चेहरा क्‍या देखते हो... दिल में उतरकर देखो ना! 

Sai Pallavi
Sai Pallavi

काही दिवसांपासून दक्षिणेकडील अभिनेत्री साई पल्लवी हिने एका सौंदर्य प्रसाधनाची दोन कोटींची जाहिरात नाकारली असल्याची बातमी सगळीकडे दिसत होती. सर्वत्र तिच्या या निर्णयावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, साईने जाहिरात नाकारून "चेहरा क्‍या देखते हो... दिल में उतरकर देखो ना!', हाच संदेश दिलेला दिसतोय. 

भारतीय लोकांमध्ये युरोपियन गोऱ्या लोकांचे आकर्षण पहिल्यापासूनच आहे. खरं तर आपला देश म्हणजे सावळ्या रंगाच्या लोकांचा देश आहे. गोरं म्हणजेच सुंदर असा समज आपल्याकडे दिसतो. भारतीय लोकांची हीच मानसिकता ओळखून अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांनी गोऱ्या रंगाच्या क्रेझचा गैरफायदा घेत वर्षानुवर्षे जाहिरातीच्या माध्यमातून गोरं हेच सुंदर हे आपल्या मनावर बिंबवण्यात यशस्वी झाले आहेत. 

केवळ प्रसिद्धी आणि पैशांसाठी या सौंदर्य प्रसाधनाच्या जाहिराती स्वीकारणारे अभिनेता किंवा अभिनेत्री यांना हे चांगले ठाऊक असते की, ही उत्पादने वापरून रंग गोरा होत नाही. स्वतः जाहिराती करतील; पण हे सौंदर्य प्रसाधन वापरत नाहीत. सेलिब्रिटींना मुद्दाम या जाहिरातीत घेतात कारण त्यांना माहिती असते की, यांचे आंधळे फॅन्स आणि गोरेपणाची आशा असलेले लोक आपली उत्पादने नक्कीच विकत घेतील. 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौंदर्य ही बाब फक्त शरिराशी निगडीत कधीच नव्हती. चरबट व नफेखोर व्यवस्थेने तिला तितकीच कृत्रिम/विकाऊ परिमाणं लावली म्हणून ती जपली गेली. पोसली गेली म्हणणे जास्त योग्य. त्यातही पुरुषांच्या दृष्टिकोनाचे निकष त्याला इतके चिकटलेत की, स्त्रियाही तेच प्रमाण मानून चालत आल्या. ज्या महिलांनी हे निकष झुगारले त्यांनी मात्र इतिहास घडवलाय हे नक्की. यात अभिनेत्री साई पल्लवी हिने सौंदर्य प्रसाधनाची दोन कोटींची जाहिरात नाकारून आपल्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. साईच्या चेहऱ्यावरच्या पुटकुळ्या आणि लाल डाग हेच तिच्या सौंदर्याचे लक्षण आहे, असे मानणारे तिचे फॅन आहेत. 

साई पल्लवीचा मुरुमाने भरलेल्या चेहरा, तेलकट चेहरा, मेकअप नसलेली अभिनेत्री म्हणूनच तिची ओळख झाली आहे. तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटात प्रमुख भूमिकेत तर असतेच; पण सध्या तिने टॉलीवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थानही निर्माण केले आहे. 

साईचे पूर्ण नाव साई पल्लवी संतमराय असून, तिचे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण झाले आहे. २०१५ साली "प्रेमम' या मल्याळम चित्रपटातून तिचे पदार्पण झाले होते. या चित्रपटातील मलारची भूमिका लोकप्रिय झाली होती. त्यासोबतच २०१७ मध्ये अभिनेता वरुण तेज सोबतचा "फिदा' या तेलुगू चित्रपटाने तर नवीन रेकॉर्ड केला आहे. यातील वचिंदे हे गाणं यू ट्युबवर तेलुगू भाषेतील सर्वाधिक पाहिलेलं गाणं आहे. यातील साई पल्लवीचे नृत्य लोकप्रिय झाले होते. या चित्रपटानंतर ती आता आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नुकताच तिचा धनुषसोबत "मारी 2' हा तमिळ चित्रपट सुपरहिट झाला आहे. 

चित्रपटात येण्यापूर्वी तिने २००८ मध्ये विजय टीव्हीवरील प्रभू देवाच्या डान्स शोमध्ये सहभाग घेतला होता, तर  २००९ मध्ये ई टीव्ही या तेलुगू वाहिनीवर प्रसिद्ध असलेल्या डान्स शोमध्ये ती विजेती ठरली. त्यानंतर चित्रपटक्षेत्राशी तिचा संबंध वाढला. साईची कोरिओग्राफर म्हणून ओळख निर्माण झाली होती. त्यासोबतच आपले वैद्यकीय शिक्षण चालूच ठेवले होते. अभिनेत्री होईल याची तिला कधीच अपेक्षा नव्हती. अचानक मिळालेल्या संधीमुळे कोरिओग्राफरची अभिनेत्री बनली. साईला अवघ्या कमी कालावधीत अत्यंत प्रतिष्ठेचे असलेले दोन फिल्मफेअर अवॉर्ड आणि SIIMA अवॉर्ड मिळाला आहे. 

एका मुलाखतीत साई पल्लवीने हे स्पष्ट केले की, ते मुरूम नाही. तो (Rosacea) एक स्किनचा आजार आहे. जेव्हा मी कॅमेरा आणि प्रकाशात येते तेव्हा माझा चेहरा गुलाबी होतो, असे तिने सांगितले होते. या आजाराला वैद्यकीय शब्दात Rosacea असे म्हटले जाते. त्वचेच्या खालच्या स्तरांतील केशवाहिन्या बराच काळ प्रसरण पावल्यामुळे गाल आणि नाक फुललेली दिसतात. तिच्या चेहऱ्यावरील मुरूम दिसण्यावरून टॉलीवूडमध्ये मोठी चर्चा झाली होती; मात्र तिच्या अभिनय आणि डान्समुळे आता सर्वांचे तोंड बंद झाले आहेत. तिचे म्हणणे आहे की, सौंदर्य पाहणाऱ्यांच्या डोळ्यात असते. 

साईने दोन कोटी रुपयांची जाहिरात नाकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाली की, "मी स्वतःच चेहऱ्यावरच्या पुटकुळ्या आणि फोडांना त्रस्त असताना, एखादा फेअरनेस क्रीमची जाहिरात करणे म्हणजे पैशांसाठी जनतेची फसवणूक करणेच झाले! त्यामुळे मी ही ऑफर नाकारली', असे ती नम्रपणे सांगते. सतत जाहिरातींतून वर्षानुवर्षे गोरा रंग, नितळ त्वचा, मेरी खुबसूरती का राज, असे वरवर वायफळ बडबडणाऱ्या अभिनेत्रींना व जाहिरात कंपनींना साई पल्लवीने दिलेली चांगलीच चपराक आहे, असेच म्हणावे लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com