रस्त्यावर पडलेला माणुस..

residentional photo
residentional photo


    आयुष्यामध्ये आपण सदैव काहीना काहीतरी शिकतच असतो. मग ते शाळा-महाविद्यालयातून असो, एखाद्या व्यक्तीकडून असो, अभ्यासक्रमामार्फत असो, पुस्तकांमार्फत असो, व्याख्यानांमार्फत असो, ऑनलाइन असो, अनुभवातून असो अथवा एखाद्या प्रसंगातून.! यातून आपल्याला होत असलेले बोध आपलं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ करीत असतात यावर कदाचित कुणाचंही दुमत होणार नाही. परंतु आज आपण जाणून घेऊयात की रस्त्यावर अचानक पडलेला माणूस आपल्याला नेमकं काय शिकवतो.?

    मित्रहो, परवाच ऑफिसला जात असताना घडलेला किस्सा. दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे एक माणूस रस्त्याच्या अगदी मधोमध धाडकन् पडला. त्याचा एक पाय गाडीखाली अडकला गेला आणि तो मदतीसाठी इकडेतिकडे पाहु लागला. त्याचा मोबाईल फोन चार हात लांब जाऊन पडला होता. तो अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होता परंतु प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मागून येणाऱ्या वाहनांनी आपापले वेग एकदम कमी केले. दोन-चार जण आपापली वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूला लावून चटकन त्याच्या मदतीसाठी धावले. एकाने त्याची बाईक रस्त्याच्या कडेला आणून लावली. एकाने त्याचा मोबाईल व्यवस्थित त्याच्या खिशात ठेवला. दोन जणांनी त्याला उठवत सावकाश रस्त्याच्या कडेला नेले आणि एका बाकड्यावर बसवले. हे सर्व घडत असताना बाकी वाहनचालक जराही हॉर्नचा आवाज न करता सावकाश पुढे पुढे सरकत होते. तोपर्यंत एका दुचाकीस्वाराने आपल्या जवळची पाण्याची बाटली उघडून त्या इसमाला पाणी प्यायला दिले. 
    अपघात किरकोळ होता आणि तात्काळ मिळालेली मदत यामुळे तो इसम आता बराच सावरला होता. त्याने सर्वांचे आभार मानले. त्याचा आत्मविश्वास परत जागृत झाला आणि तो आपली दुचाकी घेऊन पुढे मार्गस्थही झाला.

काही क्षणांचा हा प्रसंग मला थोड्या अंतरावरुन बसच्या खिडकीतुन पहायला मिळाला. लोकांच्या या उस्फुर्त कृतीचे मला मनापासून कौतुक वाटले, देऊ केलेले सहकार्य पाहून हायसे वाटले. परंतु हा प्रसंग मात्र चटकन् मला एक मोलाची शिकवण देऊन गेला एवढं मात्र खरं.! काय शिकवलं असेल आपल्याला रस्त्यावर पडलेल्या या अनोळखी माणसाने आणि त्यानंतर घडलेल्या प्रसंगाने.?


    वाचकहो, मला मात्र यातून हे उमजलं की मदतीला धावून जाणाऱ्या कुणीही रस्त्यावर पडलेल्या त्या माणसाची जात काय असेल, धर्म काय असेल, तो गरीब असेल की श्रीमंत, ती व्यक्ती कोणत्या विचारसरणीची असेल वगैरे वगैरे काहीही विचार केला नाही. ते फक्त तत्काळ मदतीसाठी धावून गेले कारण वेळ संकटाची होती आणि परीक्षा माणुसकीची..! धावून जाणाऱ्यांनी जातीधर्मापलीकडे असलेला आदर्श बंधुभाव जोपासला होता आणि आपल्या रक्तात असलेल्या मूळ संस्कृतीची प्रचिती दिली होती. खरोखर मनात आलं की ही दिव्य प्रचिती संकटात असल्यावरच अनुभवायला मिळते का? एरवी सर्वकाही ठीकठाक असताना अनेक लोक समोरच्याच्या जाती-धर्माचा प्राथमिकतेने विचार करताना दिसतात; मग ते मैत्री, सोयरिक, व्यवहार करणं असो अथवा निवडणुकीत उभा राहिला उमेदवार असो वगैरे वगैरे. 
    पहा ना, संकटात सापडलेल्या माणसाला कुणाचीही मदत चालते आणि माणुसकीच्या भावना जिवंत असलेले लोक वर उल्लेख केलेले कसलेही अनावश्यक विचार मनात न आणता मदतीला धावतात. रस्त्यावर पडलेल्या त्या इसमानं अप्रत्यक्षपणे त्यादिवशी हेच शिकवलं की जातीधर्माच्या भेदभावाचे चष्मे फेकून देत मदतीला धावणे आणि इतर वेळेही असाच बंधुभाव जोपासणे हाच खरा मानवता धर्म असतो, जो ईश्वराने आपण सर्वांचा रक्तात सामायिकपणे भिनवलेला आहे. पटतंय का.?

post.rajeshagni@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com