Happy Birthday Lata Mangeshkar : माझे लतागीत : भय इथले संपत नाही 

Lata-Geet.jpg
Lata-Geet.jpg

लतादीदींची गाणी ऐकतच आज लहानाचे मोठे झालेली आमची पिढी ! अगदी लहानपणी गाणं आणि गायक म्हटले की फक्त लता मंगेशकर हे एकच नाव कळत होते .त्यांच्या अनेक गाण्यांनी वयाच्या वेगवेगळ्या उंबऱ्यावर मोलाची साथ दिली आहे. पण जेव्हा आवडीच्या गीताचा विषय येतो तेव्हा आजही माझ्या मनाला आठवणींच्या हिंदोळ्यावर घेऊन जाणारे ते गाणे म्हणजे लता मंगेशकर यांनी सह्याद्री वाहिनीवरील 'महाश्वेता ' मालिकेसाठी गायलेले 'भय इथले संपत नाही ' हे शिर्षकगीत . मी तेव्हा नववी दहावीत होते . महाश्वेता मालिका सुरु झाली की कथानक सुरु होण्याची जितकी ओढ होती त्याच्या कित्येक पटीने जास्त ओढ मला त्या गीताची होती. 
       भय इथले संपत नाही 
        मज तुझी आठवण येते
       मी संध्याकाळी गातो 
       तू मला शिकवली गीते | 

 या कवी 'ग्रेस ' यांच्या ओळी , पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत असलेले हे यमन रागातील भावगीत . हे गाणे नकळत मनात आणि मग जणू आत्म्यात प्रवेश करते अशी भावना हे गाणे ऐकताना प्रत्येक वेळी होत असे जणू  लतादीदींच्या   या स्वरासाठीच   या गीताची निर्मिती झाली आहे . या  ओळींचा अर्थ समजण्याची प्रगल्भता तेव्हा नव्हती तरी मनाच्या खोल कोपऱ्यात खळबळ होत असे. या गीताने मला आनंद , दुःख कोणत्याही भावनिक क्षणाला तर साथ दिलीच मात्र निराशेच्या गर्तेत असतानाही या तरल सुरांनी मन मोकळे झाले . डी. एड.च्या प्रथम वर्षात  प्रवेश घेतला तेव्हा सुरुवातीलाच रिकाम्या तासिकेला प्रत्येक मुलीला तिच्या आवडीचे एक गाणे सादर करायला सांगितले  मी तेव्हा ' भय इथले संपत नाही ' हे गीत सादर केले आणि  पुढे त्या गीतानेच माझी ओळख झाली. या गीतातील प्रत्येक ओळीत ज्या भावना साठलेल्या आहेत त्या प्रत्येकाच्या अनुभव विश्वानुसार प्रत्येकाला नवीन अनुभव देतील मात्र  मला वाटते लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे या गीतातील प्रत्येक ओळीतील भावनांना एका वेगळ्याच उच्च पातळीवर नेले आहे. हे गीत ऐकताना कधी ओठांवर मंद हसू असते कधी डोळ्यांत हलकेच साठलेले असू असतात . या गीताने माझ्या आयुष्यातल्या अनेक स्मृतींना सुगंधी अमूल्य अत्तराची कुपी बनवले आहे . म्हणूनच या गीताचे माझ्याशी नाते याच गीतातील कडव्यात अगदी चपखल बसते --
             तो बोल मंद हळवासा 
             आयुष्य स्पर्शुनी गेला 
             सीतेच्या वनवासातील
              जणू अंगी राघव शेला |

लता दिदींना त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांच्या गाण्यांनी आमच्या सारख्या श्रोत्यांच्या जगण्यात अर्थ  निर्माण केला आहे. 'सकाळ ' ने या उपक्रमातून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधीच दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार . 
         

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com