काँग्रेसयुक्त भाजप??

शिवराम वैद्य
शनिवार, 27 जुलै 2019

पूर्वी विविध निवडणुकांमध्ये ज्या नेत्यांच्या अकार्यक्षमता, स्वार्थीपणा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध भाजपचे नेते कंठशोष करत होते आज त्याच नेत्यांना ते चांगले असल्याचे प्रमाणपत्र देऊन भाजपमध्ये प्रवेश देत आहेत.

सध्या भाजपच्या नेत्यांनी आघाडीतील विविध नेत्यांना भाजपमध्ये घेऊन "पवित्र" करण्याचा सपाटा लावला आहे. पूर्वी विविध निवडणुकांमध्ये ज्या नेत्यांच्या अकार्यक्षमता, स्वार्थीपणा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध भाजपचे नेते कंठशोष करत होते आज त्याच नेत्यांना ते चांगले असल्याचे प्रमाणपत्र देऊन भाजपमध्ये प्रवेश देत आहेत.

इतकेच नव्हे तर त्यातील काहींना त्यांनी सरकारमध्ये मंत्रीपदेही देऊ केली आहेत. या नेत्यांना सर्व आरोपातून मुक्त करून, "पतितपावन" करण्याचा असा कोणता मंत्र भाजपच्या नेत्यांना मिळाला आहे कळत नाही. या "पुण्य" कर्माच्या सोहळ्यामध्ये अतिउत्साहीपणे आणि अफाट कार्यक्षमतेने कार्यरत असलेले चंद्रकांतदादा पाटील यांची वक्तव्ये वाचून तर हसावे की रडावे तेच कळत नाही.

भाजपचा जनाधार वाढवण्यासाठी "नवीन" लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे असे वक्तव्य केले. हे "नवीन" लोक म्हणजे भाजपमध्ये "नवीन" पण राजकारणात "जुनेपुराणे" असे वाक्य त्यांनी मनाशी बोलले असावेत. तसेच असे करताना त्यांनी त्याच "नवीन" लोकांमध्ये आघाडी सरकारचे माजी भ्रष्ट मंत्री-आमदार-खासदारही सामील आहेत काय यावर खुलासा करावयास हवा होता. विरोधी पक्षातही काही "चांगले" लोक आहेत आणि आम्ही त्यांना भाजपमध्ये आणणार आहोत अशीही मखलाशी त्यांनी केली आहे. अर्थात या लोकांचा "चांगूलपणा" ठरवण्याचे निकष काय आहेत हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले. तसेच "दादा" (म्हणजे चंद्रकांत दादा) म्हणतील, ते लोक "चांगले" आणि जनतेनेही त्या लोकांना कोणतेही प्रश्न न विचारता "चांगले" म्हटलेच पाहिजे अशीही त्यांची अपेक्षा दिसली. असे करताना भाजपमधील जुन्या-निष्ठावान कार्यकर्त्यावर आपण अन्याय करत आहोत, त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहोत याची त्यांना जाणीवही नसावी हे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जनतेने जे नेते नकोत म्हणून भाजपला सत्ता दिली, त्याच नेत्यांना तुम्ही, असे पावन करून मागील दाराने भाजपमध्ये घेणार असाल आणि जनतेनेही या पक्षांतराला मान्यता द्यावी अशी तुमची समजूत असेल तर ती संपूर्णपणे चुकीची आणि गैरवाजवी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले होते की मी गेल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही संस्था, साखर कारखाना, पतपेढ्या, बँका उभ्या केल्या नाहीत, कोणतेही स्वार्थाचे काम केले नाही. पूर्वीच्या आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी असे अनेक "उद्योग" केले होते आणि मग त्यांचा सरकारमधील सगळा वेळ आपापल्या संस्थांचे हितसंबंध जपण्यातच जायचा आणि जनहितांच्या कामाकडे ते कधीही लक्षच देत नसत. फडणवीसांची ही स्पष्टोक्ती खरी असली तरी आजकाल त्यांनी याच आघाडी सरकारच्या माजी मंत्री, आमदार-खासदारांना भाजप मध्ये प्रवेश देण्याचा सपाटाच लावला आहे. पाच वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यामुळे आणि आघाडीमध्ये राहिलो तर, येणारी पंधरा वर्षे सत्ता मिळण्याची कोणतीही शाश्वती नसलेल्या या नेत्यांना भाजप कोणत्या निकषांवर असे पवित्र करून घेते आहे, याचाही खुलासा मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. तसेच या संधीसाधूना त्यांनी पुन्हा मंत्रीपदे दिलीच तर ते पुन्हा पूर्वीचेच "उद्योग" करणार नाहीत याची खात्री काय याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी जनतेला विश्वास द्यायला हवा.

याबरोबरच अशा भ्रष्टाचाऱ्यांची पुनर्स्थापना करतांना, भाजपमधील जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय होतो आहे इकडेही सर्व संबंधितांनी लक्ष दिले पाहिजे. सारांश काय तर "काँग्रेसमुक्त" भारत करण्यासाठी भाजपचे नेते "काँग्रेसयुक्त" भाजप करत आहेत आणि तेही जनतेला गृहित धरून, हे सर्वथा अयोग्य आहे. म्हणूनच भाजपच्या नेत्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवावेत आणि जनतेला कोणत्याही बाबतीत गृहित धरण्याची चुकी करू नये असा सल्ला द्यावासा वाटतो.

इतर ब्लॉग्स