दात आहेत; पण चणे नाहीत!

कंधार
कंधार

ऑरिक इंडस्ट्रियल टाऊनशिप आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या निमित्ताने औरंगाबादबरोबरच मराठवाड्यासाठी औद्योगिक जगताची दारे खुली होत आहेत. त्यानिमित्ताने या भागातील पर्यटनाच्या विकासाकडे लक्ष दिल्यास अनेक पर्यटनस्थळांनी समृद्ध असलेल्या या भागाची जागतिक ओळख तयार होऊ शकणार आहे. 

अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, बिबी-का-मकबरा आणि पाणचक्की ही पाच स्थळे पाहण्यासाठी आज प्रामुख्याने पर्यटक येतात. केवळ दोन दिवसांच्या मुक्कामात ही स्थळे पाहून पर्यटक मराठवाड्यातून निघून जात असेल, तर त्याने कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्याच नाहीत, हे स्पष्ट आहे. पण या स्थळांची माहिती आणि तिथपर्यंत पोचण्यासाठीची सुलभ दळणवळणाची साधने पर्यटकांना सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यासाठी पर्यटन खाते आणि एकूणच प्रशासन यंत्रणा काय करते, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. मराठवाड्याचे पर्यटन केवळ अजिंठा आणि वेरूळकेंद्री न राहता मराठवाड्यात ऐतिहासिक, धार्मिक टुरिस्ट सर्किट आखून विकास करणे गरजेचे आहे. ही कोणकोणती सर्किट्‌स मराठवाड्यात तयार करता येऊ शकतात? 

किल्ल्यांची सफर 
'देवगिरी'बरोबरच गौताळा अभयारण्यात मराठवाडा आणि खानदेशच्या सीमेवर उभे अंतूर, सुतोंडा, जंजाळा, वेताळवाडी हे किल्ले. शिवाय इतर नांदेड जिल्ह्यात कंधार आणि रामगड (माहूर), लातूर जिल्ह्यात उदगीर आणि औसा, उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा आणि नळदुर्ग, बीडचा किल्लेधारूर असे वीसेक डोंगरी आणि भुईकोट किल्ले मराठवाड्यात आहेत. 

लेणींनी समृद्ध मराठवाडा 
अजिंठा-वेरूळसह कन्नड तालुक्‍यातील पितळखोरा लेणी, औरंगाबादची लेणी, सोयगाव तालुक्‍यातील घटोत्कच आणि रुद्रेश्‍वर लेणी या वाकाटक, राष्ट्रकुटकालीन लेणींना प्रकाशात आणून पर्यटनाचे नवे दालन खुले करता येऊ शकते. त्याखेरीज अंबाजोगाईचा हत्तीखाना, धाराशीवची लेणीही पर्यटनाच्या दृष्टीने समोर आणता येऊ शकते. अंबाजोगाई शहर हेच एक स्वतंत्र पर्यटनस्थळ विकसित होऊ शकते. 

प्रत्येक जिल्हा पर्यटनस्थळांनी समृद्ध 
मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा हा पर्यटनस्थळांनी समृद्ध आहे. परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि औंढा नागनाथ ही तीन ज्योतिर्लिंगे, माहूरगडवासिनी रेणुकेचे शक्तिपीठ, अंबाजोगाईची योगेश्वरी, तुळजापूरची आदिशक्ती तुळजाभवानी, बीडचा कंकालेश्वर, कपिलधार, सौताडा, धर्मापुरी अशी ठिकाणे, नांदेडचा सचखंड हुजूरसाहेब गुरुद्वारा, जालना जिल्ह्यातील राजूर अशी धार्मिक स्थळे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने एक सर्किट विकसित करता येऊ शकते. 

मंदिर, दर्गा आणि इतर धार्मिक स्थळे 
औरंगाबाद जिल्ह्यातही अन्वा येथील शिवमंदिर, खुलताबाद येथील भद्रामारुती, सुफी संतांचे दर्गे, मलिक अंबरचे थडगे, औरंगजेबाची कबर, म्हैसमाळचा बालाजी, शूलिभंजन येथील दत्तमंदिर अशी एक ना अनेक पर्यटनस्थळे आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पैठण या ठिकाणी असणारा विशाल नाथसागर, संत एकनाथांचे समाधी मंदिर, शालिवाहनाचा प्राचीन तीर्थस्तंभ आणि गोदावरीचे घाट पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात. 

नहरींचे शहर 
मुघल आणि निजामी स्थापत्याने नटलेल्या औरंगाबादेत नहरींद्वारे पाणी आणण्याची कला मलिक अंबरने आणली. नहर-ए-अंबरीनंतर शहरात आणि परिसरात एकूण 13 नहरींची उभारणी झाली. यात प्रसिद्ध पाणचक्की आणि थत्ते नहर आजही सुस्थितीत पाहायला मिळतात. इतरही काही नहरींना अजून पाणी आहे. या नहरींबरोबरच शहरातील इतर ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना दाखवता येऊ शकतात. 

पर्यटन केंद्रे सुरू व्हावीत 

  1. औरंगाबादेत आज अनेक पंचतारांकित सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे विदेशी पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात. त्याखेरीज देशी पर्यटकांनाही परवडतील अशी शेकडो हॉटेल्स, पर्यटक केंद्रे येथे आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची वेरूळ, अजिंठा, फर्दापूरची पर्यटक सुविधा केंद्रे सुरू झाल्यास पर्यटकांना विरंगुळ्याची साधने निर्माण होतील.  
  2. पर्यटनवृद्धीच्या संधी आणि अपेक्षा 
  3. औरंगाबादपासून नांदेडपर्यंत एक थीम बेस्ड पर्यटन सर्किट उभे राहू शकते. यात धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटनाबरोबरच आता कृषी पर्यटनाचा विचारही जोर धरत आहे. दौलताबाद, वेरूळ, कसाबखेडा, पळशी, गणेशवाडी परिसरातून तसे प्रयोगही होत आहेत. 
  4. उपरोक्त स्थानवैविध्याचे पर्यटन व्यावसायिक आणि शासकीय यंत्रणेने व्यवस्थित मार्केटिंग करणे गरजेचे आहे. कलाग्राम व्यवस्थितरीत्या सुरू करून तेथे कायमस्वरूपी प्रदर्शन व उपक्रम घेण्याची गरज आहे. 
  5. पर्यटन उद्योग हा प्रशिक्षित मनुष्यबळ, पाणी आणि ऊर्जासाधनांवर अवलंबून असतो. दुष्काळी मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या शहरात पाण्याची कमतरता आहे. यंदा पाऊस बरा झाला असला तरी टंचाई दूर करण्यासाठी शाश्‍वत उपाययोजना हव्यात. 
  6. औरंगाबाद शहरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पर्यटन विकास महामंडळाची कार्यालये आहेत. या कार्यालयांचे तहसीलसारखे रूपडे दूर करून त्यांना कॉर्पोरेट लूक देत ऍक्‍टिव्ह करण्याची गरज आहे. अनावश्‍यक बाबींवर पैसा खर्च करण्याऐवजी तो इतरत्र वळविता येऊ शकतो. केवळ अजिंठा आणि वेरूळमध्येच आनंदी राहणाऱ्या या विभागांनी 'मराठवाडा सर्किट' कसे विकसित करता येईल, यावर प्रामाणिकपणे विचार करण्याची गरज आहे. 

 
अत्यावश्‍यक गरज 

  1. औरंगाबाद विमानतळावरून मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि पुण्यासाठी नियमित विमानसेवा सुरू झाल्यास त्याला चांगला प्रतिसाद निश्‍चितच मिळणार आहे. त्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. गोवा, नागपूर, अहमदाबाद आणि जयपूरलाही विमानसेवा सुरू करण्याची मागणी आहेच. 
  2. विकासाचा मार्गही शेवटी डांबरी रस्त्यांवरूनच जातो. औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर शहरांना जोडणारे रस्ते खड्डेमुक्त आणि सुस्थितीत असावेत. अंतर्गत दळणवळण चांगले असेल तर पर्यटनाबरोबरच व्यापार, उद्योग आणि नागरिकांचे चलनवलन वाढेल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com