या रोहित शर्माचं काय कळतच नाय!

गौरव दिवेकर
बुधवार, 13 डिसेंबर 2017

रोहित शर्मा म्हणजे खेळला तर लॉटरीच म्हणायची..! इतक्‍या वेळा तो 'फेल' होतो. पण तरीही संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्‍वास ठेवते आणि अशी एखादी खेळी करून तो सगळ्या टीकाकारांचे तोंड बंदच करतो.. त्याच्या वागण्या-बोलण्याप्रमाणेच फलंदाजीमध्येही एकप्रकारचा निवांतपणा आहे. कुठलीही घाई नाही, कसलंही दडपण नाही आणि कुणाचीही पर्वा नाही..!

रोहित शर्मा हे वेगळंच रसायन आहे. हा फार कधी चाचपडताना दिसत नाही. पण म्हणून त्याच्या कामगिरीत सातत्य आहे, असंही नाही. आऊट होतो, तेव्हा बऱ्याच वेळा विचित्र फटका मारण्याच्या प्रयत्नात असतो; पण तोपर्यंत खेळताना खरंच खूप देखणे फटके मारतो.

गौरव कपूरबरोबरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स'मधल्या त्या एपिसोडमध्ये विराट कोहली म्हणाला होता, 'आम्ही सगळे ऐकत होतो.. असा एक तरुण खेळाडू पुढे येतोय...मग आम्हीही विचार करायचो.. की अरे, आम्ही पण तरुणच आहोत की.. मग असा कुठला खेळाडू येतोय की आमच्याविषयी कुणी बोलतच नाही..! मग दक्षिण आफ्रिकेतल्या स्पर्धेत रोहित शर्माला खेळताना पाहिलं आणि आम्ही अवाकच झालो..' 

रोहित शर्मा म्हणजे खेळला तर लॉटरीच म्हणायची..! इतक्‍या वेळा तो 'फेल' होतो. पण तरीही संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्‍वास ठेवते आणि अशी एखादी खेळी करून तो सगळ्या टीकाकारांचे तोंड बंदच करतो.. त्याच्या वागण्या-बोलण्याप्रमाणेच फलंदाजीमध्येही एकप्रकारचा निवांतपणा आहे. कुठलीही घाई नाही, कसलंही दडपण नाही आणि कुणाचीही पर्वा नाही..!

विराटच म्हणाला होता, 'त्याच्याकडे कुठलाही फटका मारताना इतरांपेक्षा एक-दीड सेकंद जास्तच असतो!' हा एक-दीड सेकंद म्हणजे काय, तर कुठल्याही चेंडूवर त्याच्याकडे फटका निवडण्यापासून मारण्यापर्यंत इतरांपेक्षा थोडा जास्त वेळ असतो, इतक्‍या लवकर तो 'लाईन' आणि 'लेंथ' चटकन टिपतो. 

विराटला विश्रांती दिल्यामुळे धरमशालातील श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून रोहित शर्माने भारताचा कर्णधार म्हणून प्रथमच जबाबदारी स्वीकारली. पण फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. त्या पराभवाच्या धक्‍क्‍यातून सावरताना रोहितनं सगळा राग श्रीलंकेच्या गोलंदाजांवर काढला. 'रोहितला नेतृत्त्व जमत नाही' अशी टीका धरमशालातील सामन्यानंतर सुरु झाली आहे. 'आयपीएल'मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व करणे वेगळे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ती कामगिरी करणे वेगळे, असा काही जणांचा सूर आहे. खरं असेलही! कर्णधार म्हणून रोहित किती यशस्वी ठरेल, यापेक्षा फलंदाज म्हणून तो किती यशस्वी ठरतोय हे संघासाठी जास्त महत्त्वाचं आहे. 

या सगळ्या दृष्टीनं रोहितसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. पण त्याच्या स्वभावाकडे पाहता, या टीकेकडे तो फार लक्ष देत असेल असे वाटत नाही. सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व सोडल्यानंतर रोहितकडे जबाबदारी सोपविण्यात आली आणि मग त्याची कारकिर्दच बदलली.. कुणास ठाऊक.. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही असंच काहीतरी होऊ शकेल.. काहीही होऊ शकतं.. या रोहित शर्माचं काय कळतच नाय..!

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या