कारणराजकारण : दुर्लक्षित होत चाललेला 'अंगारमळा'

सचिन बडे
शनिवार, 13 एप्रिल 2019

पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेठाण येथे शेतकरी चळवळीचे अग्रगण्य नेते शरद जोशी संयुक्त राष्ट्रातून परत येत तीस एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली आणि त्यात 'अंगारमळा' हा प्रकल्प सुरु केला

पुणे : देशात झालेल्या हरित क्रांतीनंतर शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल हा भाबडा आशावाद काही वर्षातच नष्ट झाला. 80-90 च्या दशकामध्ये कृषी क्षेत्रास मोठ्या प्रमाणावर ग्रहण लागले. याच दरम्यान, पहिल्यांदा शेतकऱ्याने आत्महत्या केली. अशी घटना घडल्याची सरकार दप्तरी नोंद आहे. हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे, 'सकाळ'ने सोशल मीडियावर सुरु केलेल्या 'कारणराजकारण' या उपक्रमांतर्गत आंबेठाण येथील शरद जोशी यांनी सुरु केलेल्या अंगारमळ्या भेटीच्या निमित्ताने...

पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेठाण येथे शेतकरी चळवळीचे अग्रगण्य नेते शरद जोशी संयुक्त राष्ट्रातून परत येत तीस एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली आणि त्यात 'अंगारमळा' हा प्रकल्प सुरु केला. हा प्रकल्प उभारण्यामागे 'शेतकरी स्वतः उद्योजक व्हावा' असा जोशी यांचा उद्देश होता. तो किती यशस्वी झाला आणि किती फसला हा चर्चेचा विषय बनू शकतो. मात्र, यातून शेतीसमोरील प्रश्नांची चर्चा सुरु झाली हे नक्की.

 

'अंगारमळा' एप्रिलमध्येही फुललेला आम्हाला दिसला. शेतात विविध पिके डोलताना दिसली. विहिरीला मुबलक पाणी आहे. जोशींनी लावलेले निलगिरी वृक्ष मोठ्या दिमाखात उभी आहेत. अंगारमळ्यात जोशी राहत असलेल्या तीन-चार खोल्यांच्या घरात सर्वात मोठ्या खोलीत प्रशस्त ग्रंथालय आहे. ग्रंथालयात मराठी, इंग्लिश भाषेतील जोशी यांच्या संग्रही असणारी पुस्तके आहेत. एका खोलीमध्ये जोशी यांच्या कार्यावर वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तके ठेवलेली आहेत. येथे असलेले म्हात्रे सर यांनी आम्हाला अंगारमळ्याचा परिसर दाखवत असतांना ही माहिती दिली.

जोशी यांनी 1979 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि तेव्हापासून 'शेतमालास रास्त भाव' या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा, ऊस, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या भावासाठी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. शरद जोशींनी 'शेतकरी तितका एक' हा नारा देऊन शेतकऱ्याला जात, धर्म, प्रांत, भाषा हे भेद विसरायला शिकवलं होतं. 1980 साली नाशिकमध्ये कांदा आणि ऊस दराप्रश्नी शेतकरी संघटनेला घेऊन ते रस्त्यावर उतरले होते. हा इतिहास येथील भिंतीवरील पोस्टरं' वरून दिसतो. ऊस उत्पादक परिषद, पाताळगंगा सत्याग्रह, जळगावचे खुले अधिवेशन, अशा अधिवेशनाचे 'पोस्टरं' येथील भिंतीवर लावलेली दिसतात.

अंगारमळ्यामध्ये आजही शेतीवर वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. मात्र, शरद जोशींनी उभारलेल्या अंगारमळ्याकडे आपले सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याची खंत येथे आल्यानंतर वाटते.

इतर ब्लॉग्स