कारणराजकारण : राजकारण्यांवर असलेले अवलंबित्व कमी व्हायला हवे!

अशोक गव्हाणे
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

आजही एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता म्हणून घेण्यात मोठी धन्यता हे लोक मानतात. दिवस दिवसभर त्या नेत्याच्या मागे फिरत राहतात. एखाद्या महत्वाच्या नेत्याला कार्यक्रमात बोलण्यासाठी तास दीड तासाचा कालावधी लागू शकतो. कारण कार्यकर्त्यांची रांग आधी भाषणासाठी उभी असते.

पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात भटकंती करताना, गावा-गावांमध्ये मतदारांशी संवाद साधताना आजही एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाची नाळ ही मोठ्या प्रमाणात राजकीय, सहकार आणि शेती क्षेत्राशी जोडली गेलेली आहे.

महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील जनता दिवस दिवसभर राजकारणाची चर्चा करताना दिसते. पण, अलीकडच्या काळात सहकार आणि शेती क्षेत्राची वाताहत होऊ लागल्याने लोक सहकार क्षेत्रावरुन राजकारणावर लक्ष केंद्रित करू लागली. यात त्यांची स्वतःची वाताहत करून घेऊ लागली आहेत. तर काही शहराच्या दिशेने आपला मोर्चा वळवू लागली. हा बदल लक्षात घेण्यासारखा आहे. राजकारणासाठी किंवा चुकीच्या धोरणामुळे सहकार आणि शेती क्षेत्राची अशीच वाताहत होत राहिली तर ग्रामीण भाग आणखी बकाल दिसायला लागेल आणि येणाऱ्या काळात ही परिस्थिती वास्तवात बदलेली पाहायला मिळेल. आजही इथले लोक राजकारणाशी इतकी घनिष्ट आहेत की, त्यांना कुठल्याही किंमतीवर ते सोडवत नाही. आजही एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता म्हणून घेण्यात मोठी धन्यता हे लोक मानतात. दिवस दिवसभर त्या नेत्याच्या मागे फिरत राहतात. एखाद्या महत्वाच्या नेत्याला कार्यक्रमात बोलण्यासाठी तास दीड तासाचा कालावधी लागू शकतो. कारण कार्यकर्त्यांची रांग आधी भाषणासाठी उभी असते.

शहरातील लोकांपेक्षा खेड्यातील लोकांचे राजकारण्यांवर असलेले अवलंबित्व जास्त आहे आणि हेच अवलंबित्व इथल्या जनतेसाठी मारक आहे हे समजून घेण्याची जास्त गरज वाटते. गावात गटागटात विभागलेली सत्ताकेंद्रे आणि त्याच्या भोवताली फिरणारी गावातील जनता, हे चित्र मारक ठरत आले आहे हेच खरे!

एक गोष्ट जाणवली की, प्रस्थापितांविरुद्ध आणि सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्याविरुद्ध लोकांत प्रचंड असंतोष असतो. पण, हे कार्यकर्ते आपल्या पोटासाठी, आपल्या कायमच्या भाकरीसाठी बोलायचे सोडून पक्षासाठी, नेत्यांसाठी बोलतात. आणि नेते ही अस्वस्थता, असंतोष एकमेकांच्या विरोधात वापरून त्याला मतांमध्ये रूपांतरित करता येईल का हे पाहत असतात. म्हणून, या नेत्यांवरील लोकांचे अवलंबित्व कमी व्हायला हवे.

इतर ब्लॉग्स