गुंतवणुकीच्या प्रवासात आर्थिक नियोजन हवेच 

money-investment-finance
money-investment-finance

नाशिकहून दिल्लीला जायचे आहे, असे उद्दिष्ट ठेवून मी प्रवासाला सुरवात केली तर मी दिल्लीला पोचेलही; परंतु जर प्रवासासाठी योग्य वाहन, कालावधी, येणारा खर्च, जोखीम अशा विविध घटकांचे नियोजन केल्यास हा प्रवास केवळ सुखकरच नाही, तर समाधान देणारा ठरेल. याचे कारण म्हणजे केलेले नियोजन. अगदी तसेच कमावती व्यक्ती बचत करते त्याचप्रमाणे त्यातून गुंतवणूकही करते; परंतु या प्रवासात आर्थिक नियोजनाचा मुद्दा जरा दुर्लक्षित होतो, असे अनेक गुंतवणूकदारांच्या निर्णयात दिसते. म्हणून खालील काही मुद्दे नेहमी विचारात घेणे आवश्‍यक आहे. 

1) आपल्या आर्थिक उद्दिष्टांची यादी बनविणे अत्यावश्‍यक. ही उद्दिष्टे म्हणजे कारणे असतात की कशासाठी पैसे हवेत?, महागाईचा अंदाज घेत किती हवे आहेत, हे ठरविता येईल. कधी हवे आहेत, हे स्पष्ट करता येईल. 
2) तुमची मिळकत, खर्च, आजवरची गुंतवणूक आणि कर्ज याचा सविस्तर विचार करा. 
3) कोणतीही गुंतवणूक करायच्या आधी आरोग्यविमा आणि आयुर्विमा करून घ्या. ज्या व्यक्ती तुमच्यावर अवलंबून आहेत त्यांचाही या विमा योजनेत सहभाग करून घ्या. कारण येणाऱ्या काळात आरोग्याशी निगडित असलेले खर्च हे सामान्य महागाईपेक्षा अधिक दराने वाढायचे अंदाज वर्तविले जात आहेत. त्यामुळे जर अशा खर्चांना भविष्यात सामोरे जाण्याची गरज पडल्यास गुंतवणुकीस धक्का लागणार नाही आणि आरोग्यविम्याची मदत होईल. आयुर्विमा घेताना आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्यांचा (कर्ज, मुलांचे शक्षण, मोठे खर्च, लग्न) आढावा घेऊन मगच कव्हर घेतलेलं चांगलं. 
4) गुंतवणूक पर्यायांची सांगड घालताना आपल्या जोखीम क्षमतेचा व्यवस्थित विचार करा. सगळेच पैसे सुरक्षित पर्यायात असतील तर पुढे ते योग्य पद्धतीने वाढणार नाही. म्हणून झेपेल तितकी जोखीम घेऊन गुंतवणूक करा. सल्लागाराबरोबर चर्चा करून निर्णय घ्या. 
5) प्रत्येक गुंतवणूक पर्याय समजून घ्या. कुणाच्या तरी सांगण्यावर विश्‍वास न ठेवता माहिती घेत, समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोवर पैशांचे व्यवहार करू नका. 
6) गुंतवणूक पर्याय निवडताना, ध्येयपूर्तीसाठी लागणारा काळ यांचा अभ्यास नक्की करा. जसे- दीर्घकालीन उद्दिष्टपूर्तीसाठी अगदी सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय उपयोगी ठरत नाहीत तसेच कमी काळात लागणारा पैसा जास्त जोखमीच्या गुंतवणुकीत गुंतवू नये, याचा योग्य समन्वय साधणे महत्त्वाचे. 
7) असेट अलोकेशन करून एकापेक्षा अधिक मालमत्ता प्रकारांचा समावेश पोर्टफोलिओत करता येतो. असेट अलोकेशन म्हणजे, गुंतवणुकीच्या कोणत्या प्रकाराची निवड करावी आणि त्या प्रकारात किती पैसे गुंतवावेत याचे तंत्र. गुंतवणुकीवर स्थिर परतावा मिळण्याकरिता हे सर्वांत महत्त्वाचे असते. 
8) रिटायरमेंट फंडासाठी रिटायरमेंटनंतर नाही, तर नोकरी लागल्यापासूनच तयारी करायला सुरवात करावयाची असते. म्हणजे जास्त काळ गुंतवणूक केल्याने अधिक जोखीम घेता येते आणि आयुष्याच्या सुरवातीच्या काळात, आर्थिक जबाबदारी कमी असेपर्यंत जास्त बचत करता येते. कुटुंब मोठं व्हायला लागलं की गरजा व इतर खर्च वाढतात आणि बचतीचा दर कमी होतो. 
9) खर्च व्यवस्थापन हा आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आजच्या काळात विचारपूर्वक खर्च करीत, प्रलोभने दूर ठेवीत आपलं राहणीमान सांभाळणे आवश्‍यक आहे. 
10) कर भरणे हा जर खर्च वाटत असेल तर याचेपण नियोजन आवश्‍यक आहे. कर हा गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कर नियोजन हे वर्षाच्या सुरवातीला करावे. कर वाचविण्याच्या पर्यायांची योग्य माहिती मिळवा. कर वाचविण्यापेक्षा कर भरणंसुद्धा कधी तरी फायद्याचं ठरतं. 
11) इमर्जन्सी फंड म्हणजे सहा महिन्यांचा पगार किंवा सहा महिन्यांचा खर्च. इतकी रक्कम वेळेला उपलब्ध होईल अशा पद्धतीने बाजूला ठेवणे आवश्‍यक आहे. यासाठी बचत खाते, लिक्विड म्युच्युअल फंड, आर्ब्रिटाज फंड आदी गुंतवणूक पर्यायांची माहिती घ्या. 
12) गुंतवणुकीचे निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. 
13) गुंतवणूक आणि त्यातून मिळणारे परतावे हे आपल्या अपेक्षेप्रमाणे आहेत की नाहीत, हे नियमित तपासणे आवश्‍यक असते. जर तसे होत नसेल तर त्यामागचं कारण अभ्यासात घेत, घाबरून न जाता, शक्‍य असल्यास त्यातून बाहेर पडणे योग्य असते. नुकसानामागे अजून नुकसान करून घेऊ नये. 
14) प्रत्येक गुंतवणुकीत नॉमिनेशन करणे लक्षात ठेवा. आपल्या सगळ्या गुंतवणुकीची माहिती व्यवस्थित एकत्र ठेवा आणि एखाद्या विश्‍वासू व्यक्तीकडे त्याची एक प्रत ठेवा. 
आर्थिक नियोजन हा एक आव्हानात्मक प्रवास आहे. आर्थिक नियोजन आपण आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी करीत असतो. त्यात नवरा, बायको आणि मुलांचा सहभाग असणे गरजेचे आहे. कुटुंबाच्या सहकार्याने हा प्रवास सुखकर होईल. सकारात्मक मनस्थिती आणि चिकाटी, आत्मविश्‍वासाने आर्थिक नियोजन करा. त्याचा फायदा नक्कीच होईल. 

(लेखिका अर्थविषयक अभ्यासक व मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com