अमित शहा: विजयाचा 'बनियेगार'

सम्राट फडणीस
सोमवार, 18 डिसेंबर 2017

मोदींचा प्रभावी वापर
मोदींची आणि पर्यायाने भाजपची गेल्या तीन वर्षातली कारकीर्द फारशी समाधानकारक नाही, हे स्पष्ट दिसते आहे. नोटाबंदी, जीएसटीच्या मुद्द्यांवर भाजप वारंवार अडचणीत आला आहे. मात्र, मोदींची भाषणे कुठे आणि कशी वापरायची; पंतप्रधान दर्जाच्या नेत्याला एका राज्याच्या निवडणुकीसाठी पन्नास सभा कशा घ्यायला लावायच्या आणि त्यातून विजय कसा खेचून आणायचा हे अमित शहांइतकं कदाचित दुसरं कुणाला उमगलेलं नाही. 

एकविसाव्या शतकातल्या आजच्या काळात यशस्वी राजकीय नेता बनण्यासाठी नेमकं काय लागतं?
मनाचा थांग न लागू देणारा चेहरा. फायदा-तोट्याचा हिशेब करत गल्ल्यावर बसलेल्या दुकान मालकासारखा चेहऱयावर भाव. गल्ला पुरेसा भरत नसला, तर थंड हालचाली करून परंतू जरब बसेल अशा पद्धतीने काम करण्याची पद्धत. गावातली व्यापारी पेढी जागतिक दर्जाची बनवण्यासाठी लागणारा कॉर्पोरेट माहौल पेशन्स ठेवून उभा करण्याची हातोटी. राजकारणातले आरोप पचवण्याचं निर्ढावलेपण आणि आरोपानंतर बाजी उलटवण्याचं कसब. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक यश मिळाल्यानंतर श्वास न घेता नव्या यशासाठी पहिल्याच ताकदीनं उभं राहण्याची अफाट क्षमता. 

बिकट परिस्थितीत विजय
भाजपच्या 2014 पासूनच्या विजयाचा शिल्पकार बनलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याइतकीच दबदबा पक्षात राखून असलेल्या भाजपच्या अध्यक्ष अमित शहा यांना ही सारी लक्षणं आजघडीला लागू पडताहेत. अत्यंत बिकट परिस्थितीत भाजपला गुजरातमध्ये विजय मिळवून देऊन आणि हिमाचल प्रदेश काँग्रेसकडून हिसकावून घेऊन अमित शहांनी भाजपच्या शिरपेचात विजयाचा आणखी एक नवा तुरा खोवला आहे. 

भारत भाजपमय करण्याचं उद्दीष्ट्य
अमित शहांची राजकीय कारकीर्द काही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही. कदाचित त्यांनाही त्याची पुरेशी जाणिव आहे. गुजरातमधले सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरण असो किंवा गुजरात दंगलीचे प्रकरण असो; महिलेवर टेहळणीचे प्रकरण असो किंवा लाचखोरीचे प्रकरण असो. अमित शहांनी प्रसार माध्यमांसमोर किंवा सार्वजनिक सभांमध्ये अघळपघळ बोलून स्वतःला स्वतःच्या गुंत्यात अडकवणं नेहमी टाळलं आहे. गुजरातमध्ये 2013 पर्यंत असलेले मंत्री अमित शहा आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून दिसलेले अमित शहा यांच्यात कमालीचा फरक आहे; एक वगळताः भारत भाजपमय करण्याचं उद्दीष्ट्य. 

उत्तर प्रदेशची व्यूहनीती
उत्तर प्रदेशात वापरलेली व्यूहनीती अमित शहांनी गुजरातमध्ये घासून पुसून वापरली. उत्तर प्रदेशच्या विजयाचा शिल्पकार ठरण्यापूर्वी अमित शहांनी त्या राज्याचं प्रभारीपद स्वतःकडं घेतलं होतं. जाती-जमाती, त्यांच्यातल्या उपजाती, त्यातले प्रभावी नेते आणि त्यांच्याशी वैयक्तिक बैठका हा उत्तर प्रदेशच्या विजयाचा पाया होता. तब्बल 10,400 व्हॉटस्अॅप ग्रुप अमित शहांच्या देखरेखीखाली उत्तर प्रदेशात कार्यरत होते आणि या व्हॉटस्अॅप ग्रुपच्या अॅडमिनच्या पूर्वतयारीच्या बैठकांना भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. एखादा निर्णय अथवा एखादी व्यूहरचना तळापर्यंत पोहोचवण्यासाठी अमित शहांनी उत्तर प्रदेशात एक यंत्रणा उभी केली होती. 

गुजरातमधील यंत्रणा
ही यंत्रणा गुजरातमध्ये आधीपासून अस्तित्वात होती. ती घासून पुसून शहांनी वापरली; म्हणजे जातीची समीकरणं विरोधात जात असतानाही संयम ठेवला. शक्य तिथं फाटाफूट घडवली. प्रत्यक्ष मतदानादिवशी मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था पुन्हा पुन्हा तपासून ठाकठीक करून ठेवली. परिणामी राहूल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या तरूण रक्ताच्या विरोधकांना विरोधकच ठेवून अमित शहा गुजरातमध्ये भाजपला विजयाकडे घेऊन जाऊ शकले. इथे फक्त अमित शहांचा विषय असल्याने, विरोधकांच्या प्रचारातील मुद्द्यांवर चर्चा करण्याची आवश्यकता नाही; परंतू तीन वर्षांच्या केंद्रातील कारभारानंतर निराशेकडे जाऊ पाहणाऱया जनाधाराला आणि पर्यायाने भाजपला अमित शहांच्या अत्यंत चतूर निवडणूक कार्यपद्धतीने पुन्हा एकदा आशावादी बनवले आहे. 

मोदींचा प्रभावी वापर
मोदींची आणि पर्यायाने भाजपची गेल्या तीन वर्षातली कारकीर्द फारशी समाधानकारक नाही, हे स्पष्ट दिसते आहे. नोटाबंदी, जीएसटीच्या मुद्द्यांवर भाजप वारंवार अडचणीत आला आहे. मात्र, मोदींची भाषणे कुठे आणि कशी वापरायची; पंतप्रधान दर्जाच्या नेत्याला एका राज्याच्या निवडणुकीसाठी पन्नास सभा कशा घ्यायला लावायच्या आणि त्यातून विजय कसा खेचून आणायचा हे अमित शहांइतकं कदाचित दुसरं कुणाला उमगलेलं नाही. 

अस्सल 'बनियेगिरी'
अमित शहा हा आकडेवारीवर प्रचंड विश्वास ठेवणारा माणूस आहे. कॉम्प्युटरच्या युगात आकडेवारीला डेटाबेस म्हणतात. भाजपला मंदिराबाहेर काढून कॉम्प्युटरच्या युगात नेऊन आपल्या प्रत्येक मतदाराची माहिती संकलित करून त्याचे अॅनॅलिसिस वारंवार तपासणारा हा माणूस आहे. जमवलेल्या माहितीमध्ये जशी जात-धर्म असते, तसाच मोबाईल नंबरही असतो. कुठली माहिती कधी नेमकेपणानं वापरायची आणि कल आपल्याकडं करून घेऊन फायद्यात राहायचे, हा अस्सल 'बनिया' असलेल्या अमित शहांचा आता हातखंडा बनला आहे. कुणी 'बनवेगिरी' म्हटलं, तरी तोल न ढळण्यातच खरी 'बनियेगिरी' असते. ती शहांकडं आहे. त्यामुळंच भाजप 2019 च्या लोकसभा निवडणुकीकडं आता अधिक आत्मविश्वासानं जाईल, असे गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीनं दाखवून दिलं आहे. चमत्कार घडविणाऱयाला किमयागार म्हणतात. त्या अर्थानं, अमित शहा भाजपचे 'बनियागार' आहेत, असं म्हणता येईल.

इतर ब्लॉग्स