काळाची पाऊले ओळखा, निवडणूक करा बिनविरोध

residentional photo
residentional photo

        नाशिक जिल्हा आणि परिसर हा इतिहासकाळापासून क्रांतिकारी, पुरोगामी आणि समाजविकासाला चालना देणारा प्रदेश राहिला आहे. या पवित्र भूमीतून अनेक क्रांतिकारक, थोर देशभक्त आणि समाजसुधारक होऊन गेले. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळखंडात आपल्या अभूतपूर्व क्रांतीकार्याने महान कार्य करून स्वातंत्र्यचळवळीला आणि समाज प्रगतीला दिशा देणारे , गतिमान करणारे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक हे एक थोर देशभक्त. क्रांतिवीर वसंतराव नाईक यांचा जन्म नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील श्रीमंत आणि सुसंस्कृत  जमीनदार नारायणराव नाईक यांच्या घरात १३ डिसेंबर १९१२ ला झाला
    स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी अनेक सायमन कमिशनला विरोध करीत- म.गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. प्रसंगी तुरुंगवास भोगला. भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. मनमाड नगरपालिकेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहण्याचा त्यांना बहुमान मिळाला. बिहार येथे झालेल्या भूकंपात डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपले स्वतंत्र पथक तयार करून भूकंपग्रस्तांना मदत केली.  १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला. याच काळात भूमिगत असतानाचा आईचे दु:खद निधन झाले. घराभोवती असलेला पोलीस पहारा चुकवीत स्रीच्या वेषात वसंतरावांनी आईचे अंत्यदर्शन घेतले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत ते  विजयी झाले.पुढे  १९६२ व १९६७ असे दोन वेळेस ते  नाशिक मधून निवडणूक लढवून विजयी झाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ते तह्यात सदस्य होते. १४ डिसेंबर १९६८ रोजी भुसावळ येथे वीज कामगारांच्या मेळाव्यात भाषण करीत असतांना ह्दय विकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे दु:खद निधन झाले. नाशिक मध्ये गोदाकाठी साश्रू नयनांनी त्यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या त्यांच्या जनतेने या लोकनायकास अखेरचा निरोप दिला.
    

आपल्या लाडक्या नेत्याच्या वियोगाचे दु:ख हलके करण्यासाठी व क्रांतिवीरांच्या कार्याची चिरंतन स्मृती राहावी हा उद्दात्त हेतू बाळगून नाशिक जिल्ह्यातील वंजारी समाजाच्या जेष्ठ धुरिणांनी त्यांच्या नावाने १९६९ मध्ये क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. तत्पूर्वी या जागेवर डोंगरे विद्यार्थी वसतिगृह नावाची संस्था कार्यरत होती. १६ एप्रिल १९२० रोजी कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या शुभहस्ते नाशिक मध्ये उदोजी मराठा बोर्डिंग, शाहू बोर्डिंग आणि वंजारी बोर्डिंग अशा तीन बोर्डिंगचा शुभारंभ झाला. वंजारी बोर्डिंगचेच पुढे ‘डोंगरे विद्यार्थी वसतिगृह’ असे नामकरण करण्यात आले. या वसतिगृहामुळे ग्रामीण भागातील अनेक हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची कवाडे खुली झाली. ६ जानेवारी १९५३ रोजी संस्थेची अधिकृत नोंदणी झाली. पुढे लोकभावनेचा आदर ठेवत प्रशासकीय सोयीसाठी दिनांक १० मे १९९९ रोजी ‘डोंगरे विद्यार्थी वसतिगृह’ आणि ‘क्रांतिवीर वसंतराव  नारायणराव नाईक एज्युकेशन सोसायटी’ या दोन्ही संस्थांचे एकत्रीकरण करून सामाईक योजनेद्वारे ‘क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, नाशिक या नावाने नवीन संस्थेची निर्मिती करण्यात आली.
    शहरी व ग्रामीण भागातील उपेक्षित व वंचित घटकांना दर्जेदार व उत्कृष्ट शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटीबद्ध असणाऱ्या या संस्थेने  “ दुरितांचे तिमिर जावो ” हे ब्रीद घेऊन आपला सातत्यपूर्ण विकासाचा प्रवास केला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुद्धा या संस्थेवर भरभरून प्रेम केले. नाशिक दौरा असतांना साहेब संस्थेवर आले नाही असे कधीच झाले नाही. संस्थेच्या प्रत्येक विकासकामाच्या जडघडणीत साहेबांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. साहेबांनी या संस्थेचेपालकत्व स्वीकारले होते. आणि त्याच भावनेतून जन्मभर साहेब या संस्थेच्या पाठीशी उभे राहिले. साहेबांच्या आठवणी चिरकाल लोकमानसाच्या स्मरणात राहाव्यात म्हणून लोकभावनेतून संस्थेच्या कार्यकारी मंडळाने एकमुखाने निर्णय घेऊन  संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयास त्यांचे नाव दिले.
       

 आजमितीस संस्थेच्या एकूण ६४ शाखा असून त्यात अनेक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, आय.टी.आय. तंत्रनिकेतन  व सुसज्ज असे अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. संस्थेचा हा ज्ञानवृक्ष दिवसेंदिवस बहरत आहे. नुकतेच संस्थेला औषधनिर्माण शास्त्र मंजूर झाले असून या महाविद्यालयाच्या निमित्ताने  संस्थेच्या लौकिकात अजून एका चांगल्या विद्याशाखेची भर पडली असून उच्च शिक्षणाचे एक नवे दालन समाजातील गरजू विध्यार्थ्यांसाठी आज उघडले गेले आहे. 
    

   संस्थेचा हा प्रगल्भ असा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा समर्थपणे पुढे नेण्यामध्ये अनेक समाजधुरिणांनी आपले योगदान दिले आहे. विद्यमान कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सध्या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. कार्यकारी मंडळाच्या एकूण २९ जागांसाठी हि निवडणूक होत आहे. संस्थेच्या सभासदांमध्ये निवडणुकीविषयी प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल असल्याचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी झालेल्या विराट गर्दीवरून दिसून येते. नाशिक जिल्ह्याला मोठी शैक्षणिक परंपरा आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या खांद्याला खांदा लावून या परंपरेत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न व्ही.एन.नाईक शिक्षण संस्था करीत आहे.  सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आणि कर्मवीर, क्रांतिवीरांच्या व्यापक दृष्टीकोनातून नाशिक जिल्हात मराठा विद्या प्रसारक समाज आणि व्ही.एन.नाईक शिक्षण संस्था या दोन सामाजिक संस्थांचा कारभार यशस्वी पणे सुरु आहे. गेल्या काही वर्षात व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचा चेहरा मोहरा झपाट्याने बदलत चालला असून काळाची पाऊले ओळखून संस्थेने अनेक चांगले व्यवसायिक कोर्सेस आणि महाविद्यालये सुरु केली असून नाशिक शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूक भागविण्याचा प्रयत्न केला आहे. या गोष्टीचा सगळ्या समाजबांधवाना निश्चितच अभिमान आहे. 
     सध्या निवडणुकीमुळे सगळे वातावरण ढवळून निघाले असून सत्तेसाठी दावे प्रतिदावे केले जात आहे. सत्ताधारी आणि त्यांचे विरोधक पॅनल निर्मितीमध्ये मश्गुल आहेत. अशावेळी या सर्वानीच सभासदांच्या भावना लक्षात घेऊन विवेकाने पाऊले टाकण्याची गरज आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टींचा प्रचंड अपव्यय होणार असून भटके विमुक्त असलेल्या समाजाला हि गोष्ट जशी परवडणारी नाही तशीच ती विकसित अवस्थेत असलेल्या संस्थेला सुद्धा आर्थिक दृष्ट्या परवडणारी नसून त्यासाठीच समाजाच्या धुरिणांनी हि निवडणूक बिनविरोध करून भावी पिढीपुढे एक वेगळा आदर्श निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी लहानांनी नम्रता तर थोरांनी मनाचा मोठेपणा दाखवून प्रसंगी दोन पाऊले मागे येण्याची तयारी ठेवावी लागेल. मर्यदित संख्या असल्यामुळे जिल्हाभरात एकमेकांचे नातेवाईक पसरले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने समाजबांधव गटागटात विभागला जावून त्याचा वर्षानुवर्षाच्या नातेसंबंधांवर वाईट परिणाम होऊन अंतर्गत शत्रुत्व निर्माण होते.त्याचा अनिष्ट परिणाम संस्थेच्या विकासकामांवर होतो. हा धोका टाळण्यासाठी आणि समाजाला एकसंध ठेवण्यासाठी हि निवडणूक बिनविरोध होणे काळाची गरज आहे.

     या निवडणुकीच्या निमित्ताने एक चांगला संदेश समाजाला देण्याची संधी काळाने वंजारी समाजाच्या नेतृत्वाला दिली आहे. मला वाटते या संधीचे आपण स्वागत करून तिचा आदर राखावा आणि हि निवडणूक बिनविरोध करून नितळ आणि निर्मळ वातावरन निर्माण करावे. संस्थेचा हा भव्य डोलारा सांभाळू शकतील अशा कर्तबगार लोकांच्या हातात हा कारभार देऊन संस्थेच्या जेष्ठ धुरिणांनी आपल्या पूर्वसुरींनी घालून दिलेल्या परंपरेचा व सभासदांच्या भावनांचा आदर करावा. जेणेकरून भविष्यात संस्थेचा विकासवृक्ष अधिक जोमाने बहरेल.
  - विजय सोनवणे,व्यवस्थापन परिषद सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com