आवाजाचा जादूगार अमिताभ बच्चन

सुदेश भोसले, गायक 
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

चित्रपटासारख्या अस्थिर व्यवसायात एखाद्या कलाकाराने सतत मुख्य प्रकाशझोतात राहून पन्नास वर्षांची कारकीर्द घडवणं ही सोपी गोष्ट नाहीच. गंभीर अभिनय, गायन, कॉमेडी, डान्स, रोमान्स या विविध छटांनी एक परिपूर्ण अशी व्यक्ती म्हणजे अमिताभजी...

अमिताभ बच्चन यांचा आवाज म्हणजे एक परिपूर्ण पुरुषी आवाज आहे, असंच मला वाटतं. मी जेव्हा त्यांचा आवाज ऐकला, तेव्हा तो थेट काळजातच घुसलाय. इतर कोणत्याही पुरुषाचा आवाज मग मला भावलाच नाही. त्यांच्या आवाजात असणारा धीरगंभीरपणा मला अधिक भावतो. त्यांच्या आवाजात होणारे चढउतार कोणत्याही गाण्यातल्या आरोह अवरोहासारखेच महत्त्वपूर्ण आणि सुरेल असतात. सूर जसे योग्य लागले तर कानाला फार गोड लागतात ना, अगदी तसेच त्यांच्या आवाजातले चढउतार संवाद अतिशय भावपूर्ण करतात. कोणत्याही संवादाचं अमितजी अगदी सोनं करतात. 

त्यांचं दिसणं त्यांच्या आवाजाला अगदी साजेसं आहे. या दोन्हीचा त्यांनी व्यक्तिरेखा साकारताना अतिशय खुबीनं वापर केलाय.  वयानुसार होणाऱ्या शरीर आवाजाच्या बदलाचाही त्यांनी अतिशय सकारात्मक वापर करून घेतलाय. 
त्यांचा ‘सरकार’, ‘अग्निपथ’ आणि ‘शहेनशहा’मधला आवाज यात त्यांनी वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न केलाच, पण त्यांच्या ‘अमर अकबर ॲन्थोनी’मधला अतरंगी व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी लावलेला आवाज वेगळा आहे. एकाच चित्रपटात दोन भूमिका साकारताना त्यांनी केलेला आवाजाबद्दलचा विचार जाणवतो. उत्तम उदाहरण द्यायचं तर ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट. 

त्यांच्या आवाजात असलेला अंगभूत सुरेलपणा त्यांना गायकही बनवून गेला. त्यांची गाणीही गाजली. ती गाजणार होतीच, कारण त्यांची गाणीही त्यांच्या अभिनयासारखीच परिपूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एक तरबेज कलाकार असल्यामुळे गाणं आणि पार्श्वगायन यांतील फरकही त्यांनी अचूक ओळखला. आजही त्यांच्या आवाजातली ‘रंग बरसे’, ‘मेरे अंगने में’ ही गाणी कुठेही लागली तरी लोक आपोआपच त्यावर ताल धरू लागतात. अमिताभजींना संगीताची जाण आहेच, वाद्य वाजवण्याचीही आवड आहे त्यांना, म्हणूनच आता त्यांनी सतार आणि पियानो शिकायचं मनावर घेतलंय!

गंभीर अभिनय, गायन, कॉमेडी, डान्स, रोमान्स या विविध छटांनी एक परिपूर्ण अशी व्यक्ती म्हणजे अमिताभजी. त्यांच्यासारख्या आवाजात मी सहज बोलू शकतो हा योगायोग आहे, ‘मुकद्दर का सिकंदर’ हा चित्रपट पाहून मी शाळेत गेलो आणि सहजच एका मुलाला त्या सिनेमातला एक संवाद अमिताभजींसारख्या आवाजात बोलून गेलो. माझ्या मित्रांनी माझे फार कौतुक केले. त्यांच्या कौतुकाने मलाही वाटले की आपण त्यांच्या आवाजातले अजून काही डायलॉग पाठ करूयात. स्पर्धेत, कार्यक्रमात किंवा एखाद्या पार्टीत मी ते बोलू लागताच प्रचंड प्रतिसाद मिळत असे. 

मी जेव्हा अमिताभजी यांच्या आवाजाची नक्कल करायला सुरुवात केली, त्याकाळी अमिताभजींचा हुबेहूब आवाज काढणारा मी पहिलाच आणि एकटाच होतो. ‘अजुबा’ सिनेमासाठी निर्मात्यांनी एक गाणं माझ्याकडून (अर्थातच अमिताभ यांच्या आवाजात) गाऊन घेतलं. अमिताभजींनी जेव्हा ते ऐकलं तेव्हा ते ही चक्रावून गेले. त्यांना कळेना हे गाणं त्यांनी कधी गायलं... त्यांना जेव्हा सत्य कळलं तेव्हा मला बोलावून घेतलं. खूप कौतुक केलं. त्यांच्या कौतुकामुळे माझ्यातला आत्मविश्‍वास वाढत गेला. त्यानंतर मी मागे वळून पाहिलेच नाही... त्यांच्या आवाजातील ‘शावा शावा’, ‘जुम्मा चुम्मा दे दे’ अशी बरीच गाणी मी गायली. अमिताभजी यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराच्या आवाजातील टेक्‍श्चर मी आत्मसात करू शकलो ही माझ्यासाठी देवाची देणगीच आहे, असंच मी मानतो.

इतर ब्लॉग्स