अशोकराव...शंकरराव का झाले?

संदीप काळे
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

मी साधारणत: नववीला असेन; माझ्या पाटनूर या गावामध्ये तेव्हाचे सरपंच साहेबराव देशमुख यांनी शंकरराव चव्हाण यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मी आणि माझ्या सात-आठ सहकाऱ्यांनी त्या कार्यक्रमासाठी जीवाचे रान केले होते. साहेबराव देशमुखांची एक स्टाईल होती, "ही पोरं फार जबरदस्त काम करतात' असं म्हणून त्यांनी आम्हाला फूल चार्ज केलं होतं. निवडणुका तोंडावर होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर शंकरराव चव्हाण यांच्या त्या परिसरात भेटीगाठी वाढल्या होत्या.

मी साधारणत: नववीला असेन; माझ्या पाटनूर या गावामध्ये तेव्हाचे सरपंच साहेबराव देशमुख यांनी शंकरराव चव्हाण यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मी आणि माझ्या सात-आठ सहकाऱ्यांनी त्या कार्यक्रमासाठी जीवाचे रान केले होते. साहेबराव देशमुखांची एक स्टाईल होती, "ही पोरं फार जबरदस्त काम करतात' असं म्हणून त्यांनी आम्हाला फूल चार्ज केलं होतं. निवडणुका तोंडावर होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर शंकरराव चव्हाण यांच्या त्या परिसरात भेटीगाठी वाढल्या होत्या.

आम्ही केवळ तयारीमध्येच पुढे नव्हतो; तर भाषणासाठीसुद्धा आमच्यापैकी दोघा-तिघा जणांची नावं पुढे होती. शाळेतल्या धृतराज गुरुजींनी आमची भाषणाची तयारी करून घेतली. ठरल्याप्रमाणे शंकरराव गावात आले आणि बैलगाडीत हलगीच्या तालावर त्यांचं स्वागत करण्यात आलं; त्याचबरोबर आम्हा दोघा-तिघांची भाषणं झाली. आतासारखी भलीमोठी माणसं, स्टेजवर सत्कार, स्वागत आणि नेत्यांपेक्षा वरचढ आणि लांबलचक भाषण कोणीच करायचे नाहीत. आमच्या तिघांची भाषणं; त्यानंतर साहेबराव बापू बारडकर आणि शंकरराव चव्हाण असाच त्या कार्यक्रमामध्ये भाषण करण्याचा क्रम होता. माझं भाषण जोरदार झालं. काही लिहून दिलेलं होतं. चार दिवस सतत पाठ केल्यामुळे ते चांगलं लक्षात राहिलं होतं; पण शंकरराव आणि बापू बारडकरांना वाटलं, की हे मी भाषण उत्स्फूर्तपणे करत आहे.

कार्यक्रम झाल्यानंतर शंकररावांनी "तो भाषण केलेला पोरगा कुठे आहे', असं म्हणत मला बोलवायला सांगितलं. मला काही कळेचना; आपलं काहीतरी चुकलं असावं, या भीतीमध्ये मी होतो. शंकररावांनी माझा हात हातामध्ये घेतला, बाजूच्या पीएकडे त्यांनी हात पुढे केला, पीएंनी त्यांच्या हातावर पन्नास रुपयांची नोट ठेवली, शंकररावांनी ती माझ्या हातामध्ये ठेवली, म्हणाले, "चांगलं भाषण केलं, कितवीला आहेस?' खूप आपुलकीने त्यांनी माझी विचारपूस केली. हातात दिलेल्या पन्नास रुपयांचं काही मोल नव्हतं; पण त्यांनी आस्थेने विचारपूस केल्यामुळे मी भारावून गेलो होतो. माझा हात हातामध्ये घेऊन ते गाडीपर्यंत गेले. गाडी सुरू झाली आणि शंकरराव चव्हाण निघून गेले. त्या दिवशी गावात "काय ते रामा काळेचं पोरगं?' अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आसपास कुठेही कार्यक्रम असेल, तर त्या वेळी शंकरावांना ऐकायला आणि त्यांना आवर्जून भेटायला मी पुढे असायचो. त्यांची ती आस्थावाईकपणे विचारपूस करण्याची पद्धत आणि पाठीवरून हात फिरवण्याची पद्धत शेवटपर्यंत कायम होती.शेवटच्या काळात नांदेडला ते खूप आजारी असताना त्यांना बोलता येत नव्हतं; पण डोळ्यांनी आणि स्पर्शांनी त्यांचं ते आपलेपण मला कायम जाणवत होतं. 

शंकररावांच्या जाण्यानंतर त्यांच्या पुण्याईवर अशोकरावांचं सारं राजकारण चाललं. कधी जातीचा फटका, कधी अकर्माशी बारमाशीचा घोळ, कधी पाटील-देशमुखचा वाद; तर कधी आपल्याच लोकांनी पाठीत खुपसलेला खंजीर, यातून मार्ग काढत काढत राज्याचं नेतृत्व करत असलेले अशोकराव आता मतदारसंघाचं नेतृत्व आपल्याकडे राहावं यासाठी लढाई लढत आहेत. या लढाईमध्ये अशोकराव पूर्णपणे शंकरराव झालेत. सत्तेच्या उंच शिखरावर गेलेला माणूस कसा पटकन जमिनीवर येतो आणि त्याला लोक आपलेसे वाटू लागतात. आपल्या राजकारणाच्या अख्ख्या हयातीमध्ये शंकररावांसारखी आस्था त्यांनी क्वचितच कोणाला दाखवली असेल. राजकारणात आलेलं प्रोफेशनलिजम इतरांच्या माध्यमातून करून घ्यायचं प्लॅनिंग, सर्वसामान्यांना भेटण्यासाठी तिऱ्हाईत माणसांची मध्यस्थी, पैशात तोलली-मोजली जाणारी सगळी भाकितं, नाती, जात-पात, धर्म यांचं कधीही गणित न लावता, आपल्या कुठल्याही माणसांकडे मागे वळून न पाहता, अशोकराव चव्हाण यांचा बेधडकपणे प्रवास सुरू झाला होता.

लोकसभा निवडणुकीला जबदस्त ब्रेक बसल्यामुळे अशोक चव्हाण यांनी आपल्या माणसांकडे मागे वळून पाहायला सुरुवात केली. गेल्या चार दिवसांपासून मी अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात फिरलोय, नांदेड शहरात फिरलोय. यादरम्यानच्या काळात अशोकराव चव्हाण यांचे आत्मीयतेचे इमोशनल किस्से लोक मला सांगत होते. पहिल्या रिंगला फोन घेणं, प्रत्येकाची आत्मीयतेने विचारपूस करणं, प्रत्येकाचा विषय तातडीने मार्गी लावणं, गावातील असणाऱ्या समस्या तातडीने सोडवणं या सगळ्यांवर अशोकरावांचा नंबर पहिला येतो. विकासकामं, लोकांसाठी पैसा खर्च करणं, त्यांच्या समस्या सोडवणं, हे अशोकरावांनी पूर्वी केलं नाही, असं अजिबात नव्हतं. फरक एवढाच होता, की आता ते ज्या आत्मीयतेने लोकांना जवळ करतात, त्यांना जवळ घेतात, हे त्यांनी पूर्वी केलं असतं, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, हेही तेवढंच खरं आहे. सत्ता, पद, पैसा मुरब्बी राजकारण्यांच्या पायाशी लोटांगण घालतच असतो. हे सगळं येतं आणि जातं; पण आस्था आणि कमावलेली माणुसकी तेवढीच शिल्लक राहते.

शंकररावांनी ते केलं आणि ते चिरंतर टिकून राहिलं. आज नांदेड जिल्ह्यात अनेकांच्या घरांत आपल्या आई-वडिलांचा फोटो नसेल; पण शंकररावांचा आहे. शंकररावांचा मुलगा म्हणून तो फोटो अशोकरावांचाही आहे; पण शंकरावांच्या फोटोसारखं अशोकरावांच्या फोटोला लोक किती आस्थेने पुजतात, हाही एक प्रश्न आहेच. मी काल तास-दीड तास अशोकरावांना भेटलो, तेव्हा शंकररावांच्या त्या काळातल्या स्पर्शाची जाणीव मला होत होती. म्हणजे मागे आयबीएनला असतानाची पाच वर्षे ते मुख्यमंत्री होते, वेगवेगळ्या पदावर होते. त्या काळात मी त्यांना भेटलो, अनेक वेळा त्यांच्यासोबत कव्हरेजच्या दौऱ्यावर होतो, त्या काळात मला कधीही अशोकराव शंकररावांसारखे दिसले नाहीत. आता ते निवडणूक हरलेत आणि विधानसभेलाही आपण निवडणूक हरू म्हणून ते असं वागतात, लोकांशी आस्थेने बोलतात, असं अजिबात नाही. त्यांनी आपली पूर्ण स्टाईल बदलली आहे, ती भविष्यात चिरंतर टिकण्याच्या दृष्टीने.

आपल्याला भेटायला आलेल्या माणसांना भेटण्यासाठी त्यांनी कुठल्याही आमदारांना मध्ये ठेवलं नाही. कुठल्याही लोकांचं काम राहिलं नाही पाहिजे, यासाठी त्यांचा स्वत:चा सुरू असलेला फॉलोअप मी अनुभवत होतो. आपल्या मुलीला बसवून ते गाववाईज सगळं प्लॅनिंग सांगत होते. लोकांशी कसं बोलायचं, त्यांची आस्थेने कशी विचारपूस करायची, याबद्दलचं ट्रेनिंग ते आपल्या मुलीला देत होते. शंकरराव लोकांच्या दृष्टीने आपले नेते कसे होते, हे कदाचित अशोकरावांना उशिरा कळालं असावं. साहेब आपला माणूस आहे आणि "साहेबांसाठी काहीपण...' ही भावना घेऊन गेली वीस वर्षं लोकांनी अशोकरावांना मागे फिरून बघायची वेळ येऊ दिली नाही; पण आता अशोरावांवर मागे फिरायची वेळ आली आहे, त्याचं कारण अशोकरावच आहेत.

मी नववीपासून ते पदवी होईपर्यंत जसं शंकररावांना अनुभवत होतो, तसा काहीसा अनुभव मला त्यांच्या कालच्या भेटीमध्ये आला. त्यांचं हे "बदलणं' निवडणुकीपुरतं नक्कीचं नव्हतं. निवडणुका येतात-जातात, शिल्लक राहते माणसाचे माणूसपण. आपल्याला शिकवणुकीतून, संस्कारातून मिळालेलं लोक जपण्याचं बाळकडू, ते बाळकडू आता अशोकरावांच्या माध्यमातून मलाही दिसलं आणि लोकांनाही दिसू लागलंय. मागचं सगळं दुखणं यातून भरून निघेल का? हे मला माहीत नाही; पण ही चांगल्या नांदीची सुरुवात झाली आहे, हे मात्र खरं आहे. 

इतर ब्लॉग्स