राजकीय आरोपांना मिळू लागलेय पुराव्यासह प्रत्युत्तर (ब्लॉग)

अतुल पाटील 
मंगळवार, 7 मे 2019

मराठी माध्यमांचा "प्राईम टाईम' एकट्या राज ठाकरेंनीच काबीज केला. प्रत्युत्तर म्हणून राज्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांचे आरोप खोडून काढण्यासाठी त्यांच्याच शैलीत "आता बघाच तो व्हिडिओ' हा सिलसिला दाखवला.

जाहीराम्याशिवाय एकमेकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुर्वी निवडणूकीत बाहेर निघायची. निकाल लागले कि, त्या आरोपांचे काय झाले. हे विचारायची सोय देखील मतदारांना नाही. यंदा तर, जाहीरनाम्यावर मते मागण्याच्या प्रकाराला तिलांजली मिळतेय कि काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूकीत प्रचाराची पातळी अधिकच घसरतेय. सोशल मीडियावर पक्षाचे, नेत्यांचे कट्टर फॉलोअर्स तयार झाल्याने नवमाध्यमातील प्रचार तर वैयक्‍तिक, कौटूंबिक पातळीवर येत आहे. अश्‍लिल भाषेचा वापर सर्रास होतोय. सत्तेत बसायला इच्छुक एकमेकांची उणेदुणे काढताना सारेच पत्ते उघडे पडतायत. यात दुसरी बाजू फारच आश्‍वासक वाटत आहे. राजकीय आरोप झाल्यानंतर ती खोडून काढण्यासाठी एक व्यवस्थाच उभी राहतेय. याची काही उदाहरणे समोर येत आहे. यात कुणी लंगडे समर्थन करतोय. कुठे पंचाईत होत आहे तर, कुठे चर्चेलाच पुर्णविराम मिळत आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आधीच्या वक्‍तव्यांसह मोदी सरकारच्या धोरणांवर, जाहीरातबाजीवर प्रहार केला. गुढीपाडव्याच्या सभेपासून "ए लाव रे तो व्हिडिओ'ची सिरीज तब्बल वीस दिवसानंतर संपली. दरम्यान, मराठी माध्यमांचा "प्राईम टाईम' एकट्या राज ठाकरेंनीच काबीज केला. प्रत्युत्तर म्हणून राज्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांचे आरोप खोडून काढण्यासाठी त्यांच्याच शैलीत "आता बघाच तो व्हिडिओ' हा सिलसिला दाखवला. तत्पूर्वी मोठा गाजावाजाही केला. मात्र, लाखोंच्या सभेसमोर ठाकरेंनी केलेली पोलखोल आणि मिळणारा प्रतिसाद हे पाहता शेलारांची चार भिंतीआडची निवडक लोकांसमोर सादर केलेली मोहीम पुरती फसली. अपवादात्मक स्थितीत मोजकेच आरोप खोडता आल्याने ते केवळ लंगड समर्थन ठरले. 

गृहखात्याची जबाबदारी असणारे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीत केवळ पुष्पचक्र वाहायला जातात.' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. यानंतर शरद पवार समर्थकांनी आणि राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेलतर्फे दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रतिकुल परिस्थितीत कसे पालकमंत्रीपद स्वीकारले होते. त्यावेळी केलेल्या कामांचा लेखाजोखा, फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले. ही टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली. भाजपने ट्‌विटरवरुन शरद पवारांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. "गडचिरोलीला सर्वाधिक दहावेळा भेट देणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. त्यांनी नेमके काय केले याचा तपशील देण्यात आला आहे. आता आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आपण कितीवेळा, कशासाठी गडचिरोलीला गेलात, याचीही माहिती कृपया आपण महाराष्ट्राला द्याल का? असा प्रतिउत्तरानंतर सवाल उपस्थित केला. मात्र, ही चर्चा आता पुर्णपणे थांबली आहे. 

सत्तेवर येताच, कर्जमाफी करु, असे आश्‍वासन कॉंग्रेसने देत काही महिन्यांपूर्वीच मध्यप्रदेशमधील मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचे सरकार उलथवून टाकले होते. कॉंग्रेसने कर्जमाफीदेखील केली. मात्र, लोकसभा निवडणूकीत चौहान यांच्याकडून शेतकरी कर्जमाफी निव्वळ धुळफेक असल्याचे आरोप कॉंग्रेसवर होत आहे. प्रत्युत्तर देण्यासाठी कॉंग्रेसचे सुरेश पचौरी, पीसी शर्मा यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने थेट चौहान यांचे निवासस्थान गाठले. प्रत्युत्तर म्हणून कर्जमाफी केल्याचे पुरावे त्यांच्या टेबलवर ठेवले. कागदपत्रांमध्ये शेतकऱ्यांची नावे, मोबाईल, प्रमाणपत्र, कोणत्या बॅंकेचे कर्ज घेतले याचा सविस्तर तपशीलच यात आहे. शिवराज चौहान यांची मात्र, पंचाईत झाली आहे. 

इतर ब्लॉग्स