Pune Rains : ढगफुटी मान्य करा

किरणकुमार जोहरे, हवामानशास्त्रज्ञ
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी १०० मिलिमीटर प्रतितास असा होणारा पाऊस तो ढगफुटी, तर महाराष्ट्रात तसा होणारा पाऊस म्हणजे अतिवृष्टी, अशी संदिग्धता निर्माण करण्यात हवामान खात्याचे अधिकारी यशस्वी झाले आहेत. तसेच अतिवृष्टी, महावृष्टी आणि ढगफुटी या संकल्पनांबाबत जनमानसात कमालीचा गोंधळ आहे. हवामान खात्याने याबाबत दुटप्पी धोरण अमलात आणले आहे. प्रशासन आणि हवामान खाते यांच्यात आजही समन्वय नाही. 

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी १०० मिलिमीटर प्रतितास असा होणारा पाऊस तो ढगफुटी, तर महाराष्ट्रात तसा होणारा पाऊस म्हणजे अतिवृष्टी, अशी संदिग्धता निर्माण करण्यात हवामान खात्याचे अधिकारी यशस्वी झाले आहेत. तसेच अतिवृष्टी, महावृष्टी आणि ढगफुटी या संकल्पनांबाबत जनमानसात कमालीचा गोंधळ आहे. हवामान खात्याने याबाबत दुटप्पी धोरण अमलात आणले आहे. प्रशासन आणि हवामान खाते यांच्यात आजही समन्वय नाही. 

प्रतितास १०० मिलिमीटर याप्रमाणे कोसळणाऱ्या पावसाला ढगफुटी म्हणजे ‘क्‍लाउडबस्ट’ म्हणतात, असा अधिकृत उल्लेख हवामान खात्याच्या अनेक अहवालांत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावरदेखील तो तसा २०१० सालापर्यंत वर्षानुवर्षे उपलब्ध होता.

डेन्मार्क, यूके, यूएस, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतासह इतर अनेक देशांतील संशोधक ढगफुटी म्हणजे ‘क्‍लाउडबस्ट’ या शब्दाचा वापर आपल्या वैज्ञानिक शोधनिबंधात करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जात असतानादेखील ढगफुटी ही संकल्पनाच अस्तित्वात नाही, असे दिशाभूल करणारे दावे हेतुपुरस्सर काही लोक करतात. त्यामागे आपली जबाबदारी झटकणे, हा उद्देश आहे. हवामान खात्याच्या गलथानपणाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे.

ढगफुटी झाली तर तशी मान्य करायला हवी, असा साधा आग्रह हवामान खात्याला मान्य नाही. नागरिकांना स्पष्ट सूचना मिळाल्या, तर नागरिक आवश्‍यक काळजी घेतील, हे स्पष्ट आहे. मात्र, भारतीय हवामान विभाग म्हणजे आयएमडी व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी म्हणजे आयआयटीएम याबाबत नागरिकांना स्पष्ट सूचना देण्यापेक्षा दिशाभूलच करीत आहेत, असे म्हणावे लागते.चोवीस तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त होणाऱ्या प्रत्येक पावसाला हवामान विभाग अतिवृष्टी म्हणत आहे. महाराष्ट्रात ढगफुटी झाली, तरी त्याला ‘अतिवृष्टी’ असा शब्दप्रयोग करीत हवामान खाते त्याचे गांभीर्य कमी करते. शिवाय, ढगफुटी झाली की हा २४ तासांत झालेला पाऊस आहे, असे सांगून हवामान खाते त्याची तीव्रता कमी करीत जनतेची दिशाभूल करीत आपली जबाबदारी झटकते. हवामान विभागाकडून ढगफुटीची लपवाछपवी करण्यामाग काही निश्‍चित हेतू आहेत. सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे ढगफुटी मान्य केली, तर त्याची होण्याआधी सूचना का दिली नाही, असा थेट प्रश्न जनता विचारू शकते, याची धास्ती हवामान संशोधन केंद्राला असते. लपवाछपवी केल्याने दोन फायदे होतात. एक ढगफुटीची सूचना देता आली नाही, हा नाकर्तेपणा लपविता येतो. दुसरा फायदा ढगफुटीची सूचना देण्यासाठी जनतेच्या खिशातील पैशातून खरेदी केलेल्या अब्जावधी रुपयांच्या रडार यंत्रणेने काय काम केले; किंबहुना काम का नाही केले, या प्रश्नाचे उत्तर देण्याची हवामान खात्याला गरज भासत नाही. ६५ मिलिमीटरपेक्षा पाऊस म्हणजे ‘जास्त पाऊस’ (Heavy Rain), १२५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस म्हणजे ‘खूप जास्त पाऊस’ (Very Heavy Rain), तर २५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस म्हणजे ‘अत्यंत जास्त पाऊस’ (Extremely Heavy Rain ) अशी संकल्पना हवामान खाते वापरते. ही पद्धती संदिग्ध, अपुरी, सदोष व गोंधळात टाकणारी आहे. त्याऐवजी चोवीस तासांतील कोणत्या तासात पाऊस झाला, दरतासाला किती मिलिमीटर पाऊस झाला, हे वर्गीकरण हवामान खाते नागरिकांना सांगू शकले; तर ते हवामान खात्याचे मोठे यश असेल.

इतर ब्लॉग्स