"या' तालुक्‍याची आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून ओळख

IAS
IAS

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा मतदारसंघ व राज्यातील सर्वांत मोठ्या उजनी धरणाचा तालुका म्हणून माढा तालुका सर्वांना परिचितच आहे. परंतु, कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणूनही या माढा तालुक्‍याची ओळख आहे. "धरण उशाला अन्‌ कोरड घशाला' अशी स्थिती या तालुक्‍याची. शेतीशिवाय दुसरा कोणताही मोठा उद्योगधंदा तालुक्‍यात उपलब्ध नाही. शिक्षण घ्यायचे म्हटले तर कोणतेही मोठे कॉलेज तालुक्‍यात उपलब्ध नाही. परंतु येथील युवकांनी परिस्थितीसमोर हार न मानता, पाण्यावर अथवा शेतीवर अवंलबून न राहता स्पर्धा परीक्षांकडे वाटचाल सुरू केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीतपणे यशही संपादन केले आहे. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांमध्ये या तालुक्‍याची वेगळी ओळख निर्माण होऊ लागली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग असो राज्य लोकसेवा आयोग अथवा इतर स्पर्धा परीक्षेत माढा तालुक्‍यातील सुपुत्रांनी "उत्तुंग गगनभरारी" घेतली आहे.

देशाच्या उच्च पदापासून शेवटच्या शिपाई पदापर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात या तालुक्‍यातील अनेक सुपुत्र कार्यरत असून, आपल्या धडाकेबाज कामगिरीने तालुक्‍यासह जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरांनी झळकावत असल्याने, अधिकाऱ्यांची खाण असलेला कारखाना अशी माढा तालुक्‍याची वेगळी ओळख संपूर्ण राज्यात होऊ लागली आहे. माढा तालुक्‍यातील प्रामुख्याने उपळाई बुद्रूक, दारफळ (सीना), विठ्ठलवाडी, मानेगाव, उंदरगाव, माढा, कुंभेज, अकोले खुर्द, अरण अशा अनेक गावांतील युवक उच्च पदावर कार्यरत आहेत.
स्पर्धा परीक्षा ही फक्त उत्तर भारतीय, बिहारी लोकांचीच मक्तेदारी होती, असा समज आता माढा तालुक्‍यातील रांगड्या मातीतील शेतकऱ्यांच्या पोरांनी खोटा ठरवला आहे. गेल्या दहा वर्षांत झालेली जागृती आणि प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील तरुणही आपले आव्हान निर्माण करून यामध्ये यशस्वी होऊ शकतो, हे तालुक्‍यातील युवकांनी दाखवून दिले आहे. स्पर्धा परीक्षेची चळवळ खऱ्या अर्थाने माढा तालुक्‍यात जर कुणी रोवली असेल तर नक्कीच ओठावर उपळाई बुद्रूक हे नाव येते. शेतकरी कुटुंबातील डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी एमपीएससीतून पोलिस उपअधीक्षकपद पादाक्रांत केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची बहीण रोहिणी भाजीभाकरे वयाच्या तेविसाव्या वर्षी आयएएस अधिकारी झाल्या अन्‌ ग्रामीण भागातील मुलीही कशात कमी नाहीत हे दाखवून दिले. या दोघांचा गावातील सन्मान सोहळा बघून गावातील इतर परिसरातील युवकांना प्रेरणा मिळाली. तेही आपल्यासारख्या ग्रामीण भागातील आहेत, ते यशस्वी होऊ शकतात मग आपण का नाही! बस्स, इथूनच सुरवात झाली अन्‌ स्पर्धा परीक्षेत माढा तालुक्‍याचा टक्का वाढला.

तमिळनाडू राज्यातील सेलमच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून रोहिणी भाजीभाकरे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून तमिळनाडू राज्यात रजनीकांत या मराठी माणसानंतर कुणाचे नाव घेतले जात असेल तर नक्कीच रोहिणी भाजीभाकरे यांचे नाव घेतले जाते. तेथील लोकांना त्या "लेडी रजनीकांत'च वाटतात. महाराष्ट्र राज्याचा डंका त्यांनी आपल्या दिमाखदार कामगिरीने तमिळनाडू राज्यात वाजवला. सध्या त्या दिल्लीत केंद्रीय शिक्षण उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. रोहिणी भाजीभाकरे यांचे बंधू डॉ. संदीप भाजीभाकरे हे तर ग्रामीण भागातील युवकांसाठी आयडॉल आहेत. गडचिरोलीसारख्या अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात आपल्या करिअरची सुरवात करून सध्या मुंबईच्या पोलिस उपायुक्तपदी कार्यरत आहेत. त्यानंतर या गावातून एकाचवेळी अनुक्रमे आयएएस व आयआरएसपदी शिवप्रसाद नकाते व स्वप्नील पाटील यांची निवड झाली. त्यामुळे अधिकारी घडवणारे गाव म्हणून उपळाई बुद्रूक प्रसिद्धीस आले. सध्या शिवप्रसाद नकाते हे राजस्थान राज्यातील श्रीगंगानगरचे जिल्हाधिकारीपदी तर स्वप्नील पाटील पुण्याच्या आयकर विभागाच्या उपायुक्तपदी कार्यरत आहेत. ज्या कोटा शहाराचे नाव संपूर्ण देशात अभियांत्रिकी घडवणारे म्हणून प्रचलित आहे, त्या कोटा शहराची जबाबदारीही शिवप्रसाद नकाते यांच्याकडे होती. तर घरची परिस्थिती बेताची असताना आयआरएस झालेले स्वप्नील पाटील सध्या पुणे येथे आयकर विभागात उपायुक्त म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. याच गावातील प्रमोद शिंदे म्हाडाच्या उपअभियंतापदी कार्यरत आहेत.

स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व्हायची या गावातील युवकांमध्ये जणू स्पर्धाच निर्माण झाली. सध्या या गावातील श्रीकृष्ण नकाते औरंगाबादच्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी तर अमरदीप वाकडे सातारा जिल्ह्यातील कराडला तहसीलदार, संजय वाकडे गडचिरोली येथे तालुका कृषी अधिकारी तर मीनाक्षी वाकडे वित्त व लेखा अधिकारी म्हणून लातूर येथे कार्यरत आहेत. यांची प्रेरणा इतर गावातील अनेक युवकांनी घेतली. उपळाईपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वडाचीवाडी (उ.बु.) येथील कवले बंधूही यात मागे राहिले नाहीत. सचिन कवले परभणीत सहायक समाजकल्याण अधिकारीपदी तर धाकटे बंधू सहायक कामगार आयुक्त मुंबई येथे कार्यरत आहेत. या गावातून एवढे अधिकारी झाले आहेत की, युथ आयकॉन आयएएस अधिकारी रमेश घोलप यांनी तर आपल्या भाषणातून उपळाई बुद्रूक म्हणजे "स्पर्धा परीक्षेची पंढरी' असा उल्लेख केलेला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी देखील स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करताना उपळाई बुद्रूकचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन विद्यार्थ्यांना करतात.

महाराष्ट्र राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी जर कोणावर असेल तर ती माढा तालुक्‍यातील सुपुत्रांच्या हाती, असेच म्हणावे लागेल. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळलेले व सध्या अप्पर पोलिस महासंचालक म्हणून गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेले आयपीएस अतुलचंद्र कुलकर्णी हे मूळचे अरणचे. आपल्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीने त्यांनी दहशतवादाच्या प्रवाहातून कित्येक युवकांना बाहेर काढलेले आहे. आयएएस रमेश घोलप हे मूळचे जरी बार्शी तालुक्‍यातील असले तरी त्यांचे बरेचसे शिक्षण त्यांच्या मामांच्या गावी अर्थात अरणमध्येच झालेले आहे. महाराष्ट्र राज्याचे यूपीएससीत पहिल्या दहामध्ये येण्याचे अधुरे असलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मान देखील माढा तालुक्‍यातील युवकानेच मिळवला आहे. दोन वर्षांपूर्वी गरिबीवर मात करत कुंभेज येथील योगेश कुंभेजकर यांनी यूपीएससीच्या परीक्षेत पहिल्या दहामध्ये येण्याचा मान मिळवला आहे. माढा तालुक्‍याचे नाव जगाच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरले. कुंभेज याच गावचे दत्तात्रय भडकवाड हे सध्या सिंधुदुर्ग येथे उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत आहेत. नवी मुंबईसारख्या मोठ्या महानगरपालिकेत कर उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले प्रकाश कुलकर्णी उपळाई खुर्दचे रहिवासी आहेत. रिधोर गावचे सुपुत्र साहेबराव गायकवाड हे सध्या पुणे येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कृषी खात्याच्या पुणे विभागाच्या कृषी सहसंचालकपदी कार्यरत असणारे विजयकुमार इंगळे हे मूळचे अंजनगाव खेलोबा येथील रहिवासी आहेत. तर याच गावातील पवनकुमार चव्हाण मुंबई येथे सहायक कामगार आयुक्तपदी, प्रवीण लटके नायब तहसीलदारपदी कार्यरत आहेत. माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रूकच्या नंतर अधिकारी होण्यासाठी स्पर्धा सुरू असेल तर ती विठ्ठलवाडी व दारफळच्या युवकांमध्ये. विठ्ठलवाडीसारख्या छोट्याशा गावातून देखील बरेच अधिकारी घडले आहेत. एमपीएससीच्या परीक्षेत एकाचवेळी सचिन कदम व सोनाली कदम हे दोघे भाऊ-बहीण डीवायएसपी झाले. विठ्ठलवाडी येथे मोठ्या प्रमाणात बहुरूपी समाज आहे. या समाजातील मोहन शेगर हे पहिले डॉक्‍टर असून, ते सध्या सोलापूर येथे जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. संजय नागटिळक यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेली आहे.

सीना दारफळ येथील युवकांमध्ये देखील स्पर्धा परीक्षेची चुरस दिसते. अलीकडच्या दोन ते तीन वर्षांत स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला अन्‌ इथला युवक नाही असं कधी होत नाही. एमपीएससी सिम्प्लिफाईडच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील युवकांच्या संपर्कात असलेले उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचे हे गाव. येथील रत्नाकर नवले पोलिस उपअधीक्षकपदी तर प्रदीप उबाळे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षेत दारफळ येथील भाऊ-बहिणीने यश मिळवले आहे. महेश सुळे गटविकास अधिकारी तर बहीण सुप्रिया सुळे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. नुकतेच भारतीय अभियांत्रिकी सेवेमध्ये निरंजन उबाळे या युवकाने घवघवीत यश संपादन केले आहे. उंदरगावचे डॉ. ज्ञानेश्‍वर चव्हाण हे सध्या पोलिस उपायुक्तपदी कार्यरत आहेत. आई-वडील अडाणी असताना देखील त्यांनी चांगल्या रीतीने शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी घेतली आहे. तर याच गावातील विशाल नाईकवाडे सध्या कर्जत जामखेडच्या तहसीलदारपदी कार्यरत आहेत. तर मानेगावचे क्षीरसागर कुटुंबातील अजितकुमार क्षीरसागर हे पोलिस उपअधीक्षकपदी कार्यरत असून धाकटे बंधू सुजितकुमार क्षीरसागर नुकतेच पोलिस उपअधीक्षक म्हणून उत्तीर्ण झाले आहेत. याच गावातील संजय देशमुख उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. त्यामुळे उपळाई बुद्रूक गावची प्रेरणा विठ्ठलवाडी, दारफळ, उंदरगाव व इतर जवळच्या सर्वच गावांतील युवकांनी घेतली असून, प्रशासकीय क्षेत्रातील दमदार कामगिरीने गावाचे नाव भारताच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी रेखाटले आहे.

राज्य सेवेबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देखील माढ्याच्या युवकांनी गरुडझेप घेतली आहे. माढ्याचे सुपुत्र विपुल वाघमारे आयआरएस म्हणून सेवा बजावत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून माढा शहर व परिसरात वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगताना ते नेहमी दिसतात. मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन बारलोणीचे महेश लोंढे आयआरएस झाले व सर्वांसमोर आदर्श उभा केला. सध्या ते नाशिकच्या सहायक आयकर आयुक्तपदी कार्यरत आहेत. तर टेंभुर्णीचे अमर खुळे यांनी देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले असून, सध्या ते मुंबई येथे सहायक आयकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. संपूर्ण राज्याला लेडी सिंघम म्हणून परिचित असलेल्या तहसीलदार शिल्पा ठोकडे या कुर्डुवाडीच्या रहिवासी आहेत. निमगावचे सुपुत्र गणेश शिंदे व तुळशीचे रामलिंग चव्हाण तहसीलदारपदावर तर भेंडचे हनुमंत पाटील बारामतीमध्ये तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. अकोले खुर्द येथील एकाच कुटुंबातील तीन भाऊ पोलिस उपनिरीक्षक झालेले आहेत. त्यातील थोरले बंधू अंकुश चिंतामण सध्या मुंबईमध्ये सहायक पोलिस निरीक्षक तर इतर दोन भाऊ पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. याच गावातील सूर्यकांत पाटील पोलिस निरीक्षक पदावर सेवा बजावत आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेत याच गावातील धनंजय पाटील यांची पोलिस उपअधीक्षक म्हणून निवड झालेली आहे. व्होळे खुर्दचे रमेश चोपडे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सोलापूरच्या वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त वैशाली शिंदे या अरणच्या रहिवासी आहेत, तर त्यांची बहीण मंदाकिनी शिंदे या ठाणेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत आहेत. याच गावातील हनुमंत भापकर औरंगाबादच्या वाहतूक शाखेच्या पोलिस उपअधीक्षकपदी कार्यरत आहेत. तर जवळच असलेल्या मोडनिंबचे संजय जाधव पोलिस अधीक्षकपदी कार्यरत आहेत. एकंदरीत पाहता, या तालुक्‍यातील मुलामुलींना फक्त स्पर्धा परीक्षांचे वेड लागले असून, स्पर्धा परीक्षेत माढा तालुक्‍याचा झेंडा दरवर्षी झळकावत आहेत.
कुणाला कशाची वेड लागेल सांगता येत नाही म्हणतात ना ते खरंच आहे. माढा तालुक्‍यातील युवकांना फक्त सनदी अधिकारी व्हायचेय. त्यामुळेच "मी पण प्रशासकीय अधिकारी होणारच' अशी मनाशी खूणगाठ बांधून त्या दिशेने वाटचाल करतात. त्यामुळेच दरवर्षी स्पर्धा परीक्षेतून घेतल्या जाणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक, कर निरीक्षक, आरटीओ यांसारख्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत तालुक्‍यातील कित्येक तरुण उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यांत आपली प्रशासकीय सेवा बजावत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याची राजधानी जरी मुंबई असली तरी, प्रशासकीय राजधानी माढा तालुकाच म्हणावे लागेल. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या माढा तालुक्‍याची अलीकडच्या काळात "प्रशासकीय अधिकाऱ्यांचा तालुका' अशी वेगळी ओळख निर्माण होऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com