मी बाबासाहेबांना एवढंच म्हटलं...

सुनील माळी
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

बाबासाहेब, तुम्ही मंडळात बसून बोललात. सध्या कार्यक्रमांतही तुम्ही बसूनच भाषण करता, पण बाबासाहेब तुम्ही शाहिरी थाटात उभं राहून केलेली व्याख्यानं मी आणि माझ्याबरोबरच हजारो रसिकांनी ऐकली आणि "पाहिली'ही आहेत.

सारसबागेतल्या त्या हिरवळीवर मांडलेल्या खुर्च्या अजून तशा रिकाम्याच होत्या, पहाट होत असल्यानं आजूबाजूला अंधारही होता, मुख्य कार्यक्रमही सुरू व्हायचा होता, पण पहिल्याच रांगेत शिवशाहीर बाबासाहेब जातीनं वेळेवर उपस्थित होते...निवांत बाबासाहेबांना पाहून मी पुढं सरकलो, त्यांच्या खुर्चीसमोर गुडघ्यावर बसलो अन त्यांना एवढंच म्हटलं. बाबासाहेब..., बाबासाहेब तुमचं "तारूण्य' पाहून आम्हाला स्फूर्ती येते. परवा एका पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला बोलवायला माझा एक मित्र तुमच्याकडं आला तर त्या तारखांना आपण नागपूरच्या कार्यक्रमाला असल्याचं तुम्ही त्याला सांगितलं. अर्थात तुम्ही तरूण असल्यानं फारसं आश्‍चर्य वाटलं नाही. अवघ्या सत्त्याण्णव वर्षांचे... हो, हो, नवावर सात सत्त्याण्णव वर्षांचे तर आहात तुम्ही... तुम्ही अजून तडफेनं दौरे करता, परगावाला, परराज्यात आणि परदेशातही जाता. अजून छान भाषणं ठोकता. ज्या इतिहास संशोधक मंडळात तुम्ही अभ्यास केलात, अनेक निबंध सादर केले, त्याच मंडळात गेल्या वर्षी तुम्ही दिलेलं भाषण मला आठवतयं. तुम्ही बऱ्याच कालखंडानं स्वतंत्र भाषण देणार असल्यानं मंडळाचं सभागृह तुडुंब भरलं होतंच, पण आवारही फुललं होतं.

बाबासाहेब, तुम्ही मंडळात बसून बोललात. सध्या कार्यक्रमांतही तुम्ही बसूनच भाषण करता, पण बाबासाहेब तुम्ही शाहिरी थाटात उभं राहून केलेली व्याख्यानं मी आणि माझ्याबरोबरच हजारो रसिकांनी ऐकली आणि "पाहिली'ही आहेत. मी तर कॉलेजजीवनापासूनची पुण्यातली तुमची एकही व्याख्यानमाला चुकवलेली नाही. तुमच्या एकट्यासाठी मोठा मंच उभा केलेला असायचा. त्या मंचावर गरजते, बरसते बाबासाहेब आम्ही अनुभवलेत. लालजर्द, लफ्फेदार फेटा बांधलेला, गुडघ्यापर्यंत येणारा आणि घट्ट बसणारा झब्बा तसंच पांढरी सलवार परिधान केलेली, टोकदार काळीकुळकुळीत दाढी राखलेली... या झोकात तुम्ही मंचावर यायचात. दिसायचात अगदी देखणे. तुम्ही सुरूवात करायचात... "श्री आदिशक्ती तुळजाभवानी...' अन त्यानंतर सुरू व्हायचा तो शिवथर घळीतला धबधबा... नवरात्राच्या दरम्यान येणाऱ्या हस्तनक्षत्रात कोसळणाऱ्या हत्तीच्या सोंडांएवढ्या टपोऱ्या वेगवान धारा... त्यात आम्ही चिंब भिजायचो. तुम्ही बोलण्याच्या आवेशात मंचाच्या कधी डाव्या कोपऱ्यात तर कधी उजव्या कोपऱ्यात. तुमचा आवाज खर्जापासनं ते तारसप्तकाच्या टिपेपर्यंत लीलया फिरायचा. मुळात तेजस्वी असलेलं शिवचरित्र तुमच्या ओजस्वी भाषेत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहायचे. एकएक प्रसंग तुम्ही जिवंत करायचात. नेमकं साल, अचूक नावं तुमच्या तोंडून फटाफट रामबाणाप्रमाणे बाहेर पडायची. एखादं नाव तुम्ही मुद्दाम विसरल्यासारखं करून समोरच्याही अवचित परिक्षा घ्यायचात. "त्याचं नाव... त्याच नाव...' असं म्हणून क्षणभर थांबल्यावर समोरून कुणीतरी चाणाक्ष म्हणे, "बहलोल...' तुम्ही लगेच खूश होत "शाबास, शाबास' म्हणत गाडी पुढे सोडायचात.

बाबासाहेब, तुम्ही इतिहास सांगायचाच, पण फक्त त्यातल्या रोमहर्षक कथा सांगून थांबत नसायचा. नव्हे...नव्हे केवळ तोच तुमचा उद्देश नसायचाच. शिवचरित्रातून आज काय बोध घ्यायला हवा ते तुम्ही आवर्जून नमूद करायचा. "महाराजांना भ्रष्टाचार खपत नसे, त्यांचं चारित्र्य स्वच्छ होतं, ते अंधश्रद्धाळू नव्हते, त्यांनी माणसं जोडली, ते व्यसनांच्या विरोधात होते...' असं सांगून तुम्ही मिश्‍किलपणे म्हणायचात, ""म्हणून शिवाजीमहाराज की जय..., तुमच्यापैकी किती जण भ्रष्टाचारापासनं दूर आहेत, किती अंधश्रद्धा पाळत नाहीत, किती जण निर्व्यसनी आहेत...? जे असतील त्यांनाच शिवाजीमहाराज की जय म्हणण्याचा अधिकार आहे''... शिवचरित्रापासनं आपण काय मिळवायला हवं ? तर नॅशनल कॅरेक्‍टर... राष्ट्रीय चारित्र्य. तेच आपल्याकडं आता नाहीये. एक इंग्रज शासक म्हणे... "इंडिया इज नॉट अ नेशन, बट ओन्ली पॉप्युलेशन...' असं सांगून तुम्ही उसळायचात...बाबासाहेब, तुमच्या शिवचरित्राची पारायणं केलीत. शिवचरित्रासाठी साक्षात सरस्वतीनं तुमच्या डोक्‍यावर हात ठेवलाय.... तुमचं अमोघ वक्तृत्व अन लालित्यपूर्ण लेखन...तुमची एकएक वाक्‍यं काळजात कोरली गेलीत.

शिवजन्माच्या वेळी तुम्ही बेभानपणं बोललात अन लिहिलतं... "पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला...'
इथल्या संपन्नतेचं वर्णन करताना तुम्ही म्हणाला, "महाराष्ट्र सोन्यारूप्यात सजत होता, दह्यादुधात भिजत होता, अध्यात्मात न्हात होता.' सह्याद्रीच्या दाट वनराजीचं वर्णन करताना तुम्ही म्हणता, "एकवेळ अस्वलाच्या केसांतली ऊ सापडेल, पण इथल्या भयभया रानात हरवलेला हत्ती मिळणार नाही.' आग्र्याहून सुटले, पण नंतर औरंगजेबाच्या कैदेत असलेल्या मावळ्यांना मराठी शब्द ऐकायला मिळाला तेव्हांचं त्यांचं वर्णन, "दळणकांडण करत असलेल्या सासुरवाशिणीला माहेरच्या माणसाचा शब्द ऐकला की तिचा हात जसा थबकतो ना... तसंच त्यांचं झालं.' असं तुम्ही केलयं. पन्हाळ्याचा वेढा फोडून महाराज विशाळगडकडे निघाले तेव्हा गड उतरताना शत्रूची नजर पडू नये, ते सुखरूप बाहेर पडावेत..., यासाठी तुम्ही लिहिता, "वळचणीच्या पालींनो, चुकचुकू नका... आमचे महाराज निघालेत...' गजापूरच्या खिंडीबाबत तुम्ही लिहिता, "अजून इथल्या झऱ्याच्या पाण्याला रक्ताचा रंग येतो, या पाण्यात ढेकूळ टाका, तरंग उठेल तो इतिहासाचा असेल...' तुमची एक-एक वाक्‍यं काळजात घुसतात, "भेकडांचा देवही भेकड...', "अरे, रडण्यासाठी तरी एकत्र या, पण एक व्हा...' "या काळ्याकुट्ट अंधारात जायला कोणाची म्याय व्यायलीये ?... मराठी वाघांची माय व्यायलीये...' "तीनशे वर्षांची काळरात्र...'

बाबासाहेब, मी कॉलेजात असताना असाच शुक्रवार पेठेतल्या वाड्याबाहेर रस्त्यावर उभा होतो. "307 शुक्रवार' इथल्या क्षीरसागर वाड्यात आमच्या भाड्याच्या दोन खोल्या होत्या. अचानक तुम्ही रस्त्यावर काही माणसांबरोबर मला दिसलात. मी आनंदलो. बाबासाहेब, इथं... ? तुम्ही हातवारे करत होतात, आमच्या वाड्याकडे बोट दाखवत होतात. मी पुढे झालो. तुम्हाला माझं नाव सांगितलं. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला चतुरंगचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. त्यांना तुमच्या जन्मठिकाणाचं, तुम्ही बालपण घालवलेल्या जागेचं चित्रीकरण करायचं होतं... मी म्हटलं "या वाड्यात तर मी राहतो.' तुम्ही सांगितलं "इथंच माझा जन्म झाला' आणि तुम्ही अचूक बोट केलं ते मी राहात असलेल्या दोन खोल्यांकडं..., मी थक्क झालो, आनंदलो, मोहरलो... बाबासाहेबांचा जन्म झाला तिथं आपणही वाढलो ?... मी अत्यानंदानं तुम्हाला घरी नेलं... तुम्ही घरात बसलात... माझ्या घराचा मला कोण अभिमान वाटू लागला.

बाबासाहेब, परवा सारसबागेतल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या आधी मी तुम्हाला ती आठवण सांगितली, "307 शुक्रवार' म्हटल्यावर तुमचे डोळे लकाकले. "तुमचं गर्जना करत व्याख्यान देणं पाहिलेले-ऐकलेले आमच्यासारखे भाग्यवंत आम्हीच, ज्यांनी ऐकलं नाही, अनुभवलं नाही ते करंटे...' असं म्हटल्यावर तुम्ही अस्फुट हसलात. नॅशनल कॅरेक्‍टरवर तुम्ही भर द्यायचा, त्याची आठवण करून दिल्यावर तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडले..."अजूनही ते खरयं...' बाबासाहेब, तुम्ही ते वाक्‍य म्हटलं तोवर कार्यक्रमाचे संयोजक अंकुश काकडे यांचा आवाज माईकवरून आला, कार्यक्रम सुरू होत होता अन मी तुमच्यापासून दूर झालो. 
बाबासाहेब, मी तुम्हाला एवढंच म्हटलं.

इतर ब्लॉग्स