स्वतः लाईव्हला जाऊन उभे राहून लोकशाही, पुरोगामी, विवेकशील राजकारण वैगेरे बोलायचं. निवडणुकीतली एखाद्या तथाकथित मोठ्या सिनीअरची बातमी करायची असेल तर त्याचा एखादा राहिलेला बाईट आणून उष्टी खरकटी काढायची. बर गम्मत अशी आहे ज्याचा बाईट आणायचा त्याचा नंबर जर मागितला तर अविर्भाव असा असतो की जसं काय प्रॉपर्टिचे डिटेल्स मागत आहे. बर इतर माध्यमांत काही वेगळी परिस्थिती नाही. अनेकांचा अनुभव पाहता ज्या काही पॉलिसी, प्लॅनिंग असेल ते स्वत:च ठरवायचे राहिलेली उष्टी खरकटी काढायला बिचाऱ्या नवशिकाऊ किंवा ज्युनिअर्सला बोलवायचे. बर जर पुढाकाराने एखाद्याने शिवधनुष्य हाती घेतलंच तर येता-जाता अनेकांच्या नजरा अशा असतात की बस रे बस.

नियोजनात फक्त आपणच आहोत. माझं लक्ष जगभरातल्या बातम्यांकडे आहे. हे सांगणाऱ्यांची तर ओकारीच येते. बर विनोद असा आहे की हे सगळं वरीष्ठांना समजत नसेल का? पण असो. व्यवस्थेत भुजबळांपासून पार्थपर्यंत सगळ्यांना सामावून घ्यावंच लागतं. कार्यकर्त्याने सतरंजीची घडी घालेपर्यंत उमेदवार निवडून येतो. तसेच प्रकार माध्यमांतही होतात. एखादी कल्पना डोक्‍यात येऊन सांगेपर्यंत पुलाखालून बरेच पाणी गेलेले असते. बर पक्षश्रेष्ठी किंवा ज्येष्ठांना या कार्यकर्त्यांबाबत कळवळा असतोही पण तो पोहोचेपर्यंत कार्यकर्त्यांचा बाजार उठलेला असतो. भारतात लोकशाही आहे, सार्वभौमत्व या संकल्पनांचं वास्तव लोकांपर्यंत पोहोचवलं जातंय तेवढंच माध्यम संस्थांमध्ये ते मृगजळासारखं आहे. एकमेका-सहाय्य करू वैगेरे अशी वृत्ती सर्वांचीच नसते. आपल्याला माहिती असलेली गोष्ट होतकरूंना सांगितली तर अगाध ज्ञानात खूप मोठा खड्डा पडणार आहे का? बर सगळेच तसे नसतातही, खूप लोकांना मनापासून काहीतरी वाटते. अनेक जण विचारपूस, मार्गदर्शन करतात. स्वत:हून सांगतात. पण शेवटी अनेकांचे प्रश्न केआरएभोवतीच फिरत असतात! 
(हा स्वानुभव नाही. आजूबाजूची परिस्थिती आणि इतरांची स्थिती यामुळे न राहवून केलेला हा पामर प्रयत्न)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com