मारेकरी सत्याचे, कारभारी महासत्तेचे

मारेकरी सत्याचे, कारभारी महासत्तेचे
मारेकरी सत्याचे, कारभारी महासत्तेचे

युद्धात पहिला बळी जातो, तो सत्याचा. इतिहासात अनेकदा हे घडलेलं दिसतं. शीतयुद्धात तर याचं टोक गाठलं गेलं आणि वर्षानुवर्षे खोटेपणाची सद्दी चालू राहिली. सोव्हिएत संघराज्याला साम्यवादाचा जगभर प्रसार करायचा होता, तर त्याला अटकाव करण्याच्या इराद्यानं अमेरिकी महासत्ता अक्षरश: पछाडलेली होती. इतकी, की त्यांनी जगाची विभागणीच दोन छावण्यांमध्ये करून टाकली. एक तर मित्र किंवा शत्रू. एकदा डोळ्यावर अशी पट्टी चढवली, की सगळंच उलटपालटं दिसायला लागतं. "वर्ल्ड व्ह्यू' कमालीचा दूषित होतो. बांगलादेश निर्मितीच्या वादळी कालखंडात अमेरिकी महासत्तेचे सुकाणू सांभाळणारे अध्यक्ष रिचर्ड निक्‍सन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांची अवस्था नेमकी अशीच झाली होती. त्या वेळच्या पूर्वपाकिस्तानात मानवी इतिहासातलं लांछन ठरेल, असं क्रौर्याचं थैमान सुरू असतानाही लोकशाही आणि मानवी स्वातंत्र्याचे पाठीराखे म्हणवणाऱ्या अमेरिकेनं त्याकडं डोळेझाक केली. एवढंच नव्हे, तर अत्याचार करणाऱ्या याह्याखान या लष्करशहाला आर्थिक, लष्करी आणि राजनैतिक मदत पुरवण्यात ते धन्यता मानत होते.

गॅरी बास या प्रख्यात प्राध्यापक-अभ्यासकानं लिहिलेल्या "द ब्लड टेलिग्राम' या पुस्तकात अमेरिकेच्या या संतापजनक धोरणाचा तपशीलवार वृत्तान्त सादर केला आहे. पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे यात अगदी अस्सल आणि प्राथमिक स्रोतांचा भरपूर उपयोग केला आहे. या लिखाणाला अशी वास्तवाची धार असल्यानं वाचकाला ते कमालीचं अस्वस्थ करतं. बऱ्याचदा संरक्षण आणि परराष्ट्रविषयक धोरणाला "गोपनीयते'च्या आवरणात दडवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कल असतो. अमेरिकाही त्याला अपवाद नाही; परंतु सत्य जाणण्यासाठी जोखीम पत्करून धडपडणारी माणसंही अमेरिकी व्यवस्थेत आहेत आणि त्यांना यश मिळतं, याचीही नोंद घ्यायला हवी. अशांच्या प्रयत्नांमुळेच अनेक दस्तावेजच नव्हे, तर निक्‍सन- किसिंजर यांच्या संभाषणाच्या ध्वनिफितीही उपलब्ध होऊ शकल्या. ही संभाषणंही पुस्तकात उद्‌धृत करण्यात आली आहेत. त्यात निक्‍सन आणि किसिंजर यांनी भारत हा देश; तसंच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी जी गरळ ओकली आहे, ती वाचल्यानंतर संवेदनांधळेपण किती विकोपाला गेलं होतं, याची प्रचिती येते. अर्थात सत्ताधारी वर्तुळातल्या सर्वांनीच स्वत:मधल्या विवेकाची अशी हकालपट्टी केलेली नव्हती. ढाक्‍यातले अमेरिकेचे वाणिज्यदूत आर्चर ब्लड हे अशांमधील एक प्रमुख. अध्यक्ष निक्‍सन यांना ज्या सत्याला सामोरं जाण्याची इच्छा नव्हती, ते सतत त्यांच्यापर्यंत पोचवण्याची "बंडखोरी' ब्लड यांनी केली. त्यांनी व्हाइट हाउसकडं पाठवलेले पूर्व पाकिस्तानातल्या स्थितीविषयीचे अहवाल वाचून अंगावर काटा येतो. "ब्लड टेलिग्राम' हे पुस्तकाचे शीर्षक त्या दृष्टीनं अगदी अन्वर्थक आहे.
पंजाबी, पठाण, बलुची, सिंधी आणि बंगाली भाषकांची मोट बांधून जो पाकिस्तान तयार झाला होता, त्यात मुळातच विसंवाद होता. पूर्व पाकिस्तान तर भौगोलिकदृष्ट्याही अलग होता. पश्‍चिम पाकिस्तानपेक्षा (सहा कोटी) जास्त लोकसंख्या असलेल्या (साडेसात कोटी) या भागाला त्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळायला हवं होतं. प्रत्यक्षात पंजाबी उच्चवर्गीयांचं सर्व क्षेत्रांत वर्चस्व होतं. उर्दू भाषा लादली जात होती. याह्याखान यांनी 1969 मध्ये पाकिस्तानची सत्ता बळकावली, तेव्हा पूर्व पाकिस्तानात असंतोष खदखदत होता. त्यातच चक्रीवादळाच्या तडाख्यानं सारं जनजीवन उद्‌ध्वस्त झालं होतं. जगातून मदतीचा ओघ येत असताना पाकिस्तान सरकार मात्र ढिम्मच होतं. 1970मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बंगाली जनतेच्या रागाला मतपेटीतून व्यक्त होण्याची संधी मिळाली आणि शेख मुजिबूर रेहमान यांच्या "अवामी लीग'ला दणदणीत बहुमत मिळालं. लोकमताचा आदर झाला असता, तर मुजिबूरच पाकिस्तानचे पंतप्रधान झाले असते. पण कायदे मंडळाचं अधिवेशनच रद्द करण्यात आलं. तेव्हा बंगाली जनतेच्या असंतोषाचा स्फोट झाला. त्यांची निदर्शनं दडपण्यासाठी पाकिस्तानी लष्करानं भयानक अत्याचार सुरू केले. अमेरिकी राज्यकर्ते मिठाची गुळणी धरून होते. त्यांना त्या वेळी लोकशाहीची गळचेपी दिसली नाही. मानवी हक्कांची पायमल्ली जाणवली नाही. मरणाच्या दारात ढकलल्या जाणाऱ्या, सैनिकांच्या अत्याचारांना बळी पडणाऱ्या माता-भगिनींचा आक्रोश ऐकू आला नाही. आर्चर ब्लड सर्व प्रकारची जोखीम पत्करून जे दिसतंय, ते जसंच्या तसं अमेरिकी राज्यकर्त्यांना कळवत होते. नि:शस्र आंदोलकांवर रणगाडे, रायफल, मशिनगन यांचा बिनदिक्कत वापर केला जात होता. अमेरिकेनं पुरवलेली शस्त्रास्त्रं पाहून ब्लड यांना धक्का बसला. अवामी लीगच्या समर्थकांवर सरसकट गोळ्या घातल्या जात. ढाका विद्यापीठातल्या प्राध्यापकांना फरफटत बाहेर आणून गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. हिंदूंच्या घरावर "एच' अशी खूण केली जात असे. त्यांना वेचून वेचून ठार मारलं जात होतं. "वेचक वंशविच्छेद' अशा मथळ्याचा एक जळजळीत अहवाल ब्लड यांनी अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाला पाठविला. दुर्दैव असं, की तो फार कुणाच्या हातात पडू नये म्हणून अमेरिकी अधिकारी धडपडत होते. पण त्यांनी सत्य झाकलं, तरी परिणाम थोडेच थांबणार होते? निर्वासितांचा प्रचंड ओघ भारतात येऊ लागला. अमेरिका-पाकिस्तान-चीन असा "ऍक्‍सिस' तयार करून भारतावर युद्ध टाळण्यासाठी प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न होता; परंतु इंदिरा गांधी ठाम राहिल्या आणि पूर्व आघाडीवर निर्विवाद विजय मिळवत स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्मितीत त्यांनी सिंहाचा वाट उचलला. हे सगळं सुरू असताना अमेरिकी राज्यकर्त्यांचा इतका तिळपापड झाला, की बंगालच्या उपसागरात आरमार पाठविण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती.

या सगळ्या इतिहासाचा "चक्षुर्वेसत्यम' असा धांडोळा घेताना गॅरी बास यांनी कुठंही अभ्यासकाची तटस्थता सोडलेली नाही. अधिकृत अहवाल नि अन्य दस्तावेज यांत या भीषण शोकांतिकेचे जे तपशील आहेत, ते उलगडून दाखवताना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सत्तासंघर्षाचं स्वरूपही ते वाचकांच्या नजरेस आणून देतात. अशा संघर्षांत व्यक्तिगत मतांना फारसं स्थान नसलं, तरी आर्चर ब्लड यांच्यासारखे राजनैतिक अधिकारी कर्तव्य पार पाडताना सद्‌सद्विवेक जागा ठेवतात आणि प्रचलित व्यवस्थेकडून डावलेले गेले, तरी इतिहासात कायमची जागा पटकावून बसतात. गॅरी बास यांनी परिश्रमपूर्वक हे सगळं शब्दांकित केलं आहे आणि दिलीप चावरे यांनी ओघवता अनुवाद करुन मराठी वाचकांची चांगली सोय करून दिली आहे.

पुस्तकाचं नाव : द ब्लड टेलिग्राम
लेखक : गॅरी बास, अनुवाद : दिलीप चावरे
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स, पुणे (020-24452387)
पृष्ठं : 482, मूल्य : 495 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com