"मोठं खेडं' नको; आता हवी "नगर सिटी'

ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नगरचा चेहरा बदलण्याची चर्चा वर्षानुवर्षे होते. प्रत्येक महापालिका, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत हा मुद्दा असतोच. प्रत्येक उमेदवार याचे भांडवल करतो. सत्ताधारी आपण काय केले याचा गवगवा करतात; तर विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. हे गणित नित्याचेच आहे. मात्र, नगरला खऱ्या अर्थाने बदलविण्याचे काम कोणीही करू शकले नाही, हे वास्तव आहे.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नगरच्या काही लहान रस्त्यांवरून जावे लागले. शहरात येताच अतिक्रमणयुक्त रस्ते त्यांना दिसले नसतील तर नवलच! शहरातील इमारतींच्या अतिक्रमणांबरोबरच दुकानदारांनी वाढवून ठेवलेल्या अतिक्रमणाचेही दर्शन झाले. तत्पूर्वी काही ठिकाणी सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी रॅलीसाठीचा रस्ता खऱ्या अर्थाने मोकळा दिसलाच नाही. रॅलीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना नगरकरांनी भरभरून प्रेम दिले असले, तरी नगरकरांचा श्‍वास मोकळा करावा, असा संदेशही एकप्रकारे दिला आहे. आता आगामी काळात "मोठं खेडं' हे बिरुद जाऊन "नगर सिटी' हे नामांकन होण्यास खऱ्या अर्थाने वाव आहे, असेच म्हणावे लागेल.

एकहाती सत्ता, हीच संधी
नगरचा चेहरा बदलण्याची चर्चा वर्षानुवर्षे होते. प्रत्येक महापालिका, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत हा मुद्दा असतोच. प्रत्येक उमेदवार याचे भांडवल करतो. सत्ताधारी आपण काय केले याचा गवगवा करतात; तर विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. हे गणित नित्याचेच आहे. मात्र, नगरला खऱ्या अर्थाने बदलविण्याचे काम कोणीही करू शकले नाही, हे वास्तव आहे. सध्या केंद्र व राज्यात एकहाती सत्ता आहे. असे असताना नगरच्या भौतिक सुविधांकडे दुर्लक्ष होते, ही शोकांतिकाच आहे. शहरातील अंतर्गत रस्ते, गटारांची पुनर्बांधणी यावर ऍक्‍शन प्लॅन तयार होऊन हा प्रश्‍न एकदाचा मार्गी लावला पाहिजे. अतिक्रमणे काढण्यासाठी नुसतीच गाडी फिरवून उपयोग नाही, तर जुन्या इमारतींच्या बाबतीत नियमानुसार कारवाई होऊन अतिक्रमणे हटविली पाहिजेत. यापूर्वीही अनेकदा प्रयत्न झाले; परंतु सत्ताधाऱ्यांनी मोहीम घेतली, की विरोधक आडवे येत होते. सत्ता एकहाती नव्हती. त्यामुळे निर्णय घेण्यास अडचणी येत होत्या. आता स्थानिक पातळीपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत एकहाती सत्ता आहे. त्याचा फायदा नगरकरांनी घेतला पाहिजे. शहराला सुंदर करून घेतले पाहिजे.

वाढत्या उपनगरांचा बोलबाला
नगर शहराच्या आजूबाजूला केडगाव, नवनागापूर, कल्याण रोडवरील वाढते शहरीकरण ही उपनगरे मुख्य शहराला लाजवतील, अशी तयार होत आहेत. बहुतेक नगरकर गजबजीतून बाहेर जाऊन निवांत राहण्यासाठी उपनगरांना पसंती देत आहेत. त्यामुळे सध्या नगरमध्ये उपनगरांचाच बोलबाला दिसून येत आहे. त्यामुळेच मागील काही वर्षांपासून नगरमधील गणेशविसर्जन मिरवणुकीत पाइपलाइन रोडवरील मिरवणूक चर्चेची ठरत आहे. या भागात असलेल्या बाजारपेठा शहरातील बाजारपेठेला मागे टाकू पाहत आहेत. हळूहळू स्थलांतर होत असल्याने उपनगरांना तरुण चेहरा, तर मुख्य शहराला वार्धक्‍याकडे झुकलेला चेहरा प्राप्त झाला आहे. त्यामुळेच वाढत्या उपनगरांचा बोलबाला होत असताना शहराच्या चेहऱ्याकडेही पाहण्याची गरज आहे.

ऐतिहासिक वास्तूंची दुर्दशा
नगर शहर हे ऐतिहासिक वास्तूंनी ओतप्रोत भरलेले आहे. भुईकोट किल्ला, वस्तुसंग्रहालय, इंग्रजांच्या काळातील काही भक्कम इमारती, तसेच ठिकठिकाणी असलेल्या ऐतिहासिक खुणा हे येथील वैशिष्ट्य. मात्र, अशा वास्तूंच्या आजूबाजूला गजबज वाढली आहे. रस्ते अतिक्रमणांनी भरलेले आहेत. त्यामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होते. साहजिकच असे पर्यटक तिकडे फिरकत नाहीत. वस्तुसंग्रहालयात जाण्यासाठी तर अनेकदा कोंडीमुळे प्रदूषणाचा सामना करण्याची वेळ येते. वाहने पार्किंगची सुविधा नसल्याने सहलीही तेथे येऊ शकत नाहीत. नगरचा चेहरा बदलवताना अशा ऐतिहासिक वास्तू व जवळील परिसराच्या अतिक्रमणांची एकदा झाडाझडती व्हायलाच हवी.

खराब रस्त्यांची समस्या
शहरात अतिक्रमणांबरोबरच खड्डेमय रस्त्यांची मालिका आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या मार्गावर पॅचअप केले होते. अशीच दुरुस्ती आवश्‍यक तेथे करणे गरजेचे आहे. आपत्कालीन परिस्थिती म्हणून मुख्यमंत्री लाल टाकी ते दिल्ली गेटमार्गे शहरात आले असते, तर त्यांना खऱ्या नगरचे दर्शन घडले असते. नगरी रस्ते खऱ्या अर्थाने पाहायला मिळाले असते. त्यामुळे शहरातील बहुतेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दोन्ही बाजूंनी अतिक्रमणाने ओतप्रोत फेरीवाले, मध्ये खराब रस्ते यामुळे वाहनचालक व फेरीवाल्यांमध्ये भांडणे सुरू असतात. हे स्थानिक पुढारी म्हणविणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. अधिकाऱ्यांनीही राजकीय दबावाला बळी न पडता ठोस निर्णय घेऊन खराब रस्त्यांबाबत कठोर भूमिका घेण्याची नितांत गरज आहे.

विजेच्या तारांचा धोका
शहरात विजेच्या तारांचा धोका कायम असतो. बहुतेक झाडांमधून विजेच्या तारा गेलेल्या दिसतात. त्यामुळे विजेचा धक्का लागण्याची भीती अधिक बळावते. अशा तारांमुळे मुख्यमंत्र्यांना अनेकदा रथात खाली यावे लागले. ते येण्याच्या आधीच काही तारांचा बंदोबस्त केला असला, तरी सर्व बदलणे शक्‍य नसते. साहजिकच असा धोका वारंवार मोठ्या वाहनांना होतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी तरी विजेच्या तारांबाबत दक्षता घेण्याची गरज आहे. तारांच्या खालील परिसर संरक्षित असायला हवा. शहरीकरणात तसे मात्र होत नाही. यापूर्वी तारा तुटून अपघात होण्याचे प्रकार नगरमध्ये झालेले आहेत. एकूणच रस्त्यांवरील खांब, तारांचा अडथळा हेही एक नगरच्या वाहतूक कोंडीचे कारण आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही.

इतर ब्लॉग्स