'वेस' गावांच्या परिघाचा मानबिंदू

Ves Rural Maharashtra
Ves Rural Maharashtra

हीच गावाची शोभा असते. पूर्वीच्या काळातील वेसी अंत्यत दिमाखात डौलात गावोगावी उभ्या होत्या. पण आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड चालूच आहे. असं असलं तरीही वेस ही महत्त्वाची आहे, काही काळानंतर वेस चित्रातून दाखवावी लागेल.

गावाला घट्ट ठेवण्याचे काम वेस करत आली आहे. आता काळ बदलत आहे, काळानुसार माणसं जरी यांत्रिक झाली आहेत, त्यामुळे गावगाड्यातील वेसीला घरघर लागली आहे. गावचा शेती हा मुख्य व्यवसाय, त्यामुळं गावात बैलपोळा सण मोठया उत्साहात साजरा होई, जुन्या काळात गावच्या गावगाड्यात पाटलाला खुप महत्त्व होते, त्यांची बैलजोडी वेसीतुन गेली की पोळ्याला सुरुवात होई, काळाच्या ओघात सगळं बदलत चाललंय, पूर्वी एवढा मान राहिला नाही. पण आजही गावात पोळ्यादिवशी बैलाची मिरवणूक काढून वेसीवर नारळ फोडला जातो, गावांत कोणी जर मेलं तर त्याला स्मसणांत नेताना वेसीवर आल्यावर तिरडी टेकवून खंदापालट केली जाते. हे वेशीवरचं का..?? यासारखे प्रश्न आजही मनांत घोळतात. गावातील कोणी जर वेडेपणा करत असेल तर गावावरून ओवाळून टाकलेला हाय तो असे उद्गार आजही आपसूक बाहेर पडतात.

पूर्वीच्या काळी भूत लागणे, करणी, देवीचा कोप होणं या अंधश्रद्धा होत्या त्या आजही काही प्रमाणात कायम आहेत. सगळ्यांची विल्हेवाट वेसीच्या बाहेर लावली जाई. गावाला सुरक्षितता देण्याचं काम वेस करीत होती. आजही कोणतेही शुभकार्य करीत असताना वेसीवर नारळ फोडण्याची प्रथा आहे. गावांत लग्नकार्य असेल तर नवरदेवची मिरवणूक काढून वेसीवर आल्यावर घोड्यावर बसून नारळ फोडला जात होता.

गावागावांत ही वेसी आहत, पण त्या सद्या निर्वासिताचे घर म्हणून ओळखल्या जातात. बाकी वेळेला वेसीमध्ये पत्ते खेळताना बसलेलं लोक आढळून येतात. काही हातभट्टी पिऊन टल्ली झालेले माणसंही आढळतात, काही वेळेला इथं गावातील तरुण पोरं दगा घालताना दिसतात, म्हताऱ्या-कोताऱ्या माणसाचे आश्रयस्थानही बनत आहे गावागांवातील वेस. गावगाड्यात वेसीला अंत्यत महत्त्वाचे स्थान आहे.

गावांची वेस मराठीत अनेक वाक्यप्राचारत अलंकारात वापरली जाते. 'वेशीवरून ओवाळून टाकणे' ह्या शब्दप्रयोग तर अगदी सहजपणे केला जातो. याशिवाय अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण तर सर्वतोपरीचित आहे.

दमडीच तेलं आणलं,
सासूबाईचं न्हंण झालं,
मांमजीची दाढी झाली,
उरलं तेलं झाकून ठेवलं,
लांडोरीचा पाय लागला,
वेसीपर्यत ओघोळ गेला,
त्यात उंट पोहून गेला...!!


ह्या अलंकारात वेस हा शब्द वापरला आहे. अश्या प्रकारे अलंकारिक शब्दांत सजवून वेसीचे महत्त्व वाढवतो. पण सध्याच्या काळात चंगळवादी जगण्यामुळे सगळ्या गोष्टींना ग्रहण लागत आहे. वेस, चावडी यासारख्या गोष्टी भविष्यात चित्रातून दाखवव्या लागतील. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यत वेस ही पाठ सोडत नाही. पण सध्याच्या काळात वेसीचं महत्वही ढासळत चालले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com